मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सेगवा किल्ला (Segawa) किल्ल्याची ऊंची :  1500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम
महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकाळात पुनर्बबांधणी झालेल्या सेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष काळाची झुंज देत आजही उभे आहेत. या भागात असणार्‍या इतर किल्ल्यांच्या मानाने (असावा, अशेरीगड इत्यादी) सेगवागडाची उंची पायथ्याच्या करंजविरा गावापासून कमी असल्याने २ ते ३ तासात सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. ऎतिहासिक कागदपत्रात सेगवा गडाचा उल्लेख सेगवाह या नावानेही येतो.
30 Photos available for this fort
Segawa
इतिहास :
केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात सेगवा किंवा सेगवाह किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परीसर घेतला तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात मोरोपंताना ६००० ची फौज देउन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकुन घेतला. पुन्हा इ.स. १७५४ मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने सेगवागड जिंकला.
पहाण्याची ठिकाणे :
करंजविरा गावातून आपण पाउण तासात गडाच्या माचीवर वायव्य दिशेकडून प्रवेश करतो. माची दक्षिणोत्तर पसरलेली आहे. येथुन उजवीकडे (दक्षिणेकडे) गेल्यास माचीचे टोक आहे. तर डावीकडे (उत्तरेकडे) बालेकिल्ला आहे. प्रथम माचीच्या टोकाकडे जावे. तेथुन खालचे करंजविरा गाव, मुंबई - अहमदाबाद हायवे आणि महालक्ष्मीचा सुळका पाहाता येतो. माचीच्या टोकावरुन परत किल्ल्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी येउन बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला हनुमानाचे नविन मंदिर व त्यातील हनुमानाची संगमरवरी मुर्ती पाहाता येते. हे मंदिर जरी आता गावकर्‍यांनी बांधले असले तरी या जागी पूर्वी हनुमानाचे मंदिर असावे असा तर्क लावता येतो. कारण हा किल्ला शिवाजी महाराजानी जिंकुन त्याची पूर्नबांधणी केली होती.

हनुमान मंदिरावरुन पुढे जाताना माचीच्या दोनही बाजुस उतारावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. शिवकाळात किल्ल्याची पूर्नबांधणी केली गेली तेंव्हा तटबंदीत बांधताना एक प्रयोग करण्यात आला. त्यामुळे ही तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीव्र उतारावर बांधलेल्या या तटबंदीतील दगड ढासळू नयेत म्हणुन ते एकमेकांमधे अडकवण्यात (Locking) आले होते. यासाठी येथील दगडाना इंग्रजी "V" अक्षराचा आकार देउन दोन दगड एकमेका शेजारी ठेउन मधे तयार होणार्‍या खाचेत ("V") विरुध्द बाजूनी तिसरा दगड लावला जात असे. त्यात चुना भरला जाई. यामुळे दगड एकमेकात अडकून राहात, तसेच बाहेरच्या बाजूंनी तटबंदी दिसतांना अखंड दगडाची दिसे. तीव्र उतारावर बांधलेल्या तटबंदीचे आज मोजकेच अवशेष गडावर पाहायला मिळतात.

गडाच्या माचीवर महादेवाचे मंदिर आहे. स्वच्छ सारवलेल्या आणि पत्र्याने शाकारलेल्या या मंदिरात पिंड, नंदी, कासव आणि गणेशाची मुर्ती आहे. येथे पुजेचे पाणी भरुन ठेवण्यासाठी दगडात कोरलेली एक ढोणी पाहायला मिळते.

माची आणि बालेकिल्ल्याच्या डोंगरामधे एक घळ आहे. या घळीत उतरून बालेकिल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दारा समोर असलेल्या पायर्‍यां चढुन पश्विमाभिमुखी उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. येथुन दोन वाटा फ़ुटतात. सरळ वर चढत जाणारी वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. दुसरी उजव्या बाजूने जाणारी वाट पाण्यांच्या टाक्यांकडे जाते. आपण उअजव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला (दरीच्या बाजूला तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळतात. पुढे एक घळ लागते. या जागी पूर्वी किल्ल्याचा दक्षिणाभिमुख दरवाजा होता आता तो पूर्णपणे कोसळलाय. त्याचे दरीत पसरलेले दगड येथे पाहायला मिळतात. येथुन पुढे चालत गेल्यावर पाण्याची दोन कोरडी टाकी पाहायला मिळतात. या टाक्यांच वैशिष्ट्य म्हणजे याच्या कातळभिंतींवर असलेल्या छिन्नींच्या घावावरुन त्या टाक्याची निर्मिती शिवपूर्वकाळात झाल्याच स्पष्ट होत. तर टाक्याचा विस्तार शिवकाळात केला गेला. या टाक्यांच्या पुढे एक सुकलेले टाक आहे. त्यापुढे पाण्याने भरलेल टाक आहे. पुढे डोंगराला वळसा घातल्यावर एक पाण्यानी भरलेली जोड टाक पाहायला मिळतात. त्यापुढे एक कोरड टाक आणि दरीच्या बाजूला एक पाण्याने भरलेले टाक पाहायला मिळत. या टाक्यांचा उपसा नसल्याने किंवा साफ़ न केल्याने (२०१५ साली) एकाही टाक्याच पाणी पिण्यायोग्य नव्हते.

