मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सुमारगड (Sumargad) किल्ल्याची ऊंची :  3064
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रसाळगड - सुमारगड - महीपतगड
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर - कोयना डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड, सुमारगड व महीपतगड हे तीन किल्ले आहेत. यात सुमारगडाची उंची महीपतगडा पेक्षा कमी तर रसाळगडा पेक्षा जास्त आहे. हे किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स रसाळगड - सुमारगड - महीपतगड असा ट्रेक करतात. किंवा महीपतगड - सुमारगड - रसाळगड असाही ट्रेक करतात.

23 Photos available for this fort
Sumargad
Sumargad
Sumargad
Sumargad
Sumargad
पहाण्याची ठिकाणे :
सुमारगडावर, महीपतगड आणि रसाळगड या दोन्हीही बाजूने जाता येते. महीपतगडाच्या बाजूने जाताना गुरुखिंड लागते. या खिंडीच्या डाव्या बाजूने वर चढून सुमारगडकडे जाता येते. वर चढून जेव्हा आपण गडाच्या कड्यापाशी पोहोचतो तेव्हा वरच्या उजव्या बाजूला एक बुरुज दिसतो. या बुरुजावर आपल्याला जाता येत नाही. सुमारगडला सगळ्या बाजूने कडे असल्याने नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. गुरुखिंडीच्या डाव्या बाजूने वर येऊन अश्याच एका कड्याच्या बाजूने जाणाऱ्या अरुंद वाटेपाशी पोहोचतो. वाट अतिशय अरुंद व बाजूला खोल दरी असल्याने हा टप्पा खूप जपून पार करावा लागतो. या वाटेने जातांना उजव्या बाजूच्या कड्याखाली एकमेकांपासून थोडया अंतरावर २ भुयारी टाकी लागतात. येथून थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला गडाच्या एका टोकाला असलेल्या शिडी पाशी पोहोचतो. पूर्वी ही शिडी नसल्याने वर असलेल्या एका झाडाला दोरी बांधून वर जावं लागत असे. परंतु गावकऱ्यांनी एका ट्रेकिंग ग्रुपच्या मदतीने शिडी लावल्याने हा मार्ग अतिशय सुकर झाला आहे. शिडी वरून वर चढल्यावर ८ ते १० पायऱ्या आहेत. पायर्‍यांनी वर चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा आहे त्यात एक सतीशिळा ठेवलेली आहे. ती पाहून परत थोडया पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला अजून एक गुहा लागते. त्यात दगडात कोरलेली दोन शिवलिंग आहेत. ती पाहून अजून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. हा सर्व टप्पा अरुंद अशा कातळ कडयातून जात असल्याने जपून जावं लागते.

किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या रस्त्याने गेल्यावर, उजव्या हाताला भोलाई देवीचं मंदिर आहे. त्यात देवीची मूर्ती, शिवलिंग आणि शाळुंका ठेवलेल्या आहेत. त्या पाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला दोन मोठ्ठी पाण्याची टाकी लागतात. या टाक्यांच्या डाव्या बाजूला शिवलिंग व शाळुंका असलेली गुहा लागते. टाकी व गुहा पाहून पुढे गेल्यावर उजव्या हाताला उंचावर एक खांब टाकं लागतं ज्याचं पाणी अतिशय चवदार व पिण्यायोग्य आहे. या खांब टाक्या पासून थोडं वर चढल्यावर डाव्या बाजूला उ्दध्वस्त वाडा व त्याच्या समोर असलेला चुन्याचा ढिगारा दिसतो. वाड्याच्या समोरच काही अंतरावर एक पाण्याचं टाकं आहे. हे पाहून परत वाडयाकडे यावे व वाड्याच्या विरुद्ध दिशेला खांब टाक्याच्या वरच्या बाजूने चालायला सुरुवात करावी. २ ते ३ मिनिटात आपण मोठ्या टाक्याच्या वरच्या बाजूला असलेल्या गणपतीचे शिल्प असलेल्या टाक्यापाशी पोहोचतो. या टाक्याच्या वरच्या बाजूला काही अंतरावर एक भुयारी तळघरही आहे. ते पाहून, आल्या मार्गाने वाडयाजवळ येऊन पश्चिम दिशेला वर चढल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च भागात म्हणजे बालेकिल्ल्यात पोहोचतो. बालेकिल्ल्यावर आपल्याला एक उ्दध्वस्त वास्तू आणि ध्वज दिसतो. तो पाहून पुढे गेल्यावर आपण गडाच्या शेवटच्या टोकाकडे पोहोचतो. इथून परत मागे फिरावे व खाली उतरावे. खाली उतरल्यावर डाव्या बाजूला आलो त्या रस्त्याने खांब टाक्यापाशी न जाता पुढे सरळ खाली गेल्यावर एक खराब खांब टाकं आणि उ्दध्वस्त वास्तू लागते. ती पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण परत चुन्याच्या ढिगारा आणि उ्दध्वस्त वाड्याकडे पोहोचतो. गडाचा विस्तार कमी असल्यामुळे इथे आपली गडफेरी पूर्ण होते व आपण परतीच्या मार्गला लागतो.

