मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वर्धनगड (Vardhangad) किल्ल्याची ऊंची :  1500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: म्हसोबा ,सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
वर्धनगड छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे. सातरा जिल्ह्यातून जाणार्‍या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे. त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगाव पासून ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. किल्ल्यावरील वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो.


Vardhangad
42 Photos available for this fort
Vardhangad
Vardhangad
Vardhangad
इतिहास :
अफजलखानाच्या वधानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. संभाजी महाराजांच्या वधानंतर ५ में १७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य सातार्‍यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘ बादशहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला.
त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान ’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य , चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू ,सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले.
वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते, ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसर्‍या टोकाशी येऊन पोहोचते. ही तटबंदी आजही चांगल्या स्थितित शाबूत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे.
दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक माठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायर्‍या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे. पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणार्‍या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
टेकाडावर गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर आहे. मंदिर जीर्णोध्दारीत असल्यामुळे आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभार्‍यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरावे. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात. संपूर्ण गड फिरण्यास एक तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा आणि फलटण या दोन्ही बाजूंनी रस्ते आहेत.
१) सातारा - पंढरपूर रस्त्यावर सातार्‍या पासून ३० किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
२) फलटण - मोळघाट - पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४१ किमी वर आहे. पुसेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
३) फलटण - दहिवडी मार्गे पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४५ किमी वर आहे. पुसेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसते.आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. पायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय :
बारमाही पिण्याची सोय आहे.
सूचना :
१) सातारा - पंढरपूर रस्त्यावर कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , महिमानगड हे तीन किल्ले आहेत. मुंबई / पुण्याहून रात्री निघून प्रथम कल्याणगड (नांदगिरी) पाहून घ्यावा. त्यानंतर वर्धनगड , महिमानगड हे किल्ले पाहून फलटण मार्गे परत यावे. यातील वर्धनगड , महिमानगड हे किल्ले आटोपशीर असल्यामुळे तीनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे.

२) कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , महिमानगड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Satara   Vardhangad   From 5.00 to 22.00 After every half an hour   -   

डोंगररांग: Mhasoba, Satara
 संतोषगड (Santoshgad)  वर्धनगड (Vardhangad)