मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

नळदुर्ग (Naldurg) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : धाराशिव श्रेणी : सोपी
महाराष्ट्र हा किल्ल्र्‍यांचा देश आहे. या देशात स्थळ अर्थात भुदुर्ग, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे तिन्ही प्रकार आढळतात. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुदुर्गांमधील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळ जवळ ३ किमी लांब आहे. या तटबंदी मध्ये ११४ बुरुज आहेत. या किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे ‘पाणीमहाल’. पावसाळ्यात बोरी नदीचे पाणी या पाणी महालावरुन पडते, तेव्हा महालाच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते.
27 Photos available for this fort
Naldurg
Naldurg
Naldurg
पहाण्याची ठिकाणे :
नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी ३ किमी लांबीची आहे. यात जवळजवळ ११४ बुरुज बांधलेले आहेत. बुरुजांच्या विविध आकारांचे प्रयोग नळदुर्ग मध्ये करण्यात आले आहेत. काही ठिकाणी षटकोनी, पंचकोनी, चौकोनी, अर्धवर्तुळाकार तर काही ठिकाणी नऊ पाकळ्र्‍यांसारख्या बुरुजाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळच्या नळदुर्ग किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी खंदकाच्या मागच्या बाजूला जोड किल्ला बांधण्यात आला आहे, याचे नाव "रणमंडळ". भुदुर्गाला खंदक हा हवाच म्हणून नळदुर्गच्या अवतीभवती बोरीनदीचे पात्र वळवून त्याचा खंदक म्हणून उपयोग केला आहे. यामुळे किल्ला आपोआपच संरक्षित झाला आहे.

नळदुर्ग गावात शिरल्यावर किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेने वस्ती ओलांडली की खंदकावरील पुल लागतो. त्यावरुन किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दारात शिरायचे. हे प्रवेशव्दार दोन भव्य बुरुजांमध्ये बसविलेले आहे. याच बुरुजांमधून किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार सध्दा काढले आहे. यातून आत शिरल्यावर डावीकडे देवड्या लागतात. समोरची वाट सध्या भिंत घालून बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घेऊन दोन तटबंदीच्या मधून ही नागमोडी वाट जाते. डावीकडच्या बुरुजामध्ये किल्ल्याचे तिसरे अर्थात मुख्य प्रवेशव्दार उभे आहे. तिथे जाण्या अगोदर उजवीकडे वळून पायर्‍या चढून शेरहाजीच्या वर जायचं तिथून किल्ल्याची दुहेरी तटबंदीचे सुंदर दर्शन होते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दाराची लाकडी फळ्या आजही शिल्लक आहेत. सध्या गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने गडाचा हा दरवाजा सकाळी ९ ला उघडतो आणि संध्याकाळी ५ ला बंद होतो. या प्रवेशव्दाराच्या बाहेरच्या बाजूसही बुरुजामध्ये खोल्या केलेल्या आहेत. आत शिरल्यावर डावीकडच्या बाजूने दरवाजाच्या बाजूला असणार्‍या बुरुजांवर जाता येते. आत गेल्यावर समोरच तीन तोफा पडलेल्या दिसतात. यापैकी आडव्या ठेवलेल्या तोफेची लांबी साधारणपणे २७ फुट आहे. त्याच्या मागे हत्तीखान्याची इमारत आहे. याच्या समोरच एक मोठे शिल्प ठेवलेले आहे. या इमारतीच्या मागे थोडे अंतर चालून गेल्यावर किल्लेदाराचा वाडा लागतो. या वाड्यामध्ये पूर्वी नळदुर्गचे महाविद्यालय भरत असे. आता यात काही शिल्प पडलेली दिसतात. याच्याच बाजूला ‘मुन्सीफ कोर्टची‘ इमारत आहे.

या वाड्याच्या एका बाजूला ‘जामा मशीद‘ आहे. याच्या समोरच एक हौद सुध्दा आहे. किल्ल्यात काही लोकांची वस्ती आहे. त्र्‍यांची घरे या परिसरात आढळतात. या किल्लेदाराच्या वाड्याच्या उजवीकडे गेल्यावर समोरचा बुरुज आपले लक्ष वाधून घेतो. या बुरुजाचा आकार हा आतल्या बाजूने समजत नाही. त्याला पाहवयाचे असल्यास नळदुर्ग - हैद्राबाद रस्त्यावर नळदुर्ग पासून ५ किमी अंतरावर जायचे. या हायवे वरुन हा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याचा आकार कमळाच्या पाकळ्र्‍यांसारखा दिसतो. यालाच ‘नऊ पाकळ्र्‍यांचा‘ किंवा ‘नवबुरुज‘ असे ही म्हणतात. आतमधील बाजूने हा बुरुज दुमजली आहे. क्वचितच कुठल्यातरी किल्ल्यावर अशी रचना पहावयास मिळते.

