मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

शिवथरघळ (Shivtharghal) किल्ल्याची ऊंची :  2985
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी
शिवथरघळ हा रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. शिवथरघळ महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही सावित्रीला जाऊन मिळते. तिच्या काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहुबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोर्‍याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ ’सुंदर मठ’ म्हणत असत.
समर्थ म्हणतात:
’गिरीकंदरी सुंदर वन। सुंदर वाहती जीवन।
त्यामध्ये सुंदर भवन। रघुनाथाचे।’
6 Photos available for this fort
ShivtharGhal
इतिहास :
शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर मोर्‍यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते सन १६६० पर्यंत म्हणजे दहा अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये शिवराय दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९३० साली लावून दिला.
पहाण्याची ठिकाणे :
पायर्‍या चढून आल्यावर समोरच ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळी मधे श्री समर्थांची मूर्ती आहे. याच घळीत समर्थांनी दासबोध लिहिला. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळणारा मोठा धबधबा पाहून खरच स्वप्नात असल्यासारखे भासते. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
१) शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायर्‍या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई - गोवा महामार्गावर महाडच्या पुढे नदीवरील पुल लागतो.त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोर कडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे शिवथरघळ साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.


२) दुसरा मार्ग जरा अवघड आहे. गोप्या घाट पुण्याहून निघून राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर, गोप्याघाट, कसबे शिवथर मार्गे घळीत पोहोचता. हा मार्ग तसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.
राहाण्याची सोय :
येथे असणार्‍या शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्व परवानगीने अनेक जणांच्या राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
शिधा आपण स्वत:… दिला तर जेवणाची सोय देखील होते.
पाण्याची सोय :
बारामही पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बसच्या शेवटच्या थांब्यापासून शिवथरघळ पर्यंत १० मिनिटे लागतात.
डोंगररांग: Raigad
 चांभारगड (Chambhargad)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  कोकणदिवा (Kokandiva)  कोंढवी (Kondhavi)
 लिंगाणा (Lingana)  मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))
 पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  रायगड (Raigad)  शिवथरघळ (Shivtharghal)