मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सडा किल्ला (Sada Fort) किल्ल्याची ऊंची :  2600
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: तिलारी डोंगररांग
जिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम
महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेला सडा किल्ला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आहे . सडा हा चोर्लाघाट आणि परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला आहे .
13 Photos available for this fort
Sada Fort
Sada Fort
Sada Fort
पहाण्याची ठिकाणे :
सडा गावाची वस्ती किल्ल्याच्या पायथ्याशी आहे . या वस्तीत देसाईच्या घराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे . गावतले लोक हडपीची विहिर म्हणून या विहिरीला ओळखतात. विहीर चावीच्या आकाराची असून दोन स्तरात आहे . १८ पायऱ्या उतरुन गेल्यावर आपण विहीरीच्या पहील्या टप्प्यावर पोहोचतो. याठिकाणी विहिरीच्या भिंतीत ठरावीक अंतरावर ३ फूट उंचीचे कमान असलेले (एक माणूस बसू शकेल इतक्या उंचीचे) कोनाडे आहेत . याभागातून विहिरीला संपूर्ण चक्कर मारता येते .
पुन्हा पायऱ्यावर येउन खाली उतरल्यावर कमान असलेला दरवाजा आहे . त्यातून पाण्यापर्यंत जाता येते. ही सुंदर विहिर पाहून गावातील विठ्ठल मंदिर गाठावे . मुक्कामास हे मंदिर योग्य आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूची पायवाट राजवाड्याकडे जाते . या ठिकाणी एक पडक चौसोपी वाडा आहे . या वाड्यात पावणाई देवीचे ठाणे आहे . यावाड्याच्या बाजूला काही पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत . वाडा पाहून पुढे गेल्यावर आपण होळीच्या माळावर पोहोचतो. याठिकाणी सडा गावातील लोक होळी पेटवतात. माळावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची पहिली तटबंदी लागते . तटबंदीतून आत आल्यावर उजव्या बाजूने पुढे जावे . आपल्या उजव्या बाजूला वरच्या बाजूस किल्ल्याची आतील तटबंदी आणि बुरुज दिसतात. पुढे चालत गेल्यावर एक बांधीव मार्ग दिसतो. हा मार्ग तटबंदी बाहेरील विहिरीकडे जातो. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्यामुळे किल्ल्या बाहेरून पाणी आणण्यासाठी हा बांधीव मार्ग बांधलेला होता. हा मार्ग किल्ल्याच्या आतील तटबंदीतून किल्ल्यात जातो. सध्या मात्र हा मार्ग कोसळलेला आहे . विहिर पाहून परत आल्या मार्गाने परत येउन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्याच्या दरवाजाचे दगड या मार्गावर पडलेले आहेत. गोमुखी दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्या ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत एक कमानदार खिडकी आहे . त्यातून खालचे मांगेली गाव , तिलारी धरण आणि दुरवरचा प्रदेश दिसतो. टेहळणीसाठी या खिडकीची योजना केलेली आहे . या खिडकीच्या समोरच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजावर एक ओतीव तोफ आहे . किल्ल्याचा आवाका त्यामानाने छोटा आहे . अर्ध्या तासात किल्ला पाहून होतो.
पोहोचण्याच्या वाटा :
सडा किल्ल्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातून जाता येते.
महाराष्ट्रातून जाण्यासाठी :- मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथून एक रस्ता दोडामार्गला जातो. दोडामार्ग बस स्थानकातून फणसवाडीला जाण्यासाठी दिवसातून तीन एसटी बस आहेत . या बसने मांगेली गावात उतरावे . या गावातून रस्ता आणि पायवाट सडा गावात जाते . मांगेली ते सडा ही वाट चढत जाण्यासाठी अर्धातास लागतो. खाजगी वहानाने दोडामार्ग - खोकरुळ - मांगेली मार्गे सडा गावात जाता येते. दोडामार्ग ते सडा अंतर ५१ किलोमीटर आहे.

कर्नाटक :- सडा गाव कर्नाटकात आहे पण कर्नाटकातून एसटी बस सडा गावात येत नाही . बेळगाव ते सडा अंतर ६० किलोमीटर आहे . बेळगावहून बसेस चोर्ला पर्यंत जातात . चोर्ला ते सडा अंतर १० किलोमीटर आहे . सडाला येण्यासाठी गाड्या मिळू शकतात.
राहाण्याची सोय :
२५ जणांची राहाण्याची सोय विठ्ठल मंदिरात होउ शकते .
जेवणाची सोय :
सडा गावात नाश्ता तसेच भोजनाची सोय आहे.
पाण्याची सोय :
गावात पिण्याचे पाणी आहे .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
डोंगररांग: Tilari Range
 सडा किल्ला (Sada Fort)