शिडीने खाली उतरल्यावर आलो त्या मार्गाने न जाता उजव्या बाजूला वळल्यावर कड्यात एक भुयारी टाकं आणि एक स्वच्छ पाण्याचं टाकं लागतं. इथून पुढे जाणारा रस्ता आपल्याला साडेचार तासात वाडी पेठ या रसाळगडाच्या पायथ्याच्या गावी पोहोचवतो. वाटेत एका ठिकाणी उतरण्यासाठी एक शिडी लावली आहे. त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर थोडया अंतरावर काही पूरातन मूर्ती ठेवल्या आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
१) वाडी बेलदार या महीपतगडाच्या पायथ्याच्या गावातून एक रस्ता सुमारगडाकडे जातो. या रस्त्याने खाली उतरल्यावर एक ओढा लागतो. तो पार केल्यावर समोर एक डोंगर लागतो तो चढून डाव्या बाजूने पुढे गेल्यावर आपल्याला राया धनघराचे घर लागते. तिथून पुढे डोंगर उजव्या हाताला ठेवून चालत राहिल्यावर गुरुखिंड लागते. तिथून डाव्या बाजूचा रस्ता अर्ध्या तासात आपल्याला सुमारगडाच्या पायथ्याशी घेऊन जातो. महीपतगड ते सुमारगड २.५ ते ३ तास लागतात.

२) वाडी पेठ या रसाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात सुमारगडाकडून येणारी एक डोंगर सोंड उतरली आहे. ही डोंगर सोंड चढून वर गेल्यावर एक आडवा कडा लागतो त्याच्या उजव्या बाजूने गेल्यावर दोन - तीन डोंगर डाव्या हाताला ठेवून पुढे गेल्यावर एक शिडी लागते ती वर चढल्यावर आपण सुमारगडाच्या डोंगर धारेवर पोहोचतो. इथून पुढे अर्ध्या तासात आपण सुमारगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. रसाळगड ते सुमारगड ४.३० तास लागतात.

राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत…: करावी
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
महीपतगड ते सुमारगड २.५ ते ३ तास लागतात,रसाळगड ते सुमारगड ४.३० तास लागतात,
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळा सोडून वर्षभर
सूचना :
महीपतगडाकडून सुमारगडाकडे किंवा रसाळगडाकडून सुमारगडाकडे जाताना घनदाट जंगल व हिंस्त्र प्राण्यांचा वावर यामुळे गाईड घेतल्याशिवाय जाऊ नये. तसेच वाटेत पाणी सहज मिळत नसल्याने पाण्याचा भरपूर साठा घ्यावा.
डोंगररांग: Mahabaleshwar, Koyana
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  जंगली जयगड (Jangli Jaigad)  वसंतगड (Vasantgad)