मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) किल्ल्याची ऊंची :  4000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नगर श्रेणी : अत्यंत कठीण
महाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी अनेक निसर्गलेणी तयार केलेली आहेत. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर ४ महीने कोसळणार्‍या धुवाधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वहातात. त्यांच्या रोरावत जाणार्‍या पाण्यामुळे सह्याद्रीचे कातळ कडे कापले जातात आणि अनेक अजोड निसर्गशिल्प तयार होतात. अशा प्रकारचे निसर्गशिल्प "सांदण" येथे तयार झालेले पहायला मिळते. या ठिकाणी वहाणार्‍या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने लाखो वर्षे कातळकडे तासून त्यातून मार्ग काढलेला आहे. त्यामूळे काही ठिकाणी नदीच्या पात्राची रूंदी 7-8 फूट असूनही वरच्या बाजूचे कातळकडे एकमेकाला जोडलेले आहेत. या निसर्गशिल्पात भर पडलेली आहे ती कातळ भिंतीं मधून तुटून पडणार्‍या खडकांची. उन्हाळ्यात तापलेल्य़ा खडकावर/ कातळभिंतींवर जेंव्हा पावसाचे थंड पाणी पडते, तेंव्हा त्यांना मोठया भेगा पडतात. या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरून त्याच्या रेट्याने मोठ- मोठे खडक कातळभिंतीतून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडतात.हे सर्व घडून येण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात.



Sandan Valley


Karoli Ghat

10 Photos available for this fort
Sandan Valley - Karoli Ghat
पहाण्याची ठिकाणे :
साम्रद गावातून १० मिनिटात आपण सांदण व्हॅलीत प्रवेश करतो. जस जसे आपण पुढे पुढे जातो तस तसे दोन्ही बाजूंना असणारे कातळकडे जवळ जवळ येऊ लागतात.त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करतांना काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. (पाण्याची खोली ट्रेक कुठल्या महीन्यात करतो त्यावर अवलंबून आहे.) सांदण व्हॅलीच्या या भागात नदीच्या पात्राची सरासरी रुंदी १० फूट तर पात्राच्या दोन्ही बाजूच्या कातळकड्यांची सरासरी उंची १५० फूट आहे. काही ठिकाणी हे कातळकडे वरच्य बाजूस एकमेकाला चिकटलेले आहेत. या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे. रॅपलिंग तंत्राचा वापर करून हा कातळटप्पा पार करावा लागतो. कातळटप्पा ओलांडल्यावर पुन्हा अजस्त्र खडकांची रास आपली वाट पहात असते त्यातून मार्ग काढून उतरतांना २ ठिकाणी ८ ते १० फूटांचे अजस्त्र खडक उतरावे लागतात.

पुढे गेल्यावर एके ठिकाणी अजस्त्र खडकांच्या आडव्या भिंतीने आपली वाट अडवलेली दिसते. या ठिकाणी या दगडांच्या भिंतीवर चढून न जाता दगड एकमेकांवर पडून तयार झालेल्या पोकळीतून उतरत ही भिंत पार करावी लागते. या दगडांमधील पोकळीत एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, सॅक मात्र दोरीने खाली सोडाव्या लागतात. याच्या पुढे पुन्हा एक १५ फूटाचा कातळटप्पा आहे. तो नुसती दोरी लावून उतरता येतो. हा कातळटप्पा पार केल्यावर १० मिनीटात आपण सपाट पृष्ठभागावर येतो. ४-५ तास सतत दगडांच्या राशीतून चालल्यावर सपाट पृष्ठभागावर चालणे म्हणजे स्वर्गसुखच. पुढे एक वळण घेतल्यावर नदी एका खोल डोहात कोसळते. या ठिकाणी असलेल्या सपाट कातळावर रात्रीचा मुक्काम करतात. येथून मागच्या बाजूला बाण सूळका दिसतो. डोहात जाण्यासाठी डोंगर उतरून खाली जावे लागते.

या डोहाच्या पुढे पुन्हा नदीच्या पात्रातून १५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूने एक ओढा नदीच्या पात्रात येऊन मिळतो. या ठिकाणी नदीचे पात्र सोडून ऊजव्या बाजूच्या डोंगरावर चडून गेल्यास आपण "करोली घाटाच्या" मार्गाला लागतो. तर पात्रातून सरळ चालत जाऊन पात्राला समांतर असणार्‍या पायवाटेने चालत गेल्यास २ तासात वोरपड या धनगरवाड्यात पोहोचतो. वोरपडपर्यंत गाडी रस्ता आहे. तर वोरपड पुढील आजोबागडाच्या पायथ्याशी असणार्‍या देहेणे गावात पोहोचण्यास ३० मिनीटे लागतात.

करोली घाट :- आधी सांगितल्याप्रमाणे सांदण व्हॅली उतरून आल्यावर डोहाच्या पुढे पुन्हा नदीच्या पात्रातून १५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूने एक ओढा नदीच्या पात्रात येऊन मिळतो. या ठिकाणी नदीचे पात्र सोडून ऊजव्या बाजूच्या डोंगरावर चडून गेल्यास आपण "करोली घाटाच्या" मार्गाला लागतो. या घाटाने २ ते ३ तासात साम्रद गावात पोहोचता येते. करोली घाट चढायला सुरूवात केल्यावर उजव्या हाताला हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्याची छोटी आवृती पहायला मिळते. पुढे २ कातळटप्पे चढून गेल्यावर आपण साम्रद गावाच्या पठारावर पोहोचतो. करोली घाट चढतांना मागच्या बाजूस आजोबा डोंगर व सीतेचा पाळणा दिसतो. तर पठारावर आल्यावर रतनगड व खुट्टा सुळका दिसतो. पठारावरून १५ मिनिटात साम्रद गावात पोहोचता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून ३ मार्गांनी सांदण व्हॅलीला जाता येते.

