मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पट्टागड (Patta) किल्ल्याची ऊंची :  4562
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला “कळसूबाई रांग” म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी महीनाभर विश्रांती घेतल्यामुळे किल्ल्याचे दुसरे नाव "विश्रामगड" असे देखील आहे. 
श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात अवंध व पट्टा किल्ल्य़ांचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !!
23 Photos available for this fort
Patta
Patta
Patta
इतिहास :
चौदाव्या शतकात पट्टा किल्ला बहामनी साम्राज्यात असल्याचे उल्लेख आढळतात. इ.स.१४९० मध्ये बहामनी साम्राज्याची शकले झाल्यावर हा किल्ला निजामशाहीत गेला. इ.स. १६२७ मधे मुगलांनी हा किल्ला निजामाकडुन जिंकून घेतला. इ. स. १६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला. १६७२ मधे मोगलांनी हा किल्ला पुन्हा जिंकिन घेतला. इ.स.१६७५ म्धे मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टगड परत स्वराज्यात आणला.

नोव्हेंबर १६७९ मधे मुघलांच्या ताब्यात असलेल्या जालान्याच्या संपन्न बाजारपेठेची लूट करुन शिवाजी महाराज रायगडाकडे येत असताना. रणमस्त ख्हान या मुघलांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी बहिर्जी नाईकांनी जवळच्या वाटेने महाराजांना आणि जालन्यातून मिळालेल्या लुटीला सुरक्षितरित्या पट्टा किल्ल्यावर पोहोचवले. पट्ट्यावर महाराजांनी ३० ते ३५ दिवस वास्तव्य केले. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता.

इ.स. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे र्‍यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून घ्यावा लागला.
इ.स १६७१ मधे माधवरावांनी पट्टागड मुगलांकडुन जिंकला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला. इ.स. १९३५ मधे सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या किल्ल्यावर झेंडा फ़डकवला होता.
पहाण्याची ठिकाणे :
पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत पक्का डांबरी रस्ता झालेला आहे. रस्त्याच्या शेवटी वन खात्याने चौकी उभारलेली आहे. प्रौढांसाठी रुपये ५/- भरुन आणि नाव पत्ता नोंदवुन किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ला चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला एका चौथर्‍यावर हत्तीण व तीची दोन पिल्ल अस फ़ायबर मधे बनवलेल शिल्प बसवलेल आहे. थोडा चढ चढुन गेल्यावर पायर्‍या लागतात. वनखात्याने पायर्‍या व्यवस्थित बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी - हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. जिथे कातळ उपलब्ध नव्हता अशी जागा बांधुन काढलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्‍यांच्या वाटेने वर आल्यावर एक चौकोनी गुहा दिसते . रांगत जाता येईल एवढीच या गुहेची उंची आहे. हि गुहा सध्या बुजलेली आहे. या गुहेत पाण्याचे टाक असावे. हि गुहा पासून पायर्‍यांच्या वाटेने वर गेल्यावर डावीकडे दोन गुहा लागतात. यातील एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य होते, ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. बाजूची दुसरी छोटी गुहा उघडी असल्याने पाहायला मिळते. उजव्या बाजुलाही दोन गुहा आहेत. त्यातील मोठी गुहा सुध्दा कुलुप लाउन बंद केलेली आहे. दुसरी गुहा उघडी असुन गुहेत राहाता येते. गुहेच्या समोर मोठी पत्र्याची शेड टाकलेली आहे. त्यात २५ ते ३० जण आरामात राहु शकतात.

गुहां जवळून जाणार्‍या पायर्‍या चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी त्रिंबक प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते.

प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा पट्टा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोध्दार केलेला आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला "अंबरखाना" म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून आत मधे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. अंबरखान्या भोवती बगिचा फ़ुलवलेला आहे.

अंबरखाना पाहुन झाल्यावर किल्ल्यावरील अवशेष पाहाण्यासाठी अंबरखान्याच्या मागे जाउन वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून उजव्या बाजुला दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो.

या पठारावर उजव्या बाजूला (औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे सुकलेल टाक आहे. पुढे गेल्यावर एक गुहा लागते. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात. पुढे गेल्यावर अजुन एक गुहा पाहायला मिळते. या गुहेच वैशिष्ट्य महणजे त्याच्या बाहेरच्या बाजुला जमिनीवर कातळात खोदलेले धान्य कोठार आहे. या धान्य कोठाराच्या दोन खिडक्या पाहायला मिळतात. गुहेच्या पुढे चालत गेल्यावर एकामागोमाग एक अशी पाण्याची १२ टाकी पाहायला मिळतात. त्यांना "बारा टाकी" म्हणून ओळखतात. यातील शेवटच्या टाक्याच्या मागे कातळात कोरलेली गुहा आहे. बारा टाक्यातला गाळ वनखात्याने उपसलेला असुन त्यावर वृक्षारोपण केलेल आहे. बाराटाकी पाहुन पायवाटेने खालच्या बाजुला उतरल्यावर एक पाण्याच टाक पाहायला मिळत. हे टाक पाहुन औंढा किल्ल्याच्या दिशेने सरळ जाणार्‍या वाटेने ५ मिनिटे चालल्यावर आपण दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाजाच्या बाजुला बुरुज आहेत. दरवाजापासून किल्ल्याच्या खालच्या अंगाला गेलेली तटबंदी ढासळलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजुला पाण्याच टाक आहे. येथुन पुढे जाणार्‍या पायवाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते.

