मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सांकशीचा किल्ला (Sankshi) किल्ल्याची ऊंची :  850
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सांकशी डोंगररांग
जिल्हा : रायगड श्रेणी : कठीण
रायगड जिल्ह्यातील पेण गावापासून १० किमीवर सांकशी नावाचा एक छोटासा किल्ला आहे. किल्ल्यावर चढ्ण्यासाठी पार करावे लागणारे दोन कातळ टप्पे व किल्ल्यावर असणारी भरपूर पण्याची टाकी यामुळे या छोटेखानी किल्ल्याची भटकंती संस्मरणीय होते. सह्याद्रीची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे. ही रांग उत्तरेकडे पातळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा नद्यांची खोरी विभागते. यात बाळगंगा खोर्‍याच्या दक्षिणेला सांकशी डोंगररांग आहे.
29 Photos available for this fort
Sankshi
Sankshi
Sankshi
इतिहास :
सांक राजाने हा किल्ला बांधला. त्याला जगमाता नावाची मुलगी होती. राजा कर्नाळ्याच्या लढाईत मारला गेल्यावर त्याच्या मुलीने गडावरून जीव दिला अशी दंतकथा आहे.
इ.स. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजतातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगिजांच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला.निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहे, ते पाहून किल्ला पोर्तुगिजांच्या हवाली करून गुजरातच्या सुलतान निघून गेला. निजाम सैन्याच्या वारंवार होणार्‍या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगिजांनी सांकशी व कर्नाळा किल्ला निजामाकडून विकत घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
दर्ग्याच्या बाजूने किल्ल्यावर चढायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात आपण कातळात कोरलेल्या पायर्‍यांपाशी पोहोचतो. पायर्‍यांच्या उजवीकडे कातळात खोदलेल एक दोन खांबी टाक आहे. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍यांनी जपून खाली उतरून जाव लागत. पायर्‍या चढुन वर आल्यावर तीन टाकी आहेत. तिथेच वरच्या भागात जगमातेची मूर्ती आहे. हे सर्व पाहून झाले की आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. गडमाथ्यावर जाणारी वाट या छोट्याश्या खिंडीतून जाते. येथील पायर्‍या नष्ट झालेल्या आहेत. पूर्वी या ठिकाणी कातळ टप्पा चढून जावा लागात असे. आता या ठिकाणी शिडी बसवली असल्याने चढाई सोपी झालेली आहे. शिडीच्या पायथ्याशी उजवीकडे एक छोटीशी पायवाट गेलेली आहे. याठिकाणी कातळात खोदलेली पाण्याची ३ टाकी दिसतात. यांना "गाजीशाह टाके" म्हणतात. यापैकी शेवटच्या टाक्यात शिरण्यासाठी एक ३ फ़ूट x ३ फ़ूट दरवाजा कोरलेला आहे. या दरवाजाच्या चौकटीवर दोनही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहेत. त्याखाली एके काळी व्दारपाल कोरलेले होते. आता फ़क्त त्याचे अवशेष दिसतात. बाजूला कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती अस्पष्ट दिसते. या टाक्याचे दोन भाग केलेले आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाकी पाहून आल्या मार्गाने शिडीपाशी येउन किल्ल्यावर जाता येते. किंवा टाक्यांच्या पुढी जाणार्‍या पायवाटेने किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर जाणारे बहुसंख्य ट्रेकर्स शिडीमार्गे किल्ल्यावर जातात. याठिकाणी शिडीमार्गे न जाता टाक्यांपुढील पायवाटेने गेल्यास सहसा न पाहिली जाणारी टाकी आणि किल्ला कसा पाहाता येइल याबद्दल माहिती दिली आहे.

टाकी पाहून आपण तसेच पुढे किल्ल्याला वळसा घालून (दरी उजवीकडे व डोंगर डावीकडे ठेवत) पुढे सरळ चालत गेल्यावर आपल्याला एक कोरडे पडलेल टाक दिसत. पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन सुकलेली टाकी दिसतात त्याच्या पुढे ६० फ़ूट लांब x ४० फ़ूट रुंद x ८ फ़ूट उंच पाण्याच खांब टाक पाहायला मिळत. ४ खांबांवर तोललेल्या या टाक्याच वैशिष्ट्य म्हणजे याचा आतील उजव्या बाजूचा भाग अर्धवर्तूळाकार कोरलेला आहे. हे टाक पाहून परत सुकलेल्या टाक्यापाशी येऊन एक छोटा कातळटप्पा चढून वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर येतो. येथे वाट जरा निसरडी असल्याने पावले जरा जपूनच टाकावी लागतात. वर आल्यावर एक पाण्याच कोरड टाक आहे. समोरच किल्ल्याची झेंड्याची टेकडी दिसते. ती टेकडी चढून गेल्यावर झेंडा व उध्वस्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. टेकडीवरून उजव्या बाजूने खाली उतरल्यावर डोंगराचा बाहेर आलेला भाग आहे. येथे पाण्याच एक कोरड टाक पाहायला मिळत. ते पाहून पुढे (दरी उजवीकडे व डोंगर डावीकडे ठेवत) चालत गेल्यावर दोन कोरडी टाकी पाहायला मिळतात. या टाक्यांच्या इथून समोर दिसणार्‍या डोंगराचा बाहेर आलेल्या भागाच्या खाली (कड्याच्या खालच्या बाजूस) पाहिल्यावर अंदाजे ५० फ़ूटावर एक गुहा दिसते. तेथे उतरण्यासाठी मात्र गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य असणे आवश्यक आहे. हि गुहा ४० फ़ूट लांब x १५ फ़ूट रुंद x ६ फ़ूट उंच असून ती दोन खांबांवर तोललेली आहे.

