मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli)) किल्ल्याची ऊंची :  1520
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: आंबोली (सिंधुदुर्ग)
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. या आंबोलीतील "कावळेसाद" पॉंईंट्च्या विरुध्द बाजूस नारायणगड हा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी नारायणगड हा किल्ला बांधण्यात आला.

नारायण गडाच्या पायथ्याशी असलेल्या गेळे गावातील काही जून्या जाणत्या माणसांना सोडून नविन पिढीला या किल्ल्या बद्दल काहीही माहिती नाही. तसेच किल्ल्याला जाण्याचा रस्ताही माहित नाही. नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे. आंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

नारायण गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गेळे गावातून गडावर जातांना फारसा चढ नाही आहे. तर वाट चक्क सरळसोट व काही ठिकाणी उतार असलेली आहे. माणसांचा या भागात वावर नसल्यामुळे वाटेत व आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. त्यामुळे नशिबात असेल तर वन्यप्राणी दर्शन देऊ शकतात. आंबोलीला येणार्‍या आणि वेगळे काही पाहू इच्छीणार्‍यांसाठी हा २ तासांचा सुंदर ट्रेक आहे.
5 Photos available for this fort
Narayangad(Amboli)
इतिहास :
नारायणगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड सावंतांनी बांधला. पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते.
पहाण्याची ठिकाणे :
नारायणगड किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावर सातेरी देवीचे स्थान आहे. तिथे एका झाडाखाली काही घडीव दगड पडलेले आहे,.पण या जागी मुर्ती मात्र नाही आहे. तसेच गडावर घराच्या जोत्यांचे काही अवशेष पहायला मिळतात. गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड , पूर्वेला कावळेसाद पॉंईंट दिसतो. नारायण गडाच्या बाजूला (उत्तरेला) ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक गंगोत्री लगिनवाडा म्हणतात. या सुळक्यांमधील मोठ्या दंडगोलाकार सुळक्याला म्हातारीचा गुंडा (दगड) म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा व नवरी म्हणतात. या ठिकाणी सांगितली जाणारी दंतकथा आणि सह्याद्रीच्या इतर भागात सांगितली जाणारी कथा यात विलक्षण साधर्म्य आहे.

नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे. ती खिंड ओलांडून आलेल्या वाटेने परत न जाता समोरच्या डोंगरावर चढल्यास दाट जंगलात दोन देवस्थान आहेत. एकाला स्थानिक लोक लिंगी म्हणतात. येथे शिवलिंग व नंदी आहे. दुसरे देवस्थान म्हार्ताळ या नावाने ओळखले जाते. येथे उघड्यावर काही मुर्त्या आहेत. स्थानिक वाटाड्या असल्या शिवाय य जागा सापडणे अशक्य आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडी पासून ३२ किमी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते. आंबोली पासून गेळे हे नारायण गडाच्या पायथ्याचे गाव ७ किमी अंतरावर आहे. गेळे गावात जाण्यासाठी आंबोली - बेळगाव रस्त्यावर आंबोली पासून ५.५ किमीवरील (आजरा फाट्याच्या अगोदर १ किमीवर) "कावळेसाद" पॉंईंट आणि गेळे गावाच्या फाट्या पर्यंत जावे. येथे डाव्या हाताला वळून येथून पुढे गेल्यावर २ रस्ते फूटतात. उजवीकडचा रस्ता "कावळेसाद" पॉंईंटला तर डावीकडचा रस्ता गेळे गावात जातो. गेळे गावातील मंदिरा पर्यंत गाडी जाते. पुढे सिमेंटच्या रस्त्याने चालत गेल्यावर उजव्या बाजूस शेतात पायवट शिरलेली दिसते. या पायवाटेने गडावर जाता येते. पण गडावर जाण्यासाठी वाटाड्या सोबत असणे आवश्यकच आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गेळे गावातून नारायण गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
सूचना :
गडावर जाण्यासाठी वाटाड्या सोबत असणे आवश्यकच आहे.
डोंगररांग: Amboli (Sindhudurg)
 महादेवगड (Mahadevgad)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))