मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) किल्ल्याची ऊंची :  240
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : गोवा श्रेणी : सोपी
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते, त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला उभा आहे. या किल्ल्याचे हॉटेलात रुपांतर गोवा सरकारने केलेले आहे. पूर्वीच्या काळी या गडाचा उपयोग तेरेखोलची खाडी व समुद्रावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आला होता.


Terekhol fort
13 Photos available for this fort
Terekhol Fort
इतिहास :
१७ व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी केली. पोर्तुगिजांना हे सहन न झाल्याने १७४६ मध्ये त्यांनी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नुतनीकरण केले. किल्ल्यातील चर्च व पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. १७९४ मध्ये थोड्या काळासाठी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. पोर्तुगिजांनी तो परत जिंकून घेतला. गोव्यात जन्मलेल्या डॉ बरनादी पेरेस डिसिल्वा हे १८२५ मध्ये गर्व्हनर झाले. त्यांनी तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांविरुध्द उठाव केला, तो उठाव पोर्तुगिजांनी मोडून काढला. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरुजी (तुळशीदास बाळकृष्ण हिरवे) व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला. त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले. त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. १९६१ ला गोवा मुक्त झाला. ९ डिसेंबर १९७६ ला किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले.
पहाण्याची ठिकाणे :
गोवा सरकारने या छोटेखानी किल्ल्याचे तारांकीत हॉटेलमध्ये रुपांतर केल्यामुळे गडाच्या आतील भागाची मुळची रचना बदललेली आहे. गडाच्या दक्षिणमुखी प्रवेशद्वाराने आत गेल्यावर समोर पोर्तुगिज कालीन ‘‘सेंट ऍन्थोनी‘‘ चर्च दिसते हे चर्च बहुतांश वेळा बंद असल्यामुळे आतून पाहाता येत नाही. चर्चच्या मागे उजव्याबाजूस असलेल्या जिन्याने मागील बुरुजावर जाता येते. तिथे पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सुल बुरुज पाहाता येतो. चर्चच्या डावीकडील म्हणजेच समुद्राकडील बाजूला हॉटेलच्या खोल्या आहेत. किल्ल्याच्या तटावरुन प्रवेशद्वारापर्यंत फेरी मारुन गड दर्शन आटोपते घ्यावे लागते.
पोहोचण्याच्या वाटा :
मालवण - पणजी सागरी महामार्गावर असलेले तेरेखोल गाव, मालवण पासून ६० किमी व पणजी ४० किमी वर आहे. मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने तेरेखोल गावात जाता येते. तेरेखोल ते रेडी(यशवंतगड) अंतर ७ किमी आहे. बसने गेल्यास एका दिवसात दोनही किल्ले पाहून होतात.
राहाण्याची सोय :
गडाचे हॉटेल झाल्यामुळे सर्व सोयी आहेत, पण त्या दुर्गप्रेमींसाठी नाहीत. ८ किमी वरील आरवली गावात सोय राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडाचे हॉटेल झाल्यामुळे सर्व सोयी आहेत, पण त्या दुर्गप्रेमींसाठी नाहीत ८ किमी वरील आरवली गावात जेवणाची सोय सोय होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
सूचना :
खाजगी वाहनाने मालवणहून सकाळी निघाल्यास २५ किमी वरील निवती किल्ला, तिथून ४० किमी वरील रेडीचा यशवंतगड व ७ किमी वरील तेरेखोल किल्ला पाहून परत मालवणला मुक्कामी किंवा पणजीला(४० किमी) जाता येते.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...