मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पारनेरा किल्ला (Parnera Fort) किल्ल्याची ऊंची :  400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : वलसाड (गुजरात) श्रेणी : मध्यम
वापी - सुरत रेल्वेमार्गावर अतुल नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने अतुलला जाता येते. अतुल स्थानकातून पारनेरा किल्ल्याचा डोंगर दिसतो. अतुल स्थानक ते किल्ला अंतर २.५ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापी पासून २५ किलोमीटरवर पारनेरा किल्ल्याचा पायथा आहे. अतुल या कंपनीची खाजगी मालमत्ता असल्याचा बोर्ड किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेला आहे. किल्ल्यावर तीन मंदिरे असल्याने येथे भाविकांची कायम वर्दळ असते.
13 Photos available for this fort
Parnera Fort
इतिहास :
या डोंगरावर नक्की किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची रचना पाहाता चालूक्यांच्या काळात या किल्लाची उभारणी झाली असावी. त्यानंतर पंधराव्या शतकात हा किल्ला रामनगरच्या राजाच्या ताब्यात होता. मोहमद बेगाडाने हा किल्ला जिंकून घेतला. बेगाडाच्या अंतिम काळात या किल्ल्याचा ताबा पेंढारींकडे गेला. त्यावेळी १५५१ मध्ये दोनदा दमणच्या पोर्तुगिजांनी या किल्ल्यावर हला केला. त्यानंतर हा किल्ला ओस पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये हा किल्ला नव्याने बांधून काढला. त्यानंतर हा किला १७८० पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वेल्सने हा किल्ला जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या उतारावर झाडी जोपासलेली आहे. पायथ्यापासून साधारणपणे अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावरील तटबंदी जवळ पोहोचतो. तटबंदी फ़ोडून किल्ल्यात जाण्याचा मार्ग केलेला आहे. त्या मार्गाने किल्ल्यात न जाता उजवीकडे जाणार्‍या पायवाटेने तटबंदीला वळसा घातल्यावर आपण ६ फ़ूट उंच प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार बुरुजांमध्ये लपवलेले आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर साधारणपणे १० पायर्‍या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. समोरच गडची रुंदी व्यापणारे कालिकामातेचे मंदिर बांधलेले आहे. जवळच हार, फ़ुले, प्रसाद विकणारी काही दुकाने आहेत. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माची आणि बालेकिल्ला असे किल्ल्याचे दोन भाग आहेत. दोन्ही भाग तटबंदी आणि बुरुजांनी संरक्षित केलेले आहेत.

कालिकामाता मंदिराच्या गाभार्‍याच्या बाजूने गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा अस्तित्वात नाही. बालेकिल्ल्यावर अनेक उध्वस्त वास्तू पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरुन आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याच्या जवळून वाहाणार्‍या पार नदीचे पात्रही दूरपर्यंत दिसते. या भागात हा एकमेव डोंगर असल्यामुळे टेहळणीच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याचे स्थान किती महत्वाचे होते ते लक्षात येते.

बालेकिल्ल्या वरील वास्तू पाहात आपण चंडीका माता मंदिरापाशी खाली उतरतो. याठिकाणी चंडीका मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. सर्वत्र संगमरवर आणि पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूस चांदपीर बाबाचा दर्गा आहे. इथे किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार आणि तिथून खाली उतरणारी पायवाट आहे. दर्गा पाहून पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाही जेथे पायर्‍या आहेत त्या ठिकाणी तीन मोठ्या तोफ़ा बेवारस पडलेल्या आहेत. या किल्ल्याचे अतुल कंपनी आणि मंदिराच्या ट्रस्टने कॉंक्रीटीकरण करुन टाकले आहे. एवढा खर्च केला आहे त्यात ३ चौथरे बांधून हा तोफ़ांचा ऐतिहासिक ठेवा व्यवस्थित ठेवता आला असता. रामेश्वर मंदिर हे किल्ल्याचे उत्तर टोक आहे. ते पाहून पुन्हा माघारी फ़िरुन चंडीकामाता मंदिराच्या बाजूने चालत निघाल्यावर डाव्या बाजूला कातळात खोदलेली ५ पाण्याची टाक आहेत. या टाकयांच्या बाजूला कॉंक्रीटचे खांब उभारुन पूल बांधलेला आहे. या पुलावरुन आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ला पाहायला अर्धा तास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा :
वापी - सुरत रेल्वेमार्गावर अतुल नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने अतुलला जाता येते. अतुल स्थानकातून पारनेरा किल्ल्याचा डोंगर दिसतो. अतुल स्थानक ते किल्ला अंतर २.५ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापी पासून २५ किलोमीटरवर पारनेरा किल्ल्याचा पायथा आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च
जिल्हा Valsad (Gujrat)
 अर्जूनगड (Arjungad)  इंद्रगड (Indragad)  पारडी किल्ला (Pardi Fort)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)