मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रामदुर्ग (Ramdurg) किल्ल्याची ऊंची :  300
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सांगली श्रेणी : सोपी
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.

रामपुर गावातील टेकडीवर एक पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांचा वावर किल्ला बांधण्याच्या आधीच्या काळापासुन होता. तसेच या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने आजुबाजूच्या मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येते. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेसाठी किल्ला बांधण्यासाठी ही योग्य जागा होती.

मुंबई आणि पुण्याहुन "रामदुर्ग" हा सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्याच्या गावाजवळ असलेला किल्ला खुप लांब पडतो. त्यामुळे मिरज अथवा सांगलीला येउन खाजगी वाहान केल्यास एका दिवसात रामदुर्ग आणि जुना पन्हाळा हे दोनही किल्ले पाहुन होतात.
7 Photos available for this fort
Ramdurg
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच भव्य प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. दरवाजाची कमान शाबुत आहे. प्रवेशव्दारा समोरील दगडात कोरलेल्या काही पायर्‍या आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजुनही बर्‍यापैकी शाबुत आहेत. तटबंदी दगड एकावर एक रचुन तयार केलेली आहे. दोन दगडांमधील भेगा भरण्यासाठी स्थानिक पांढर्‍या मातीचा उपयोग करण्यात आला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला एक प्राचिन शिव मंदिर दिसते. शिव मंदिराच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. मंदिराकडे जाताना वाटेत पडलेले मंदिराचे घडीव दगड पाहायला मिळतात. या प्राचिन हेमाडपंथी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग एकेकाळी होते. त्यातील सभामंडप आता नष्ट झालेला आहे. त्याचेच अवशेष आपल्याला किल्लाभर पसरलेले दिसतात. शिव मंदिर दक्षिणाभिमुख आहे. सभामंडपाचे चार कोरीव खांब अजुन तग धरुन आहेत. त्यावरुन सभामंडपाची कल्पना करता येते. गाभार्‍याच्या दरवाजावर सुंदर कोरीव काम आहे. व्दारपट्टीवर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍यातील पिंडीवरील छतावर फुलांची नक्षी कोरलेली आहे.

मंदिर पाहुन झाल्यावर मंदिरासमोर असलेल्या झेंडा बुरुजाकडे जावे. हा बुरुज ढासळलेला आहे. या ढासळलेल्या बुरुजावर चढुन झेंड्यापाशी जावे. बुरुजावरुन किल्ल्या खालच रामपूर गाव व दुरवरचा परीसर दृष्टीक्षेपात येतो. झेंडा बुरुजावरुन तटबंदीवर उतरुन तटा वरुनच किल्ल्याची फेरी चालु करावी. तटावरुन फेरी मारताना शिव मंदिराच्या मागच्या बाजुस आल्यावर एके ठिकाणी दगडांची रास पडलेली दिसते. या ठिकाणी एखादी वास्तु असावी. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दक्षिणेला खालच्या बाजुला एक बांधीव तलाव दिसतो. तलावाच्य उत्तरेला एक घडीव दगडाची भिंत बांधलेली आहे. किल्ल्यावर पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यासाठीच या तलावाची निर्मिती केली असावी. किल्ल्यावरुन या तलावा पर्यंत जाण्यासाठी तटबंदीत एक वाट ठेवलेली आहे. तटबंदी वरुन फिरताना किल्ल्याच्या प्रवेशव्दाच्या विरुध्द बाजुस आल्यावर तटबंदी आणि उत्तरेकडील बुरुज यांच्या मधे ही वाट होती. बुरुज आणि तटबंदीचे दगड कोसळुन ती आज बंद झालेली आहे. ही वाट पाहुन तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा घालुन प्रवेशव्दारा पर्यंत आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते.
गडाचा आकार छोटा असल्याने अर्ध्या तासात गड पाहुन होतो.
पोहोचण्याच्या वाटा :
जत हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याच गाव आहे. सांगली पासुन डफ़ळापूर मार्गे ८३ किमी आणि मिरज पासुन डफ़ळापूर मार्गे ८० किमी अंतरावर जत आहे. जत - डफळापूर रस्त्यावर जत पासुन ३ किमीवर रामपूर गावाचा फाटा आहे. या फाट्यापासुन गाव १ किमीवर आहे. सांगली - मिरजहून डफ़ळापूर मार्गे जतला जाणार्‍या एसटी पकडुन रामपुर फाट्यावर उतरुन गावाच्या फाट्यावरुन आत शिरल्यावर छोट्याश्या टेकडीच्या माथ्यावर असलेला रामदुर्ग किल्ला आपले लक्ष वेधुन घेतो. रामपुर गावातील शाळेपर्यंत पक्का रस्ता आहे. शाळेमागील टेकडीवर किल्ला आहे. शाळेमागून जाणार्‍या रस्त्याने टेकडीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. पाण्याच्या टाकीपाशी आल्यावर उजव्या बाजुला किल्ल्याचा दरवाजा दिसतो. रस्ता सोडुन पायवाटेने किल्ल्याच्या दरवाजाच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. साधारणपणे ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या दरवाजा समोर पोहोचतो.रामपुर फाट्यापासुन किल्ल्यावर जाण्यास अर्धातास लागतो.

स्वत:चे वाहान असल्यास थेट पाण्याच्या टाकी पर्यंत वाहानाने जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. जत गावात होउ शकते.

पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
रामपुर गावातुन गडावर जाण्यासाठी १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभरात कधीही पाहाता येइल.
जिल्हा Sangli
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  कोळदुर्ग (Koldurg)  मच्छिंद्रगड (Machindragad)
 प्रचितगड (Prachitgad)  रामदुर्ग (Ramdurg)  विलासगड (Vilasgad (Mallikarjun))