मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

त्रिंगलवाडी (Tringalwadi) किल्ल्याची ऊंची :  3238
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे. याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या डोंगरावर दहाव्या शतकातील जैन लेणी आहेत. चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठेत येते असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्य़ांच्या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे.
9 Photos available for this fort
Tringalwadi
Kille Tringalwadi
Kille Tringalwadi
इतिहास :
किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची लेणी (गुहा) आहे. इथे ८ गुहा असून त्यापैकी ६ गुहा पायथ्याशी आहेत. तर २ गुहा डोंगरावर आहेत. दहाव्या शतकात कोरलेली ही जैन लेणी आहेत. पायथ्याजवळचे मुख्य लेणे आयताकार आहे. ओसरी, मंडप व गाभारा अशी त्याची रचना आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम आढळते. मंडपाच्या विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात कोरीव काम केलेले आहे. गाभार्‍यात वृषभनाथाची पद्मासनातील भग्न मूर्ती आहे. सभामंडपाच्या ४ खांबांपैकी ३ खांबांची पडझड झाली आहे. लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे.

लेण्यांच्या बाजूने गडावर वाट जाते. साधारण १५ मिनिटात आपण डोंगरसोंडेवर पोहोचतो. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याची कातळ टोपी दिसते. कातळटोपी खाली आल्यावर दोन वाटा दोन वाटा फ़ुटतात. कातळटोपीच्या उजवीकडून जाणारी वाट सोपी आहे. तर डावीकडून जाणारी वाट थोडी कठीण आहे. पण किल्ला चढतांना डावीकडून जावे आणि उतरतांना उजवीकडील वाटेवरून उतरावे. डावीकडून किल्ल्यावर जातांना पायर्‍यांच्या अगोदर एक छोटासा कातळटप्पा आहे. तो सहज चढून जाता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून उंच पायर्‍या बनवलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात पायर्‍यांना एक वळण दिलेल आहे. पायर्‍या संपल्यावर समोरच ५ फ़ूट उंच हनुमानाची मुर्ती आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेले अप्रतिम सुंदर प्रवेशव्दार आहे. त्यावर दोन कोपर्‍यात दोन शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराला वळसा घालून पुढे गेल्यावर वाड्याचा चौथरा दिसतो. त्याच्या समोरच कातळात खांब रोवण्यासाठी बनवलेले खळगे पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या ठिकाणीही घर असावीत. पायवटेवरुन पुढे जातांना एक पायवाट खाली जातांना दिसते. ती पायवाट किल्लावर उजवी कडून येणारी वाट आहे.

त्यापुढे चालत गेल्यावर डावीकडे असणार्‍या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी पायवाट दिसते. यावाटेने चढून गेल्यावर कातळाच्या पोटात कोरलेली एक मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जणांना राहता येते. त्याच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा आहे. दोन्ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके लागते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच्या कड्यावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो. मंदिराच्या मागुन गडाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे. शिखरावर एक झेंडा लावलेला आहे, काही अवशेष नाहीत.

शिखर पाहून झाल्यावर आल्या मार्गाने परत फ़िरून दोन वाटा फ़ुटतात तिथ पर्यंत यावे. तिथून खाली उतरणार्‍या पायवाटेने गेल्यावर उजव्या बाजूस वाड्याचा चौथरा दिसतो. तो पाहून पायर्‍यांपाशी यावे. येथे पूर्वीच्याकाळी प्रवेशव्दार असावे आता फ़क्त तटबंदीचे अवशेष आहेत. पायर्‍या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. तशीच एक गुहा पायर्‍या उतरल्यावर समोरच्या कातळात वर कोरलेली दिसते. या दोनही गुहा टेहळणीसाठी बनविण्यात आल्या होत्या. त्यांची रचना अषी केली होती की, वेगवेगळ्या भागावर नजर ठेवता येईल. गड फिरण्यास साधारण १ तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
१) त्रिंगलवाडी मार्गे:- गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे.
रेल्वेने :- इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच एसटी स्टँडच्या बाजूला बाहेर पडावे. एसटी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. या चौकातून एक वाट वर जाते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहोचतो. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहोचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहोचतो. त्रिंगलवाडी गावापर्यंत इगतपुरी - त्रिंगलवाडी अशी जीपसेवा देखील उपलब्ध आहे. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंत संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे.

रस्त्याने :- कसारा घाट चढून इगतपूरीच्या पुढे ९ किमीवर टाके गाव लागते. या गावातून रस्ता त्रिंगलवाडी - पत्र्याचीवाडी मार्गे तळ्याची वाडी या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर अंदाजे ८ किमी आहे. तळ्याचीवाडी गावामागे तलाव आहे. तलावाच्या बाजूने वाट शेताच्या बांधावरुन किल्ल्याच्या पायथ्याच्या लेण्यांपर्यंत जाते.
या गुहेवरून गडावर जाण्यास रस्ता आहे. गड चढण्यास अर्धा तास लागतो.

२) विपश्यना विद्यापीठामार्गे:-
इगतपुरी स्थानकावरून उत्तर दिशेला म्हणजेच ‘विपश्यना विद्यापीठा’कडे उतरावे. विद्यापिठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गांमध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा वर सांगितलेल्या क्र १ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहोचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍यांनी वर चढल्यावर
किल्ल्याचा दरवाजा लागतो.

३) चिंचोली मार्गे:-
या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा गाठावे. कसार्‍यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा या ठिकाणी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि ‘विहीगाव’ फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्या मागून जंगलातून जाणार्‍या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणार्‍या पठारावर पोहोचावे. येथे चांदवाडी व जांभूळवाडी ह्या पठारावर वसलेल्या २ वाड्या आहेत. या वाड्यांच्या मधून गडावर वाट जाते. येथून क्र. १ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जातात कोणत्याही वाटेने गडावर पोहोचावे. ही वाट फारच लांबची असल्याने या वाटेने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत…: करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) त्रिंगलवाडी गावापासून१ तास लागतो. २) चिंचोली गावापासून ३ तास लागतात. ३) विपश्यना केंद्रामार्गे २ तास लागतात.
सूचना :
चिंचोली गावातून जाणारी वाट निसरडी आहे.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...