मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रामटेक (Ramtek) किल्ल्याची ऊंची :  2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रामगिरी
जिल्हा : नागपूर श्रेणी : मध्यम
नागपूर शहरापासून ५० किमी अंतरावर रामटेक व नगरधन हे २ सुंदर किल्ले आहेत. त्यापैकी रामटेक किल्ला व रामटेकच्या पायथ्याशी असलेले अंबाला सरोवर पुराण काळापासून धर्मक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. रामगिरी प्राचीन काळापासून धर्मस्थान होते. रामाने या ठिकाणी विश्रांती घेतली होती. बौध्द तत्वज्ञ नागार्जून यांनी काही काळ तेथे वास्तव्य केले. कालिदासांना त्यांचे मेघदूत हे काव्य याच डोंगरावर सुचले अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधर स्वामी यांनी या गडावर धार्मिक उपदेश केला. संत तुकडोजी महाराज यांनी या गडावर ध्यान साधना केली. रघुजी भोसले यांनी गडावरील व अंबाला सरोवर परीसरातील मंदिरांचा जिर्णोध्दार केला.

पुराण काळापासून पेशव्यांच्या पर्यंत हा किल्ला नांदता होता. आजही त्यावरील राममंदिरामुळे तिर्थस्थान म्हणून हा गड प्रसिध्द आहे. रामटेकच्या पायथ्याशी असलेले अंबाला सरोवर व त्याभोवती असलेली पूरातन मंदिरेही पाहाण्या सारखी आहेत.रामटेक किल्ल्याची डागडूजी पूरातत्व खात्याने इ.स. २०१२ मध्ये केल्यामुळे हा गड आपले पूर्वीचे वैभव दाखवत आजही उभा आहे.


Ramtek Fort
34 Photos available for this fort
Ramtek
इतिहास :
पुराणातल्या कथेप्रमाणे अगस्ती ऋषींचा आश्रम रामगिरी पर्वताच्या परीसरात होता. त्यांच्या धार्मिक विधीत व यज्ञ -यागात असूर बाधा आणीत असत. त्यांचा वध करण्याची रामाने शपथ घेतली होती. (स्थानिक भाषेत शपथ म्हणजे "टेक") .त्याप्रमाणे रामाने असूरांचा वध करून जवळच्याच डोंगरावर विश्रांती घेतली. रामाने घेतलेली शपथ म्हणून "रामटेक" असे या स्थानाचे नाव पडले. आज या डोंगरावर राम- सीता व लक्ष्मणाचे मंदिर आहे.

मौर्य, शृंग, सातवाहन, क्षत्रप, मुंड या राजसत्तां नंतर आलेल्या वाकाटाक घराण्याने (इ.स.२७० ते इ.स.५००) विदर्भावर राज्य केले. वाकटाकांच्या नंदिवर्धन, प्रवरपूर व वत्सगुल्म ह्या ३ राजधान्या होत्या. त्यापैकी नंदिवर्धन उर्फ नगरधन ही वाकटाकांची आद्य राजधानी रामटेक पासून ७ किमीवर होती. त्यामुळे वाकटाकांच्या काळात रामटेक किल्ला महत्वाचा किल्ला होता. विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. हे घराणे धर्माभिमानी व सहिष्णु होते. याच राजघराण्यातील रुद्रसेन व्दितिय याची पत्नी प्रभावती ही चंद्रगुप्त व्दितिय कन्या होती. प्रभावती ही धार्मिक होती. तिने व तिच्या पुत्रांनी रामगिरीवर नरसिंह, वराह, त्रिविक्रम, गुप्तराम इ. मंदिरे उभारली. नरसिंह मंदिरात असलेल्या ब्राम्ही शिलालेखात याचा उल्लेख आहे.रघुजी भोसले यांनी गडावरील व अंबाला सरोवर परीसरातील मंदिरांचा जिर्णोध्दार केला.
पहाण्याची ठिकाणे :
रामटेक किल्ल्यावर थेट वहानाने जाता येते. वहान तळावर उतरल्यावर पायर्‍या चढून किल्ल्यात न जाता रस्त्याने पुढे गेल्यावर रस्त्या लगत उजव्या बाजूला एक मोठी बारव दिसते. तिला सिंदूर बावडी या नावाने ओळाखले जाते. बारव पाहून पायर्‍यांच्या वाटेने किल्ल्यात जातांना जागोजागी पूजा साहित्याचे, खाण्यापिण्याची दुकाने आहेत. किल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूला महानुभव पंथाचे भोगाराम मंदिर आहे. डाव्या बाजूला वराहचे मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला गावात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार पूर्वाभिमूख असून आतल्या बाजूस देवड्या आहेत. तिसरा दरवाजा दक्षिणाभिमूख असून त्यावर नगारखाना आहे. या प्रवेशव्दारावर चढून जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने दरवाजाच्या वरचा बाजूस जाऊन दरवाजा ओलांडून डाव्या बाजूच्या बुरुजावर जावे. या बुरुजावर झेंडा लावलेला आहे. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग असून त्यावरून संपूर्ण किल्ला व खालचे रामटेक गाव यांचे विहंगम दृश्य दिसते. तसेच नगरधन किल्ल्याचेही येथून दर्शन होते.