दरवाजा पाहुन आल्या मार्गाने परत फ़िरुन अंबरखान्या पर्य़ंत येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालिन बांधारा पाहायला मिळतो. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्‍या चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्‍या वाटेने आपण पट्टादेवीच्या मंदिरापाशी येतो. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात. 
पोहोचण्याच्या वाटा :
१) इगतपुरी - घोटी - टाकेद मार्गे
मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्‍या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्यच्या पायथ्याशी जातो. टाकेदहून कोकणवाडी पर्यंत जीपसेवा उपलब्ध आहे. टाकेद ते कोकणवाडी हे अंतर पाऊण तासाचे आहे. कोकणवाडीला येण्यासाठी दुसरी वाट एकदरा गावातून आहे. टाकेदच्या पुढेच हे एकदरा गाव आहे. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी हे गाव मुळातच डोंगराच्या पठारावर बसलेले आहे. पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत पक्का डांबरी रस्ता झालेला आहे. रस्त्याच्या शेवटी वन खात्याने चौकी उभारलेली आहे. तेथे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी प्रौढांसाठी व मुलांसाठी प्रवेश शुल्क भरावे लागते. तसेच नाव व पत्ता नोंदवुन किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याचा माथा गाठण्यास अर्धा तास लागतो. 


२) इगतपुरी- भगूर बसने कडवा कॉलनी मार्गे ( औंढा किल्ला मार्गे ) 
दुसरी वाट औंढा किल्ल्याकडून येते. इगतपुरी - भगूर बसने कडवा कॉलनी गाठावी. कडवा कॉलनी पासून निनावी गावात यावे. निनावी गावात औंढा किल्ल्याची डोंगरसोंड खाली उतरलेली आहे. यावरून वर चढून गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठारावरून उजवीकडची वाट पकडावी या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण औंढ्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी वाट दुभागते. उजवीकडची वाट औंढा किल्ल्यावर जाते तर, सरळवाट पट्टा किल्ल्याकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून पुढे गेल्यावर समोरच पठार लागते. पठारावर देवीचे एक मंदिर आहे. मंदिराच्या मागून जाणारी वाट पुढे दुभागते. डावीकडची वाट पट्टावाडीत जाते, तर सरळ डोंगरसोंडेवर चढणारी वाट वीस मिनिटात एका कातळकड्या पर्यंत पोहोचते. कातळकड्याच्या डावीकडची वाट कड्याला चिकटूनच पुढे जाते. सुमारे २० मिनिटांत आपण दोन डोंगराच्या मध्ये पोहोचतो. समोरच पट्‌ट्याची तटबंदी आहे. वाटेतच एक पाण्याचे टाके लागते.
राहाण्याची सोय :
१) किल्ल्यावरील गुहे समोरील शेडमधे २५ जणांची राहण्याची सोय होते.
२) पट्टावाडीत सुद्धा राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) पट्टावाडीतून अर्धा तास लागतो. २)औंढा किल्ला मार्गे ३ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळ्याचे ४ महिने गडावर प्रचंड धुक असते. त्यामुळे गडावरील अवशेष शोधायला त्रास होतो.
सूचना :
पट्टा किल्ल्या सोबत टाकेदचे जटायु (राम) मंदिर आणि टाकाहारीचे जगदंबा मंदिर जरुर पाहावे. दोनही मंदिरांची माहिती साईटवर "टेम्पल्स ऑफ़ सह्याद्रीत" दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: P
 पाबरगड (Pabargad)  पाचाड कोट (Pachad Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पदरगड (Padargad)
 पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))  पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पालचा किल्ला (Pal Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)
 पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)
 पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)  पारडी किल्ला (Pardi Fort)  पारगड (Pargad)
 पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पारोळा (Parola)  पर्वतगड (Parvatgad)  पाटेश्वर (Pateshwar)
 पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)  पेडका (Pedka)  पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))
 पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिंपळा (Pimpla)  पिंपळास कोट (Pimplas Kot)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  प्रबळगड (Prabalgad)  प्रचितगड (Prachitgad)
 प्रतापगड (Pratapgad)  प्रेमगिरी (Premgiri)  पुरंदर (Purandar)  पूर्णगड (Purnagad)