मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

शिवडीचा किल्ला (Sewri Fort) किल्ल्याची ऊंची :  197
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी
सात बेटांचा समुह असलेल्या मुंबई बेटांवर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबई बेटांचा प्रथम लिखित उल्लेख इजिप्शियन भूगोलतज्ञ टॉलमी याने इ.स. १५० मध्ये केला. सातवाहनांच्या काळात मुंबई बेटांवरुन परदेशांशी व्यापार चालत असे. इ. सनाच्या ५ व्या व ६ व्या शतकात या भागावर मौर्य कुळाचे राज्य होते व त्यांची राजधानी होती ‘पुरी‘ म्हणजेच आजचे एलिफंटा बेट. मौर्यांनंतर चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव ह्या राजघराण्यांनी मुंबईवर राज्य केले. इ.स. ११४० मध्ये गुजरातच्या प्रतापबिंबाने शिलाहारांचा पराभव करुन महिकावती उर्फ माहीम येथे आपली राजधानी वसवली. इ.स. १३२० मध्ये गुजरातचा सुलतान मुबारक शहाने मुंबई जिंकली पोर्तुगिज व गुजरातचा शेवटचा सुलतान बहादूरशहा यांच्यात १५३४ मध्ये झालेल्या तहात मुंबई ,साष्टी व वसई बेटांचा ताबा पोर्तुगिजांकडे आला. १६६२ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगिज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी झाले; त्यात ‘‘मुंबईबेट’’ आंदण म्हणून इंग्रजांना मिळाली.

मुंबई बेटावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले बांद्रा, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज व बॉम्बे फोर्ट ह्यापैकी बॉम्बे फोर्ट, माझगाव व डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत.


Sewree Fort
10 Photos available for this fort
Sewri Fort
इतिहास :
मुंबई बेटांच्या पूर्व किनार्‍यांचे रक्षण करण्यासाठी सेंटजॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ साली जंजिर्‍याच्या सिध्दीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनार्‍यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नुतनीकरण/मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले.

इ.स. १६८९ मध्ये जंजिर्‍याच्या सिध्दी याकूत खानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी, माझगाव, माहीम हे किल्ले जिंकले. त्यावेळी शिवडी किल्ल्यावर ५० शिपाई, १ सुभेदार व १० तोफा असल्याची नोंद सापडते.

इंग्रजांनी एत्तद्देशीयांचा बिमोड केल्यावर ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून केला. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून ह्याचा उपयोग झाला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे, घारापूरीचा डोंगर ह्या परिसरात होणार्‍या व्यापारावर, जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचा उपयोग होत असे.
पहाण्याची ठिकाणे :
मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व खात्याने केले आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी गर्द झाडीतून जाणारा पायर्‍यांचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणार्‍या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला. किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या तटात बांधलेल्या प्रशस्त जिन्याने तटावर जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
हार्बर रेल्वेमार्गावरील शिवडी स्थानकाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. शिवडी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरुन बाहेर पडून ‘‘कोलगेट पामोलिव्ह‘‘ कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता पकडावा. ह्या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण शिवडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे ‘शिवडीची दलदल‘ हे ‘‘फ्लेमिंगो‘‘ पक्षांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान ‘‘फ्लेमिंगो‘‘ हजारोंच्या संख्येने इथे येतात.
जिल्हा Mumbai
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 रिवा किल्ला (Riwa Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  वरळीचा किल्ला (Worli Fort)