१) मुंबई -नाशिक महामार्गावरील घोटी गाव गाठावे. घोटी - सिन्नर (शिर्डी) रस्त्यावर भंडारदरा फाटा आहे, तेथून भंडारदरा २५ किमीवर आहे. भंडारदर्‍याच्या अलिकडे १ किमी शेंडी गाव आहे. या गावातून उजव्या बाजूचा रस्ता घाटघरला जातो. या रस्त्यावरून शेंडी ते घाटघर कॉलनी अंतर २२ आहे. घाटघर कॉलनीतून डाव्या हाताचा रस्ता २ किमी वरील साम्रद गावात जातो. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, शेंडी गावानंतर लावलेल्या सर्व फलकांवर साम्रद फाटा डावीकडे दाखवलेला आहे. पण डावीकडे न वळता २२ किमीवरील घाटघर कॉलनी पर्यंत सरळ रस्त्यानेच जावे व नंतरच डाव्या बाजूस वळावे. यामार्गे मुंबई ते साम्रद हे अंतर १३४ किमी आहे.

२) मुंबई -नाशिक महामार्गावरील घोटी गाव गाठावे. घोटी सिन्नर (शिर्डी) रस्त्यावर भंडारदराफाटा आहे ,तेथून भंडारदरा २५ किमीवर आहे. भंडारदरा - रतनवाडी - साम्रद हे अंतर २६ किमी आहे. या मार्गे मुंबई ते साम्रद हे अंतर १३६ किमी आहे.

३) मुंबई - कल्याण - आसनगाव ( लोकल ट्रेनने ३५ मिनीटे ) -(रिक्षा/बसने ३ कि.मी) शहापूर -(बसने ३० कि.मी.) डोळ्खांब - (जीपने १२ कि.मी.) -देहेणे. पुढे देहेणेहून वोरपड या धनगरवाड्या पर्यंत चालत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. तिथून करोली घाट मार्गे साम्रद पर्यंत जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

किंवा स्वत:च्या वहानाने मुंबईहून थेट वोरपड गावात जाता येते. एका दिवसात वोरपडहून करोली घाट -साम्रद - सांदण कराण्यासाठी स्वत:च्या वहानाने थेट वोरपड गावात जाणे आवश्यक आहे.

पुण्याहून नारायणगाव - संनमनेर -अकोला - रतनवाडी - मार्गे साम्रदला पोहोचता येते. या मार्गाने पुणे ते साम्रद हे अंतर २२० किमी आहे.
राहाण्याची सोय :
साम्रद गावातील शाळेत व देवळात १० -१० जणांची सोय होते.
सांदण व्हॅलीत मुक्काम डोहाजवळील कातळावर उघड्यावर करावा लागतो.
जेवणाची सोय :
सांदण व्हॅलीत जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
साम्रद गावात आधी कळवल्यास जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जानेवारी ते मे
सूचना :
१) सांदण व्हॅली हा ट्रेक सोपा व अती कठीण या दोनही प्रकारात करता येतो.
अ) सोप्या प्रकारात साम्रदहून सकाळी निघून सांदण व्हॅलीतील कातळभिंती संपून उतार सुरु होतो तेथे पर्यंत जाऊन परत साम्रद गावात पोहोचावे. या मार्गात पाण्यातून चालाण्याचे थ्रील अनुभवता येते.

ब) अती कठीण प्रकारात साम्रदहून सकाळी निघून सांदण व्हॅलीतील कातळभिंती उतरून पूर्ण व्हॅली पार करतात. यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.

२) सांदण व्हॅली हा १ ते २ दिवसांचा ट्रेक पुढील प्रमाणे करता येतो.
अ) साम्रद - सांदण व्हॅली - करोली घाट - साम्रद
ब) साम्रद - सांदण व्हॅली - वोरपड - देहेणे.
क) देहेणे - वोरपड - करोली घाट - साम्रद - सांदण व्हॅली - वोरपड - देहेणे .

वरील ट्रेक १ दिवसाचा करण्यासाठी गिर्यारोहणात सराईत असलेला छोटा ग्रुप असणे आवश्यक आहे. मोठा ग्रुप असल्यास २ दिवसांचा ट्रेक करावा.

3) सांदण व्हॅलीत मुक्काम डोहाजवळील कातळावर उघड्यावर करावा लागतो.

४) पावसाळा व त्यानंतरचे २ महीने सोडून हा ट्रेक केला जातो. मार्च अखेरपर्यंत काही भागात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे तो भाग पार करण्यासाठी रोपचा वापर करावा लागतो.

५) मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.

६) साम्रद गावात वाटाडे व सामान वाहून नेण्यासाठी माणसे मिळतात. त्यांची मदत आवश्यक असल्यास घ्यावी.
श्रेणी: Very difficult
 अलंग (Alang)  अणघई (Anghai)  औंढा (अवंध) (Aundha)  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चांदवड (Chandwad)  गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  लिंगाणा (Lingana)
 मदनगड (Madangad)  मलंगगड (Malanggad)  पदरगड (Padargad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)
 तैलबैला (Tailbaila)