बारदरी नावाची एक पडकी इमारत नळदुर्गात जामा मशिदीच्या मागच्या अंगास तटबंदीला लागून आहे. या इमारतीमध्ये इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज हा वास्तव्य करुन होता. या इमारती मधून बोरी नदीच्या खंदकाचे आणि त्यावर असणार्‍या बंधार्‍याचे सुंदर दृश्य दिसते. बारदरीच्या उजव्या अंगास एक इमारत उध्वस्त अवस्थेत उभी दिसते. या इमारतीला ‘रंगमहाल’ असे म्हणतात. किल्ल्यावर इतरही अनेक पडक्या इमारती दिसतात, अनेक वाड्र्‍यांचे उध्वस्त अवशेष दिसतात.

किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे ‘पाणीमहाल’ नळदुर्गाच्या बाजूला खंदक म्हणून बोरी नदीचा वापर करण्यात आला आहे. ही नदी प्रत्यक्षात तुळजापूरहून वाहत येते. तिचे पात्र वळवून संपूर्ण किल्ल्याला खंदक निर्माण केला आहे. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसर्‍या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला आहे. या बंधार्‍याच्या एका टोकाला नळदुर्ग तर दुसर्‍या टोकाला किल्ल्याचा जोडकिल्ला रणमंडळ आहे. या बंधारा १७४ मी. लांब, अडीच ते चौदा मी. रुंद आणि १९ मी. उंच आहे. या बंधार्‍याच्या आतमध्ये छोटासा राजवाडा सुध्दा बांधलेला आहे आणि त्यात उतरण्यासाठी पायर्‍यासुध्दा बांधलेल्या आहेत. बांधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी ह्या बंधार्‍यावरुन वाहते, पण आतील भागात असणार्‍या एका वास्तूला सुध्दा त्याचा स्पर्श होत नाही. या पाणीमहालाच्या वरतून जेव्हा पाणी पडते, तेव्हा त्याच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमादीन.

किल्ल्यातील आणखी एक आकर्षक वास्तू म्हणजे ‘उपळ्या बुरुज’ यालाच उपली बुरुज असेही म्हणतात. याची साधारणपणे उंची दिडशे फुट आहे. या बुरुजाला टेहळणी बुरुज असेही म्हणतात. हा बुरुज किल्ल्याच्या दोन तटबंदीच्या बरोबर मध्यभागी आहे. त्यावर २१ फुट आणि १८ फुट लांबीच्या दोन तोफा ठेवलेल्या आहेत. या बुरुजावरुन संपूर्ण किल्ल्याचा व त्याच्या भोवतालचा परिसर दिसतो. या बुरुजाच्या बाजूला दारुकोठार आहे. या बुरुजाच्या पायथ्याशी पाण्याचा हौदही आहे. तोफांना बत्ती देणारा या पाण्यात उतरत असे. संपूर्ण नळदुर्गचा किल्ला आणि रणमंडळ किल्ला पहाण्यास एक दिवस लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
१ सोलापूर
सोलापूर पासून नळदुर्ग हा ५० किमी अंतरावर आहे. सोलापूर - हैदराबाद रस्त्यावरच नळदुर्ग गावात हा किल्ला आहे. सोलापूरहून दर अर्ध्यातासाला नळदुर्गला जायला एसटी आहे.

२ तुळजापूर
तुळजापूर पासून नळदुर्ग ३५ किमी अंतरावर, तर उस्मानाबाद पासून ५० किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यात राहण्याची सोय नाही. मात्र नळदुर्ग गावात राहण्यासाठी विश्रामगृहे आहेत.
जेवणाची सोय :
नळदुर्ग गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोलापूर ते नळदुर्ग १ जाण्यास साधारण तास लागतो.
सूचना :
नळदुर्गाच्या पाणी महालाचे सौंदर्य पाहायचे असल्यास पावसाळा संपण्याच्या वेळी हा किल्ला पाहायला जावा. नळदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी १ पूर्ण दिवस लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नाणेघाट (Naneghat)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)
 नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  न्हावीगड (Nhavigad)
 निमगिरी (Nimgiri)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)