मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वसई (Vasai) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील सागर किनार्‍य़ाचे प्रादेशिक विभागणी नुसार दोन भाग पडतात, उत्तर कोकण व दक्षिण कोकण. उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई, याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला. वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टी हा सर्व परिसर, समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्वाचा होता. पोर्तुगिजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमांजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३७ ते १७३९ मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरतांना आजही येते.

Vasai Fort
19 Photos available for this fort
Vasai
Vasai
Vasai
इतिहास :
इ.सन १४१४ मध्ये भडारी भेंगाळे नावाच्या सरदाराने हा किल्ला बांधला. इ.स. १५३० मध्ये गुजराताच्या सुलतानाने हा किल्ला त्याच्याकडून जिंकून घेतला. पुढे १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी याचे महत्त्व जाणून पुर्नबांधणीसाठी घेतला. वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगिजांनी बांधायला सुरुवात केली, तेव्हा या कामाला दहा वर्ष लागली. किल्ला दशकोनी आहे व प्रत्येक कोपर्‍य़ावर एक बुरुज आहे. त्याची लांबी रुंदी एक किमी आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात आहे. हा किल्ला जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. एका बाजूस अथांग सागर व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत. सोपर व गोखरावा येथे पूल आहेत, असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे.

मुंबई जवळील साष्टी म्हणजे ’सहासष्टी’ नावाचा प्रदेश होता. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ गेला. त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी आप्पांच्या हातात सोपवली.इ.स. १७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी मोहिम आखली. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ’हर हर महादेवाच्या’ गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले, त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. लढाईत पोर्तुगिजांची ८०० माणसे मारली गेली. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला. किल्ल्यातील बायका मुलांना सुखरुप जाऊ दिले.

पुढे १७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यास सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भुमार्ग या दोन्ही बाजूंनी किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. कर्नल हार्टले कल्याणवरुन हल्ला करणार होता, तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रुला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या ८ किमी गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज व तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली. खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होते. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ तारखेला तोफांची गोळीबारी सुरु झाली. मराठ्यांनी सुध्दा बुरुजावरुन गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले. ७ डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला. त्यामुळे सगळे जण घाबरुन गेले. ९- १० डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला. १० डिसेंबरला २०० मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला १२ डिसेंबरला किल्ला इग्रजांच्या ताब्यात गेला.

पहाण्याची ठिकाणे :
गावापासून किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात उजवीकडे प्रवेशद्वार आहे त्यातून आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायर्‍य़ा आहेत त्यावरुन सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे किल्ल्याला दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज.

येथून पुढे आपण बालेकिल्ल्याकडे जातो. बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत तीन चर्च लागतात. बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे वळावे, समोरच न्यायालयाची इमारत दिसते आणि पलिकडे एक हॉस्पिटल आहे. तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे. त्याच्या पुढे कारागृह आणि वज्रेश्वरी मंदिर आहे. पुढे चिमाजी आप्पांची विजय मिळवल्याबद्दलचे प्रतीक उभारलेले आहे. हे सर्व पाहून मागे फिरायचे आणि बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा. बालेकिल्ल्यात दारु कोठार, सैनिकांची वसतिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत. एका दगडावर कोरलेला शिलालेख सुध्दा आहे बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहिर आहे. प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला महादेवाचे व वज्रेश्वरीचे मंदिर आहे. दोन तासात सर्व गड पाहून होतो.

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील वसई गाठावे. स्टेशनपासुन किल्ला ६ किमीवर आहे . वसई स्टेशन ते किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बसेस,रिक्षा उपलब्ध आहेत.
राहाण्याची सोय :

किल्ल्यात राहण्याची सोय नाही, वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत
जेवणाची सोय :
वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वसई गावात पासून किल्ल्यात जाण्यास १५ मिनीटे लागतात.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Khed   Vasai   10.45   -   

प्रकार: Coastal Forts
 आंबोळगड (Ambolgad)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  दांडा किल्ला (Danda Fort)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गोवा किल्ला (Goa Fort)  जयगड (Jaigad)  कनकदुर्ग (Kanakdurg)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  पूर्णगड (Purnagad)
 राजकोट (Rajkot)  रेवदंडा (Revdanda)  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)
 वसई (Vasai)  वरळीचा किल्ला (Worli Fort)