मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

न्हावीगड (Nhavigad) किल्ल्याची ऊंची :  4100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक श्रेणी : कठीण
सह्याद्री पर्वताच्या उत्तर - दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत, तर दुसर्‍या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग त्यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.न्हावीगड या किल्ल्याला "रतनगड" असे देखील म्हणतात. न्हावीगडावरील सुळक्यात एक नेढे आहे.
व्यवस्थित नियोजन केल्यास न्हावीगड व मांगी तुंगी सुळके एका दिवसात पाहाता येतात.
8 Photos available for this fort
Nhavigad
Nhavigad
Nhavigad
इतिहास :
इसवी सन १४३१ मधे अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या (तुंबोळा गडाच्या) पायथ्याशी तुंबळ युध्द झाल.पण दोनही बाजुच प्रचंड नुकसान झाल्याने दोनही सैन्यांनी रात्रीच्या अंधाराचा फ़ायदा घेऊन माघार घेतली.पुढील काळात शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड होता. शिवकालिन कागदपत्रात या गडाचा उल्लेख नाहावागड असा आला आहे.
पहाण्याची ठिकाणे :
पाताळवाडीतून न्हावीगड दक्षिणोत्तर पसरलेला दिसतो. गडावर जाण्याची वाट गडाच्या उत्तर सोंडेवरून आहे. सोंडेच्या पायथ्याशी वाघदेवाच ठाण आहे. एका लाकडी पट्टीवर सूर्य,चंद्र,वाघ,नाग कोरलेले आहेत. बाजूला काही शीळा पडलेल्या आहेत.येथे काही भगवे झेंडे लावलेले आहेत. वाघदेवाच दर्शन घेउन उत्तरेच्या सोंडेवरून (दांडावरुन) चढायला सुरुवात केल्यावर साधारणत:१५ मिनिटात डावीकडे एकमेव झाडावर भगवा झेंडा लावलेला दिसतो. झाडा समोरील कातळावरसप्तश्रृंगीच देवीचे शिल्प कोरलेले आहे. या मंदिराच्या दोनही बाजूला बुजलेली पाण्याची टाकी आहेत. देवीचे मंदिर पाहून परत डोंगराच्या सोंडेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर आपण एका बुरुजाच्या खाली येतो. येथे वाट परत डावीकडे वळ्ते. या वाटेवर कातळात कोरलेली ४ पाण्याची टाकी आहेत.त्यापैकी एक खांब टाक आहे. पुढे ही वाट दोन उध्वस्त बुरुजांच्या मधील पायर्‍यांवरुन वर जाते. या ठिकाणी एकेकाळी दरवाजा असावा.आज तो अस्तित्वात नाही. बुरुजां मधून वर चढून आल्यावर वाट उजवी कडे वळ्ते. या वाटेवर पाण्याच २ खांबी टाक आहे , त्याच्या पुढे अजुन एक टाक आहे. ही वाट मघाशी आपण ज्या बुरुजा खालून आलो त्या बुरुजावर येते. बुरुजावरुन परत डोंगर सोंडेने थोडे चढून गेल्यावर गडावर जाणार्‍या पायर्‍या लागतात. या पायर्‍यांवर माती पडलेली असल्याने इथे जपून चढावे लागते. गडमाथ्यावर दरवाज्याचा मागमूसही नाही. किल्ल्याचा माथ्यावर प्रथम एक मोठे चौकोनी टाक लागत. त्याच्या पुढे उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या मागे पाण्याच अजून एक टाक आणि पुन्हा उध्वस्त घराचे काही अवशेष दिसतात. गडाच्या दक्षिणेला त्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळका आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. या सुळक्यात एक नेढ आहे. या नेढ्या खाली एक पाण्याच कोरड टाक आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन पूर्वेला तांबोळ्या, मांगीतुंगी तर दक्षिणेला मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर आणि सालोटा हा परिसर दिसतो.
सूचना :
१) गडावर जाणासाठी शेवटच्या टप्प्यात असलेल्या पायर्‍या जपून चढाव्या लागतात.
२) पायर्‍यांवर माती साचल्याने घसरण्याची शक्यता आहे. बरोबर ३० फ़ुटी दोर बाळगल्यास उत्तम.
पोहोचण्याच्या वाटा :
वडाखेल मार्गे :-
न्हावीगडावर जाण्यासाठी नाशिक - सटाणा मार्गे (११३ किमी वरील) ताहाराबाद गाठावे. ताहारबाद - पिंपळनेर रस्त्यावर ताहाराबाद पासून ७ किमीवर डावीकडे जाणारा रस्ता भिलवड मार्गे मांगीतुंगीला जातो. या रस्त्यावर भिलवडच्या पुढे दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. तर डावीकडील रस्ता ३ किमीवरील वडाखेल गावा मार्गे न्हावी गडाच्या पायथ्याच्या पाताळवाडी पर्य़ंत जातो. वडाखेल गावाच्या थोड पुढे पर्य़ंत डांबरी रस्ता आहे. इथुन साधारण २ किमी पायपीट करुन पाताळवाडीत पोहोचता येते.(२०१४ साली पंतप्रधान ग्राम सडक योजनेत पाताळवाडी रस्त्याचे काम चालू आहे.). वडाखेल पर्यंत खाजगी वाहानाने जात येते. वडाखेल ते पाताळवाडी हे चालत अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. या पठारावरुन गडावर जाण्याची वाट उत्तर सोंडेवरून आहे. सोंडेच्या पायथ्याशी वाघदेवाच ठाण आहे.पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.

ताहाराबादहून वडाखेल पर्यंत जाण्यासाठी पूर्ण रिक्षा भाड्याने घेऊन जावे लागते.
ताहाराबाद ते भिलवड रिक्षा चालू असतात (सिट प्रमाणे पैसे देऊन). भिलवडहून पाताळवाडी चालत गाठण्यास २ तास लागतात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी. पातळवाडी गावात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पाताळवाडी गावातून न्हावीगडावर जाण्यासाठी दीड तास लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नाणेघाट (Naneghat)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)
 नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  न्हावीगड (Nhavigad)  निमगिरी (Nimgiri)
 निवतीचा किल्ला (Nivati Fort)