मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रतनगड (Ratangad) किल्ल्याची ऊंची :  4255
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला हा किल्ला आहे. भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्‍याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरन्य परिसर आहे.


Ratangad
28 Photos available for this fort
Ratangad
Ratangad
Ratangad
इतिहास :
रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावं आहे. या रतनवाडीतच अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. अमृतेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी आहे. साधारण १२०० वर्षा पूर्वीचे हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशास्त्राची ओळख करुन देते.पेशवे काळात या मंदिरा संबधी उल्लेख आढळतो तो असा:-
श्री महादेव रतनगडी किल्ल्याखाली आहे, त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड देविले सदरहून सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करुन चालविणे म्हणून मोरो महादेव यास सनद दिली.
रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे रागूर व अलंग हे घाटमाथ्यावरचे अन्‌ सोकुलीवाडी हा कोकणातला महाल या गडाच्या अधिपत्याखाली होते.
पहाण्याची ठिकाणे :
रतनगडावर जाण्याअगोदर पायथ्याशी रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर पाहावे. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम आढळते. यामध्ये यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या बाजुलाच प्रशस्त अशी पुष्करणी आहे, यालाच विष्णुतीर्थ असे म्हणतात. यात विविध प्रकारच्या मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मूर्त्या आहेत. अमृतेश्वराच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे एक मंदिर नाणेमावळ प्रांतात आढळून येते. किल्ले चावंडजवळील कुकडी नदीच्या उगमापाशी असणारे कुकडेश्वर मंदिर व किल्ले चावंडवरील पुष्करणी हे समकालीन असावेत. शिडीच्या मार्गाने गडावर जातांना प्रवरा नदीचे पात्र आपणा बरोबरच धावत असते. हा रस्ता घनदाट जंगलातून जाणारा आहे. साधारण दुसर्‍या पठारावर आल्यावर डावीकडे सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरच्या वाटेने शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट गुहांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्‍या दरवाजाकडे जाते, दुसर्‍या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील गोल बुरुज दिसतो, येथेच पाण्याची दोन ते तीन टाके आहेत, येथून थोडे पुढे गेल्यावर वाटेत इमारतीचे अवशेष आढळतात. साधारणत: १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. याच मार्गाने पुढे गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो. डावीकडे खाली चांगल्या स्थितीतील दरवाजा आहे. ३० ते ४० कातळात कोरलेल्या पायर्‍याही आहेत. संपूर्ण दरवाजा कातळात कोरलेला आहे. दरवाज्यातून खुट्टा सुळक्याचे दर्शन घडते. नेढ्याच्या दुसर्‍या बाजुने उतरल्यावर अर्ध्या तासावरच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. संपूर्ण गड पाहण्यास दोन तास लागतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. रतनवाडी गावात इगतपूरी - घोटी - शेंडी मार्गे जाता येते. शेंडी गावातून रतनवाडीकडे जाण्यासाठी लाँच उपलब्ध आहे. या लाँचने गावापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. सकाळी ८.०० वाजता शेंडीहून पहिली लाँच आहे. शेंडी ते रतनवाडी अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. मात्र हा मार्ग फारच लांबचा आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :-
एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. वाट सोपी आहे.

२) शिडीची वाट :-
ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.
राहाण्याची सोय :
शिडीच्या वाटेने वर चढल्यावर पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस तीन गुहा आहेत. यात ७० ते ७५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
शिडीच्या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.
जिल्हा Nagar
 बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort)
 बितनगड (Bitangad)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  कलाडगड (Kaladgad)
 कळसूबाई (Kalsubai)  खर्डा (Kharda)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  मांजरसुभा (Manjarsubha Fort)
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  पाबरगड (Pabargad)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पट्टागड (Patta)
 पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))  रतनगड (Ratangad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)