मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) किल्ल्याची ऊंची :  900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पन्हाळेकाजी
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
दाभोळ हे कोकणातील प्राचीन बंदर आहे. आज दाभोळला किल्ला असित्वात नसला तरी दाभोळच्या समुद्रा सन्मुख टेकडीवर हा किल्ला होता . या दाभोळ बंदरात उतरणारा माल विविध मार्गानी घाटावर जात असे . या दाभोळ बंदराचे आणि व्यापारी मार्गाच रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली . पुढील काळात या मार्गांचा वापर कमी झाल्यामुळे मार्गावरील किल्ल्यांच महत्वही कमी झाल आणि ते किल्ले विस्मृतीत गेले. याच व्यापारी मार्गावर असलेला किल्ला प्रणालक दुर्ग, पन्हाळेदुर्ग आज "पन्हाळेकाजी" या त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या आणि लेण्यांच्या नावानेच ओळखला जातो.

खाजगी वहानाने दोन दिवसात पन्हाळेकाजी लेणी, किल्ला, सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग हे किल्ले आणि आसुदचे केशवराज , व्याघ्रेश्वर आणि मुरुडचे दुर्गादेवी मंदिर पाहाता येते .सर्व किल्ल्यांची आणि मंदिरांची माहिती साईटवर दिलेली आहे .
19 Photos available for this fort
Panhalekaji Fort
इतिहास :
पन्हाळेकाजी लेणी ही बौद्ध हिनयान लेणी आहेत. या लेण्यांचा काळ इसवीसन पूर्व पहिले शतक ते इसवीसनाचे चौथे शतक या दरम्यानचा मानला जातो. याच प्रमाणे या लेणी समुहात वज्रयान आणि गाणपत्य पंथाची लेणीही पाहायला मिळतात. शिलाहार राजा अपरादित्य याचा मुलगा प्रणाल या भागाचा प्रमुख होता. त्याने १२ व्या शतकात हा किल्ला बांधला असावा.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या डोंगराच्या दोन बाजूनी धाकटी आणि कोडजाई दोन नद्या वाहातात. या नद्या पात्रांमधुन छोट्या होड्यांच्या सहाय्याने दाभोळ बंदरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मालाची वाहातूक होत असे. त्यामार्गाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

पन्हाळेकाजी लेणी पाहून गावात जाणाऱ्या रस्त्याने चढून गेल्यावर पन्हाळेकाजी गाव लागते. गाव संपल्यानंतर डाव्या बाजूला टेकडीवर झोलाई देवीचे मंदिर दिसते. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी १५ पायऱ्या चढुन जाव्या लागतात. या पायऱ्यासाठी वापरलेल्या दगडावर नक्षी कोरलेली पाहायला मिळते. काळ्या पाषाणात बांधलेले झोलाई देवीचे मंदिर आज अस्तित्वात नाही . त्याजागी जीर्णोद्धार केलेले सिमेंटचे मंदिर आहे. पण जुन्या मंदिराचे दगड आजूबाजूला पडलेले पाहायला मिळतात. झोलाई देवी मंदिराच्या समोर व मागच्या बाजूला झाडीने भरलेल्या टेकड्या आहेत. त्यापैकी मंदिराच्या समोर उभे राहिल्यावर डाव्या बाजूला एक स्टेज बांधलेले आहे. त्याच्या बाजूने पायवाट झोलाई देवीची टेकडी आणि प्रणालक दुर्ग उर्फ़ पन्हाळेदुर्ग यांच्या मधील खिंडीत उतरते. खिंडीतून वर जाण्यासाठी दोन पायवाटा आहेत. त्यापैकी उजव्या बाजूची पायवाट पकडून वर चढायला सुरुवात करावी. किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती. त्यातील पहिली तटबंदी पार करुन ५ मिनिटात आपण कातळ कोरीव टाक्यापाशी पोहोचतो. टाक्याच्या अलिकडे कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात, वरच्या बाजूला गडाच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. गड माथ्यावर गेल्या काही वर्षापर्यंत शेती होत होती. त्यामुळे गडमाथ्या वरिल अवशेष नष्ट होवून विखुरले गेलेले आहेत. गडावर वेगवेगळ्या शतकातील मातीच्या भाजलेल्या वीटा सापडतात. गड माथ्यावर चुन्याच्या घाण्याचे चाक आहे. गावकर्‍यांनी १९९४ साली गडावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेला एक ४ फ़ूटी स्तंभ पडलेला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला किल्ल्यावरुन खाली उतरणारी वाट आहे. या वाटेने झोलाई देवी मंदिराकडे न जाता विरुध्द दिशेने गेल्यावर कोरडे पडलेले पाण्याचे खांब टाके लागते. टाके पाहून आल्या मार्गाने परत झोलाई देवी मंदिरची टेकडी आणि किल्ला यांच्या मधल्या खिंडीत यावे. गावाच्या विरुध्द बाजूने खिंड उतरण्यास सुरुवात करावी. उजव्या बाजूला एक पायवाट जाते. या वाटेवर पाण्या्चे बुजलेले टाक आहे. ते पाहून झोलाई देवी मंदिरापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटा मोडलेल्या आहेत तसेच किल्ल्यावरील अवशेषांचे, टाक्यांचे स्थान शोधण्यासाठी स्थानिक वाटाड्या बरोबर घ्यावा.

