मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वारुगड (Varugad) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सीतामाईचा डोंगर, माण, सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
वारुगड किल्ला शिवरायांनी बांधला होता. या किल्ल्याचा किल्लेदार परभू जातीचा होता. २०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. १८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुसर्‍या बाजीरावाकडून हा किल्ला घेतला.


Varugad
31 Photos available for this fort
Varugad
Varugad
Varugad
पहाण्याची ठिकाणे :
वारुगड किल्ला माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे.
१ वारुगड माची :-
रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी दुरुनच किल्ल्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे. आजही ती बर्‍याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो. या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते. आता मात्र रस्त्याच्या उजव्या बाजूला एकच दरवाजा शिल्लक आहे. त्याच्या पुढे पाण्याचा छोटा तलाव आहे. रस्ता संपतो तिथे भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच हातपंप व वस्ती आहे. मंदिराच्या मागे धर्मशाळा आहे, येथे राहण्याची सोय होते.
मंदिर पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याचे फलटण कडील प्रवेशव्दार लागते. गिरवी जाधववाडी या मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट याच दरवाजातून वर येते.

२ बालेकिल्ला :-
गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारी पायवाट दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागते. डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो, तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.( रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश केल्यास डाव्या बाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याच्या बाजूने बालेकिल्ल्यावर जाते.) बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याचे सुंदर बांधीव टाक आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराची रचना गोमुखी पध्दतीची आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बर्‍याच प्रमाणात बुजलेली आहे.किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडतो.
पोहोचण्याच्या वाटा :
वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे. फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत.
वारुगड मुख्यत: दोन भागात विभागला आहे एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे, तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतूच जावे लागते. माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो. तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.
१) फलटण ते गिरवी :-
फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे. गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा. जाधववाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे लागतात.

२) फलटण - दहीवडी मार्गे :-
फलटण - दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २० किमी अंतरावर मोगराळे नावचा फाटा लागतो. या फाट्यापासून एक कच्चा गाडी रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो. मोगराळे ते घोडेवाडी अंतर १५ किमी आहे.

३) फलटण - दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २६ किमी अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते. या गावातून एक कच्चा गाडी रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडीत जातो.

४) एसटीची मुंबई - पुणे - फलटण - वारुगड अशी थेट बससेवा आहे. या बसने मुंबई - पुण्याहून थेट वारूगड माचीवर जाता येते.
राहाण्याची सोय :
वारुगडाच्या माचीवर असणार्‍या भैरबाच्या मंदिरामागील धर्मशाळेत २५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी व हातपंप आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
जाधववाडीतून चालत गडावर जाण्यास दोन तास लागतात.
सूचना :
१) वारुगडावर मुक्काम करायचा झाल्यास अमावास्या टाळावी. दर अमावास्येला पंचक्रोशीतील लोक वारूगडावरील भैरबाच्या मंदिरात जमतात. तेथे भंडारा व रात्रभर भजन चालते. त्यामुळे धर्मशाळेत राहण्यासाठी जागा नसते.

२) वारुगडावर मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी ४० किमी वरील शिवाजी महाराजांचे कुलदैवत, शिखर शिंगणापूरचे मंदिर व परीसर (यात शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजींनी बांधलेला तलाव, मंदिराची भव्य प्रवेशव्दार, शिवाजी-संभाजी-राजाराम महाराजांची समाधी मंदिर) पाहून , २५ किमी वरील महिमानगड पाहाता येतो.

३) महिमानगडाची माहिती साईटवर दिलेली आहे.
डोंगररांग: Sitamai, Man, Taluka
 वारुगड (Varugad)