दोन कोरड्या टाक्यांपासून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसर्‍या भागात पोहोचतो. येथे पठारावर ५ टाकी कोरलेली आहेत. आजूबाजूला कातळात अनेक खळगे व चर कोरलेले दिसतात. पावसाचे पाणी वाहात टाक्याकडे जाण्यासाठी चर कोरलेले आहेत तर वाहात जाणार्‍या पाण्यातील गाळ या खळग्यात साचत असे. पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जाताना एक रांजण खळगा कोरलेला पाहयला मिळतो. टेहळणीसाठी बसलेल्या टेहळ्याला पाणी पिण्यासाठी उठून जायला लागू नये यासाठी अशा प्रकारचे खळगे कोरले जात. किल्ल्याच्या या टोकावर आल्यावर किल्ल्याची फ़ेरी पूर्ण होते. किल्ल्याच्या टेकडीच पठार आणि ५ टाकी असलेल पठार यांच्या मधल्या घळीतून खाली उतरल्यावर आपण शिडीच्या वरच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरता येतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास १ तास लागतो. किल्ल्यावरून माणिकगड आणि कर्नाळ्याचे सुंदर दर्शन होते.

पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबई - पेण अंतर ६७ किमी आहे. पेणच्या अलिकडे २ किमीवर तरणखोप गाव आहे. या गावातून पेण - खोपोली रस्ता जातो. मुंबई - गोवा महामार्गावरून पेण-खोपोली रस्त्यावर वळल्यावर लगेच पेट्रोल पंप लागतो. या पेट्रोल पंपाच्या बाजूने रस्ता ७ किमीवरील मुंगोशी गावाकडे जातो. मुंगोशी गावापुढे १ किमीवर बद्रुद्दीनचा दर्गा आहे. दर्ग्या पर्यंत गाडीने जाता येते. दर्ग्याच्या जवळ पोहचल्यावर आपल्याला नविन आणि जूना असे दोन दर्गे दिसतात. किल्ल्यावर जाण्यासाठी या जुन्या दर्ग्याजवळ पोहोचायचे. तिथून समोरच एक वाट किल्ल्यावर गेलेली आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांमधून एक पाईप खाली दर्ग्यात आणला आहे. या पाईपच्या बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. पुढे कातळात खोदलेल्या काही खोबण्या लागतात. हा पहिला कातळ टप्पा. पावसाळा सोडून इतर ऋतूत हा टप्पा दोराशिवाय चढता येतो. पुढे आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. गडमाथ्यावर जाणारी वाट या छोट्याश्या खिंडीतून जाते. येथील पायर्‍या नष्ट झालेल्या आहेत. पूर्वी या ठिकाणी कातळ टप्पा चढून जावा लागात असे. आता या ठिकाणी शिडी बसवली असल्याने चढाई सोपी झालेली आहे.

पेण - मुंगोशी एसटी सकाळी ७ वाजता आहे.

२) पनवेलहून पेणकडे जाणार्‍या मुंबई - गोवा महामार्गावर पनवेल पासून १५ किमी अंतरावर बळवली नावचा फाटा आहे. या फाट्यावर उतरुन वीस मिनिटात बळवली गावात पोहोचतो. बळवली गावातील शाळेच्या जवळून एक वाट भेंडीवाडी मार्गे सांकशी किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या बुद्रुद्‌दीन दर्ग्यापाशी जाते. (हे अंतर साधारणत: ६ किमी आहे.) ही वाट मातीची असल्याने स्वत:ची गाडी किंवा बाईक यावरुन जाऊ शकते. अन्यथा आपली पायगाडीच सर्वात योग्य. बळवली गावातून दर्ग्यापर्यत जाण्यास दीड तास लागतो.


राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
दरवाजावर कोरीवकाम केलेल्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे..
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
बद्रुद्दीन दर्ग्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. बळवली मार्गे दोन तास लागतात.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Pen   Mungoshi   6.00, 7.00, 9.30, 10.30, 14.30, 19.00   6.30, 7.30 10.00, 11.00, 15.00, 19.30   

श्रेणी: Hard
 भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  बितनगड (Bitangad)  चंदेरी (Chanderi)
 दार्‍या घाट (Darya Ghat)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  गोरखगड (Gorakhgad)  कलाडगड (Kaladgad)
 कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खैराई किल्ला (Khairai)  कुलंग (Kulang)
 मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोरगिरी (Morgiri)  न्हावीगड (Nhavigad)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)
 प्रचितगड (Prachitgad)  रवळ्या (Rawlya)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  सिध्दगड (Sidhhagad)