मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

नगरधन (Nagardhan) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नागपूर श्रेणी : सोपी
नागपूर पासून ५० किमी अंतरावर व रामटेक पासून ७ किमी अंतरावर "नगरधन" नावाचा सुंदर भुईकोट किल्ला आहे. नागपूर जवळील रामटेक पहायला येणारे पर्यटक मात्र या किल्ल्याकडे फिरकत नाहीत. इ.स. २०१२ मध्ये पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडूजी केलेली आहे. त्यामुळे हा किल्ला आता पुन्हा आपले पूर्वीचे वैभव दाखवत दिमाखात उभा आहे. किल्ल्यातील भूयारी मंदिर हे अजून एक आकर्षण आहे.

मध्यप्रदेशातील उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य याने आपली मुलगी प्रभावती हिला विदर्भाची जहागिरी दिली होती. या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी तिच्या सोबत महाकवी कालिदासांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी त्यांचा मुक्काम नगरधन किल्ल्यातच होता. याच किल्ल्यातून दूर दिसणार्‍या रामटेकच्या डोंगरावर उतरलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या मेघाला ( आषाढातल्या पहिल्या मेघाला) पाहून कालिदास उज्जैन नगरीच्या आठवणींनी व्याकुळ झाले व त्यांना मेघदूत हे अजरामर काव्य सुचले अशी आख्यायिका आहे.

नगरधन ही वाकाटक घराण्याची राजधानी होती. तेंव्हा पासून म्हणजेच इ.स. ५ ते १८ व्या शतकापर्यंत हा किल्ला नांदता होता. गडा व्यतिरीक्त गावातही अनेक पूरातन अवशेष विखुरलेले आहेत.

नगरधन किल्ला पुरातत्व खात्याच्या अख्यातरीत असल्याने किल्ल्याचे प्रवेशव्दार सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडे असते. सोमवारी किल्ला पाहाण्यासाठी बंद असतो.



Nagardhan Fort

32 Photos available for this fort
Nagardhan
Nagardhan
Nagardhan
इतिहास :
स्थानिक आख्यायिके नुसार या किल्ल्याची निर्मिती नंद राजाने केली. इतिहासकारांच्या मते इ.सनाच्या ४ थ्या ५ व्या शतकात नंदिवर्धन राजाने या किल्ल्याची व नगराची उभारणी केली व ते भरभराटीस आणले. त्याच बरोबर राजप्रासाद, मंदिरे,जलाशय यांची निर्मिती केली. वाकटाकां नंतर नल व स्वामिराज (इ.स.५७३) यांच्या काळात हे स्थान राजकीय दृष्ट्या महत्वाचे होते. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात नगरधन हे केवळ एका जिल्ह्याचे मुख्यालय होते. पुढे गोंड राजाने वाकाटकांच्या जुन्या किल्ल्यांच्या अवशेषांवर नविन किल्ला बांधला, त्यात जून्या किल्ल्याचे साहीत्य वापरण्यात आले होते. पेशव्यांच्या काळात नागपूरकर भोसल्यांनी या किल्ल्याची डागडूजी करून नविन बांधकामे केली.
पहाण्याची ठिकाणे :
प्रथमदर्शनी दिसणारे नगरधन किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज. या तटबंदीत चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीची उंची ६ ते ८ मीटर असून त्यावर चर्या आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. फांजी ३ ते ४ फूट रुंद असून त्यावरून किल्ल्याला आतून प्रदक्षिणा घालता येते.

किल्ल्याचे उत्तराभिमूख प्रवेशव्दार १२ फूट उंच असून त्यावर नगारखाना आहे. प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच देवड्यांची रांग आहे.(पुढील काळात या भागात कचेर्‍या असण्याचीही शक्यता आहे.) .नगरधन किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार उत्तराभिमूख असून त्यावर व्दारशिल्प कोरलेली आहेत. दरवाजावरील उजव्या कोपर्‍यात व मध्ये शरभ कोरलेले असून डाव्या कोपर्‍यात २ हत्ती कोरलेले आहेत. दरवाजाच्या मधोमध गणेशमूर्ती कोरलेली आहे. या प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रव्र्श केल्यावर डाव्या हाताला घोड्यांच्या पागा आहेत, तर उजव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी छोटा दरवाजा व जिना आहे. या जिन्याने वर गेल्यावर फांजीवर एक पीराचे थडगे आहे. येथून पहिल्या प्रवेशव्दारावर असलेल्या नगारखान्या पर्यंत जाता येते.

जिन्यावरून उतरून समोर दिसणार्‍या भुयारीदेवीच्या मंदिराकडे चालत जावे. याला भुयारी देवी न्हणत असले तरी येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या मुर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्त्रोताचे पावित्र जपले आहे. या मंदिरात जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या पोटात व पाण्याच्या सानिध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही येथे गारवा जाणवतो.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील (मागच्या) भिंतीत तीन कमानी असलेले दालन आहे . या दालनाच्या खाली जमिनीच्या खालच्या पातळीवर चोर दरवाजा आहे. तेथून पुढे चालत गेल्यावर एक चौकोनी हौद आहे. या हौदात जमिनीच्या खाली १० फूटावर एक विहिर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात ४ बाजूंनी पायर्‍या असलेला एक उथळ हौद आहे.( पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा व कमळाची फूल ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी) महालात येण्यासाठी असलेल प्रवेशव्दार सध्या उध्वस्त अवस्थेत आहे. त्यावर नक्षीकामाचा उत्तम नमुना आहे. या महाला पासून मुख्य प्रवेशव्दारा कडे आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
नागपूर ते रामटेक अंतर ५0 किमी आहे. नागपूर ते रामटेक एसटीची बससेवा आहे. रामटेक गावातून उजव्या हाताचा रस्ता ७ किमीवरील नगरधन गावात जातो. रामटेकहून नगरधनला जाण्यासाठी रामटेक मध्ये ६ आसनी रिक्षा मिळतात. नगरधन गावा बाहेर नगरधन किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, रामटेक गावात आहे .
पाण्याची सोय :
गडावरील विहिरीत बारमाही पाणी असते.
सूचना :
नागपूरहून खाजगी वहानाने अर्ध्या दिवसात रामटेक व नगरधन हे किल्ले पाहून होतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नाणेघाट (Naneghat)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)
 नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  न्हावीगड (Nhavigad)
 निमगिरी (Nimgiri)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)