मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) किल्ल्याची ऊंची :  1850
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम
कोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वर नंतर ३ किमी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे (हरगापूरगडाचे) दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते.
16 Photos available for this fort
Vallabhgad(Hargapur)
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे मंदिर आहे. या मंदिरा पर्यंत पक्का रस्ता आहे. जीप सारखे वहान या मंदिरा पर्यंत येऊ शकते. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड प्रवेशव्दार लपवलेले आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे विहिरीत उतरणारी पायर्‍यांची भव्य वाट कोरुन काढलेली आहे. पायर्‍या उतरुन आत गेल्यावर दगडात कोरलेल्या कमानीतून आपला बोगद्यात प्रवेश होतो. पुढे थोड्या पायर्‍या उतरल्यावर वरुन प्रकाश येण्यासाठी झरोका ठेवला आहे तिथपर्यंत पोहोचतो. पुढे पहिली विहिर आहे. ही विहीर एका बोगद्याने दुसर्‍या मोठ्या विहिरीशी जोडलेली आहे. या दोन्ही विहीरी आणि भव्यता आणि खोली पाहाण्यासाठी आपल्याला पुन्हा पायर्‍या चढून वर यावे लागते. विहिरी पाहून पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मुख्य तटबंदीपासून सुटा असलेला बुरुज पाहायला मिळतो. हा बुरुज पूर्णपणे झाडीत झाकला गेला होता. वल्लभगडाचे संवर्धन करणार्‍या शिलेदारांनी त्याला मोकळा श्वास दिला. त्यामुळे आज हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे दोन बुरुज या किल्ल्यावर आहेत. दुसरा बुरुज किल्ल्याच्या पूर्व टोकावर आहे. किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील भागावर नजर ठेवण्यासाठी या सुट्या बुरुजांचा उपयोग होतो. फ़ांजीवरुन पुढे गेल्यावर तटबंदीतले दोन संडास पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर सुटा बुरुज आहे. तो पाहून माघारी फ़िरुन पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजुने पुढे गेल्यावर पेशवेकालिन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ तटबंदीतून खाली उतरणारी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर सिध्देश्वराची मोठी गुहा आहे. तिच्यात सिध्देश्वराचा मुखवटा आणि पादुका आहेत. गुहा पाहून परत गडावर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. ते पूर्णपणे मातीने बुजलेले होते. त्यातील माती काढून ते पूर्णपणे मोकळे केलेले आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
कोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या अलीकडे ३ कि.मी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गा पासून डावीकडे वळल्यावर या फाट्यावरून दोन रस्ते फ़ुटतात. यापैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास हरगापूर (वल्लभगड) गावला वळसा घालूनच वल्लभगडावर जावे लागते. गावातून पंधरा मिनिटांत वल्लभगडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडावर जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १ तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Belgaum
 बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)  काकती किल्ला (Kakati Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)
 राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))  सडा किल्ला (Sada Fort)  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))