किल्ल्याच्या तिसर्‍या प्रवेशव्दारच्या बाहेर उजव्या बाजूला एक तोफ ठेवलेली आहे. प्रवेशव्दारच्या आत मंदिर संकुल आहे. या संकूलात जाण्यासाठी एका गोपूरातून जावे लागते. हेमाडपंथी रचना असलेल्या या गोपूरावर शिल्प कोरलेली आहेत. गोपूराचतून आत गेल्यावर डाव्या बाजूस दशरथ मंदिर आहे. त्याच्या व्दारपट्टीवर शिल्प कोरलेली आहेत. दशरथ मंदिरामागे पाण्याचा मोठा बांधीव तलाव आहे. या तलावावर एक घुमटी आहे. तलावात उतरण्यासाठी दोन बाजूस जिने आहेत. घुमटीच्या खालच्या बाजूला तलावाच्या भिंतीवर गंडभेरुंड कोरलेले आहेत. या तलावा मागिल बाजूला एक छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर चावीच्या आकाराची सुंदर विहिर आहे. विहिरीच्या डाव्या बाजूला असलेला जिन्याचा मार्ग रामटेक गावात उतरतो.

हे पाहून आल्या मार्गाने परत मंदिर संकुलात आल्यावर प्रथम लक्ष्मणाचे मंदिर आहे. त्यामागे रामाचे मंदिर आहे. या दोनही मंदिरात नागपूरकर भोसल्यांनी वापरलेली शस्त्रे कपाटात ठेवलेली पाहायला मिळतात. राम मंदिराच्या मागे लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. या मंदिराच्या गच्ची वरून रामटेक गाव व दूरचा परीसर दिसतो.

या किल्ल्याला खालच्या बाजूस अजून एक तटबंदी असून, ती तटबंदी कालिदास स्मारकापासून सुरु होऊन संपूर्ण किल्ल्याला वेढा घालून वराह मंदिराच्या मागिल बाजूस असणार्‍या टेलिफोन टॉवर पर्यंत आहे. टेलिफोन टॉवर असलेला डोंगर हा छोट्याश्या खिंडीने रामटेक पासून वेगळा झालेला आहे. या डोंगरावर जाण्यासाठी रामटेकच्या वहानतळा जवळ येऊन रस्ता ओलांडून रामटेकच्या विरुध्द दिशेची पायवाट पकडावी, १० मिनिटात आपण डोंगरावर पोहोचतो. या ठिकाणी वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. ते पाहून परत वहानतळा जवळ यावे. येथे कालिदासाचे स्मारक आहे, ते पाहिल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते.

रामटेक किल्ल्याच्या खालच्या बाजूला अंबाळा तलाव आहे. या तलावाच्या किनार्‍यावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
नागपूर ते रामटेक अंतर ५० किमी आहे. नागपूर ते रामटेक एसटीची बससेवा आहे. रामटेक गावाला वळसा घालून चा रस्ता ३ किमीवरील कालिदासाचे स्मारक पर्यंत जातो. रामटेकहून कालिदासाचे स्मारक पर्यंत जाण्यासाठी एसटीची बससेवा नाही आहे. खाजगी वहानाने येथेपर्यंत जाता येते. रामटेक गावातून बांधीव पायर्‍यांच्या मार्गाने १ तासात राममंदिरापर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर हॉटेलांमध्ये जेवणाची सोय आहे, रामटेक गावात आहे .
पाण्याची सोय :
गडावरील हॉटेलांमध्ये पाणी मिळते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
रामटेक गावातून बांधीव पायर्‍यांच्या मार्गाने १ तासात राममंदिरापर्यंत जाता येते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
सूचना :
नागपूरहून खाजगी वहानाने अर्ध्या दिवसात रामटेक व नगरधन हे किल्ले पाहून होतात.
डोंगररांग: Ramgiri
 रामटेक (Ramtek)