टाकी पाहून शेवटच्या टाक्याच्या वर जाणार्‍या पायवाटेने किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जावे. हा सर्वोच्च माथा चार बुरुज व तटबंदीने संरक्षित केलेला आहे. त्यातील ३ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. या तटबंदीत आग्नेय दिशेला (South East) बालेकिल्ल्याचे प्रवेशव्दार होते. आज ते उध्वस्त झाले असले तरी त्याच्या पायर्‍या आजही शाबूत आहेत. दरवाजातून आत गेल्यावर वाड्यांची काही जोती पाहायला मिळतात. एका चौथर्‍यावर शंकराची पिंड ठेवलेली आहे. त्याच्या बाजुला पुजेचे पाणी भरुन ठेवण्यासाठी दगडात कोरलेली एक फ़ुटकी ढोणी पाहायला मिळते. किल्ल्याचा माथा छोटा असल्याने तो पाहून आल्या दिशेच्या विरुध्द दिशेने बुरुजा जवळून खाली उतरणारी पायवाट पकडावी. या पायवाटेने २ मिनिटात आपण माची आणि बालेकिल्ल्याच्या मधील प्रवेशव्दारापाशी येतो. गडफ़ेरी करण्यासाठी पाऊण तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
करंजविरा हे सेगवागडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १११ किमी वरील चारोटी नाका गाठावा. त्यापुढे अंदाजे ४ किमीवर महालक्ष्मीचे प्रसिध्द मंदिर आहे. महालक्ष्नीच्या पुढे ११ किमीवर (मुंबई पासून १२५ किमीवर) आंबिवली गाव आहे. पण या गावाचा बोर्ड महामार्गावर न लावल्यामुळे गाव आल्याचे कळत नाही. या गावच्या बाहेर महामार्गा लगत (मुंबई कडून अहमादाबादला जाताना डाव्या बाजूला) आराम, अहुरा आणि अपोलो या नावाची मोठी हॉटेल्स आहेत आणि एक इंडीयन ऑईलचा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपासमोर महामार्ग ओलांडून पलिकडे गेल्यावर (मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर) करंजविरा गावाला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्याच्या सुरुवातीलाच पोलिस चौकी आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर वीटभट्टी जवळ दोन फ़ाटे फ़ुटतात. यातील सरळ जाणारा रस्ता सुपा फ़ार्मकडे तर उजवीकडे जाणारा रस्ता करंजविरा गावात जातो. गावातील शाळेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते.
रेल्वेने डहाणु आणि तलासरी येथे उतरून स्टेशन बाहेर मिळणार्‍या खाजगी जीप/ओमनी या वाहानानी आंबिवली किंवा करंजविरा फ़ाट्यावर उतरावे. तेथुन चालत अर्ध्या तासात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो.
शाळेजवळ हातपंप आहे त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. गावात पिण्यायोग्य पाण्याची एकच विहिर आहे. त्यातून पाणी भरुन गड चढावा. कारन गडावर पिण्या योग्य पाणी नाही आहे.
करंजविरा गावाच्या मागे सेगवागड आहे. गावातून पुढे जाणारा रस्ता संपला की शेतातून जाणारी पायवाट आपल्याला गडाच्या डोंगराच्या डाव्या बाजूच्या धारेखाली आणुन सोडते. तेथुन मळलेल्या पायवाटेन पाऊण तासात खडा चढ चढून आपण माचीवर पोहोचतो.
राहाण्याची सोय :
गडावरील महादेव मंदिरात ५ जण राहू शकतात.
जेवणाची सोय :
मुंबई - अहमादाबाद महामार्गावरील हॉटेलात होते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
करंजविरा गावातून पाऊण तासात सेगवा गडावर पोहोचता येते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते मार्च
सूचना :
१) सेगवा आणि बल्लाळगड हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.
२) बल्लाळगडची माहिती साईतवर दिलेली आहे.
जिल्हा Palghar
 आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  बल्लाळगड (Ballalgad)  काळदुर्ग (Kaldurg)
 कोहोजगड (Kohoj)  सेगवा किल्ला (Segawa)