मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रोहिलगड (Rohilgad) किल्ल्याची ऊंची :  700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रोहिलगड
जिल्हा : जालना श्रेणी : मध्यम
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड नावाचा किल्ला आहे. या सपाट प्रदेशात उंच सलग अशी डोंगररांग नाही आहे. छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. अशाच एका टेकडी वजा डोंगरावर रोहिगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रोहिलगड याच नावाने ओळखले जाते. अंबड ही यादवकालीन बाजारपेठ या किल्ल्याच्या जवळ असल्याने देवगिरी या राजधानीहून बाजारपेठेकडे जाणार्‍या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती यादव काळात केली गेली असावी.

13 Photos available for this fort
Rohilgad
पहाण्याची ठिकाणे :
रोहिलगड किल्ला गावा मागील डोंगरावर आहे. किल्ला आणि बाजूची टेकडी यांच्या मधून गावातून येणारा कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने रोहिलगड किल्ल्याचा डोंगर आणि टेकडी मधील घळीत येऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर शेतं आहेत. पायथ्यापासून येथे पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी डावीकडे वळून ५ मिनिटे चालल्यावर कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेचे छत ९ खांबांवर तोललेले आहे. गुहेत प्रवेशव्दारा जवळ एक कोरडे टाके आहे, टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. गुहेच्या प्रवेशव्दारा समोरील भिंतीत एक चौकोनी ३ X ३ फ़ुटाची खोबण कोरलेली आहे. या गुहेच्या डाव्या बाजूला एक छोटी गुहा आहे. गुहा पाहून परत दोन घळीत येऊन वर चढायला सुरुवात करावी. घळीतून वर चढतांना उजव्या बाजूला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात. १० मिनिटात आपण तटबंदी जवळ पोहोचतो. या ठिकाणी तटबंदीच्या खालच्या बाजूला एक बुजलेले कोरडे टाके आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेले पठार दिसते. प्रथम डाव्या बाजूला जावे. या ठिकाणी किल्ल्यावर गावाच्या बाजूला एका वाड्याचे अवशेष आहेत. पुढे एक पाण्याचे कोरडे पडलेले टाके आहे. ते पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जातांना वाटेत एक दगडी रांजण आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एका वास्तूचे अवशेष आहेत. येथून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो.

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण किल्ल्यावर चढून आलेल्या घळीच्या उजव्या बाजूच्या पठारावर जावे. येथे पाण्याचा कोरडा पडलेला तलाव आहे. पुढे गेल्यावर एक खड्डा आणि त्यात उगवलेली बाभळीची झाडे दिसतात. या खड्य़ात एक १२ खांबांवर तोललेल कोरडे खांब टाक आहे. हे टाक पाहून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे गेल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. रोहिलगड हा या भागातली एकमेव डोंगर असल्याने गडावरून दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ला व्यवस्थित पाण्यासाठी अर्धा तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
जालना शहर रस्ताने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेले आहे. जालना- अंबड रस्त्याने जालना रोहीलगड अंतर ४० किलोमीटर अंतरावर आहे. रोहिलगडला जाण्यासाठी जालन्याहून थेट एसटी सेवा नाही. जालन्याहून एसटीने अंबड गाठावे. अंबडहुन रोहिलगडला जाण्यासाठी दिवसातून ठराविक वेळेला एसटी बसेस आहेत. (बसचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.) खाजगी वहानाने जालन्याहून अंबडला न जाताही थेट रोहिलगडला जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
जेवणाची सोय किल्ल्यावर नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
रोहिलगड गावातून २० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतूत किल्ल्यावर जाता येते.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Ambad   Rohilgad   7.00, 13.00, 15.00, 18.00   8.30, 14.00, 16.15, 19.00   20

डोंगररांग: Rohilgad
 रोहिलगड (Rohilgad)