पोहोचण्याच्या वाटा :
खेड मार्गे :- कोकण रेल्वेवरील खेड स्थानकात उतरुन खेड एसटी स्टॅंड गाठावा . खेड स्थानकातून संध्याकाळी ५.३० वाजता पन्हाळेकाजीला जाणारी बस आहे. इतर वेळी खेड दापोली मार्गावरील वाकवली फ़ाट्यावर उतरावे तेथून पन्हाळेकाजीला जाण्यासाठी दापोलीहून येणार्‍या बसेस मिळतात. रिक्षानेही १८ किमी वरील पन्हाळेकाजी गावात जाता येते.

स्वत:चे वाहान असल्यास खेड दापोली रस्त्यावरील वाकवली या गावातून (दापोली आणि खेड या दोन्ही ठिकाणाहून वाकवली १४ किमीवर आहे.) पन्हाळेकाजीला जाणारा फाटा आहे. येथून पन्हाळेकाजी पर्यंतचा रस्ता अरुंद आणि खराब असल्याने अंतर १८ किमी असले तरीही ते पार करायला पाउण तास लागतो. कोडजाई नदी वरील पूल ओलांडला की उजव्या बाजूला नदी तीरावर पन्हाळेकाजी लेणी आहेत. लेणी पाहुन मग पन्हाळेकाजी गावात जाणार्‍या रस्त्याने झोलाई देवी मंदिरापर्यंत जाउन पुढे किल्ल्यावर जाता येते .

दापोली मार्गे :- दापोली दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून १० किमीवर तेरेवायंगणी गाव आहे . या गावातून जाणारा रस्ता गव्हाणे मार्गे पन्हाळेकाजीला जातो. या मार्गे आल्यास आपण प्रथम झोलाई मंदिरापाशी पोहोचतो . यामार्गाने आल्यास किल्ला पाहून नंतर लेणी पाहाता येतील .
राहाण्याची सोय :
ऱहाण्याची सोय दापोली आणि खेडला आहे .
जेवणाची सोय :
जेवणाची सोय दापोली आणि खेडला आहे .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
झोलाई मंदिरापासून १० मिनिटे
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळा सोडून वर्षभर
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Dapoli   Panhalekaji   Via Wakavali 6.00, 9.30, 12.00, 15.30 via Gavrai 8.45, 15.45, 18.00   via Wakavali 7.30, 11.00, 13.30, 17.00 via Gavrai 9.30, 17.00, 19.00   34
Khed   Panhalekaji   17.30 (Night Hault)   7.00   34

डोंगररांग: Panhalekaji
 पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)