मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पन्हाळगड (Panhalgad) किल्ल्याची ऊंची :  4040
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कोल्हापूर
जिल्हा : कोल्हापूर श्रेणी : सोपी
महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही नांदता आहे. कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणार्‍या या किल्ल्यावर पाहाण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे राहाण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे विशेष कष्ट न घेता पाहाता येण्या सारखा असलेला पन्हाळा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे.
11 Photos available for this fort
Panhalgad
इतिहास :
पन्हाळा किल्ला इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव ‘पन्नग्नालय’. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला "पराशराश्रम" या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणार्‍या कमळांमुळे याला "पद्मालय" असे ही म्हटले जाई. ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख "ब्रम्हशैल’ या नावाने आहे.

शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाम्या ताब्यात गेला. यादवांनंतर १४८९ मध्ये पन्हाळा किल्ला विजापूरकरांकडे गेला. इ.स. १६५९ मध्ये अफजलवधानंर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. सिद्द जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुररांच्या ताब्यात दिला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला.

शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला. इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला. त्याच वर्षी रामचंद्र्पंत आमात्र्‍यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी "पन्हाळा" ही कोल्हापूरची राजधानी बनविली. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला. इ.स. १७०९ मध्ये ताराराणीं हा किल्ला परत जिंकून घेतला . त्यानंतर १७८२ पर्यंत "पन्हाळा" ही कोल्हापूरची राजधानी होती. इ.स. १८२७ मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
कवी मोरोपंत पराडकर यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता.
पहाण्याची ठिकाणे :
१) राजवाडा :-
ताराराणींने इ.स. १७०८ मध्ये हा राजवाडा बांधला. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी होस्टेल आहे.

२) शिवमंदिर :-
शिवाजी महाराजांचे हे मंदिर ताराराणी राजवाड्याच्या समोर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. मंदिरात शिवाजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्ती शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील गुहा आहेत.

३) सज्जा कोठी (सदर - ई - महल ) :-
राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. ही २ मजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी या इमारतीत शिवाजी महाराजांची गुप्त खलबते चालत .याच इमारतीत संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यासाठी ठेवले होते.

४) राजदिंडी :-
ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

५) अंबारखाना :-
अंबारखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेर्‍या, दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती.
धान्यकोठारा जवळ एक महादेवाचे मंदिर आहे.यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो,म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात.

६) चार दरवाजा :-
हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला. त्याचे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.

७) सोमेश्वर (सोमाळे) तलाव :-
गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्र्‍यांनी लक्ष्य चाफ्र्‍यांची फुले वाहिली होती.

८) रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी :-
सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.

९) रेडे महाल :-
पन्हाळ गडावर एक भव्य आणि आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुत: ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. पण या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहाता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा. खासांच्या निवासासाठी याची योजना असावी.

१०) संभाजी मंदिर :-
रेडे महालाच्या पुढे एक छोटे गढी वजा मंदिर आहे, हे छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०) याचे आहे. मंदिरात शिलालेख आहे, तर मंदिराच्या आवारात विहीर व घोड्याच्या पागा आहेत.

११) धर्मकोठी :-
संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे.

१२) अंधारबाव (श्रुंगार बाव) :-
तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे.

१३) महालक्ष्मी मंदिर :-
राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

१४) तीन दरवाजा :-
हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.दरवाजावर एक शिलालेख शरभ कोरलेले आहेत. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.

१५) बाजीप्रभुंचा पुतळा :-
एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

१६) पुसाटी बुरुज:-
पन्हाळ्याच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे.येथे २ बुरुज असून त्यामध्ये खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे.

१७) नागझरी:-
गडावर बारमाही पाण्याचे दगडात बांधलेले एक कुंड आहे. याला नागझरी असे म्हणतात. यातील पाणी लोहयुक्त आहे. याच्या जवळच हरिहरेश्वर व विठ्ठल मंदिर आहे.

१८) पराशर गुहा:-
पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आत मध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती.

१९) दुतोंडी बुरुज :-
पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्‍या असलेला बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज म्हणतात.

याशिवाय गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, मोरोपंत ग्रंथालय इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
१ चार दरवाजा मार्गे :-
कोल्हापूर शहरातून ‘एस टी’ बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते.

२ तीन दरवाजा मार्गे :-
गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने ,हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतुत जाता येते.
सूचना :
१) पन्हाळा किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी किमान २ दिवस तरी पाहीजेत. किल्ल्यावर बाजीप्रभुंच्या पुतळ्यापाशी गाईड मिळू शकतो. त्याला बरोबर घेऊन किल्ल्यावर खाजगी वहानाने किंवा रिक्षाने फिरता येते.

२) पन्हाळ्यावर मुक्काम करून खाजगी वहानाने ज्योतिबा, पावनखिंड, विशाळगड ही ठिकाणे पाहाता येतात तर चालत जाऊन पावनगड पाहाता येतो.

३) विशाळगडाची माहिती साईटवर दिलेली आहे.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Kolhapur   Panhala   After every half-n-hour from
6.00 to 21.15
From bus depot near Railway Staion
  -   

जिल्हा Kolhapur
 भुदरगड (Bhudargad)  गगनगड (Gagangad)  गंधर्वगड (Gandharvgad)  कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))
 महिपालगड (Mahipalgad)  मुडागड (Mudagad)  पन्हाळगड (Panhalgad)  पारगड (Pargad)
 रांगणा (Rangana)  सामानगड (Samangad)  विशाळगड (Vishalgad)