मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

विलासगड (Vilasgad (Mallikarjun)) किल्ल्याची ऊंची :  3060
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मल्लिकार्जून
जिल्हा : सांगली श्रेणी : मध्यम
सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी गावाजवळ विलासगड हा किल्ला आहे. पण आजूबाजूच्या परिसरात तो विलासगड या नावाने ओळखला न जाता मल्लिकार्जून या नावाने ओळखला जातो. मल्लिकार्जूनाचे मंदिर किल्ल्यावर आहे. मंदिरात या परिसरातील भाविकांची कायम गर्दी असते.

किल्ल्याचा घेर बराच मोठा आहे. या किल्ल्यावरुन बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. पण संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यावर कोणतेही बांधकाम केलेले दिसून येत नाही. त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी केला जात असावा. मुंबई ते विलासगड अंतर ३४३ किलोमीटर आहे. विलासगड सांगली जिल्ह्यात असला तरी कोल्हापूरपासून केवळ ३८ किलोमीटरवर आहे. विलासगदा बरोबर मच्छिंद्रगड, बहदूरवाडी गड (गढी) ही ठिकाण एका दिवसात पाहून होतात.

22 Photos available for this fort
Vilasgad (Mallikarjun)
Vilasgad (Mallikarjun)
Vilasgad (Mallikarjun)
पहाण्याची ठिकाणे :
विलासगड उर्फ़ मल्लिकार्जूनाच्या डोंगरावर जाण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटच्या पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍यां पर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट पायर्‍यांपर्यंत जाता येते. पायर्‍यांच्या मार्गाने अर्धा तास चढल्यावर गड माथ्याच्या खाली असलेल्या मल्लिकार्जूनाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या अलिकडे दोन कमानी असलेली एक इमारत आहे. मंदिराला तटबंदी आणि प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला दोन दिपमाळा दिसतात. त्याच्या पुढे नगारखान्याची इमारत आहे. दिपमाळे समोर भैरवनाथाचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला भांडारगृह आहे. भांडारगृहात आत जाऊन पाहिल्यावर तिथे २ खांबांवर तोललेल लेण आहे. खांबांवर काहीही अलंकरण (कोरीवकाम ) केलेले दिसत नाही. कातळात कोरलेल्या या लेण्याच्या दर्शनी भागात भिंत बांधून त्याचे भंडारगृहात रुपांतर करण्यात आले आहे. भांडारगृहाच्या बाजूला मल्लिकार्जूनाचे मंदिर आहे. हे मंदिर्ही एका लेण्यात असून लेण्याची ओसरी ५ खांबांवर तोललेली आहे. ऑईलपेंट लावून लेण्याचा दर्शनी भाग विद्रुप केलेला आहे. ४ फ़ूट उंच प्रवेशव्दारातून लेण्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मल्लिकार्जूनाची पिंड आहे. त्याचा नंदी मात्र नगारखान्याच्या इमारतीत आहे. लेण ६ खांबांवर तोललेले आहे. लेण्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर सतीशिळा बसवलेली आहे. त्याच्यापुढे एका देवळीत कोटलिंग आहे. एका खांबाला टेकून गणपतीची मुर्ती आणि दुसर्‍या खांबाला टेकून सर्पशिळा ठेवलेली आहे, गाभार्‍यात अजून एक पिंड आहे. मंदिरातून बाहेर येऊन शेजारच्या नगारखान्याच्या इमारतीत शिरल्यावर तल मजल्यावर नंदी आहे, छतावर सुंदर फ़ूल कोरलेले आहे. नगारखान्यात जाण्यासाठी बाहेरुन जीना आहे. मल्लिकार्जून मंदिर परिसर पाहून डाव्या बाजूने बाहेर पडावे. मंदिराला लागूनच चून्याचा घाणा आणि जमिनीत पुरलेल घाण्याचे चाक पाहायला मिळते. या घाण्या जवळूनच गडमाथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांनी ५ मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोरच एक शेड आहे. यात विठ्ठल रखूमाईची मुर्ती आहे. या शेडच्या बाजूला एका दगडी चौथर्‍यावर पूरातन कृष्ण मंदिर आहे. या मंदिराचा कळस विटांनी बांधलेला आहे. मंदिरात कोणतीही मुर्ती नाही. मंदिरा समोरील चौथर्‍यामध्ये एक तळघर आहे. मंदिराची अवस्था एकदम खराब आहे. मंदिराच्या पुढे दोन समाध्या आहेत. त्यातील दुसर्‍या समाधी खाली तळघर आहे. समाध्यांच्या समोर हजरत चाण्द बुखारी बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्याचे सात पिढ्यांपासून सेवक जाधव घराण्यातील आहेत. त्यांचे तेथे वास्तव्य आहे. दर्ग्या समोरील समाध्याही जाधव घरण्यातील सेवकंच्या आहेत असे त्यांने सांगितले. दर्ग्याचा उरुस महाशिवरात्रीला भरतो. दर्ग्याच्या पुढे एक १२ फ़ूट X १० फ़ूटाची दगडी इमारत आहे. या इमारतीला दोन बाजूंना कमानीयुक्त दरवाजे आहेत. इमारतीच्या पुढे एक तळे आहे. या तळ्यात पाणी असते, याठिकाणी घोडे बांधत असत त्यामुळे या तळ्याला घोडतळे म्हणतात. तळ्याच्या पुढे किल्ल्याचे पूर्वेकडील टोक आहे. इथून खाली उतरणारी डोंगरसोंड दिसते.

किल्ल्याच्या या भागात इतर काही अवशेष नाहीत. त्यामुळे मागे फ़िरुन आलो त्या वाटेने श्रीकृष्ण मंदिरापर्यंत यावे. येथून किल्ल्याचे किल्ल्याच्या पश्चिम टोकाकडे उतरत जाणारी पायवाटे दिसते. या पायवाटेने ५ मिनिटे चालल्यावर एक पाण्याचा मोठा पाईप दिसतो. तो ओलांडून पुढे गेल्यावर वाट खाली उतरते. खालच्या बाजूला एक देवळी दिसते . त्या देवळीच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पाय‍र्‍या लागतात. त्या उतरुन गेल्यावर आपण देवळीपाशी पोहोचतो. या देवळीत एक पिंड आहे. पिंडी समोर कातळात कोरलेले टाक आहे. टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. टाक पाहून कातळात कोरलेल्या पायर्‍या चढून वर गेल्यावर पुन्हा आल्या मार्गाने मागे न येता पुढे चालत जावे . डोंगराला वळसा घालून आपण ५ मिनिटात मल्लिकार्जून मंदिरापाशी पोहोचतो. येथे आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडावरुन उत्तरेला मच्छिंद्रगड दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई ते विलासगड अंतर ३४३ किलोमीटर आहे. विलासगड सांगली जिल्ह्यात असला तरी कोल्हापूरपासून केवळ ३८ किलोमीटरवर आहे. विलासगडला जाण्यासाठी मुंबई - कोल्हापूर महामार्गाने पेठ नाका त्या पुढील कामेरी गाव ओलांडल्यावर येडेनिपाणीला जाणारा फ़ाटा आहे, या फ़ाट्यावर मल्लिकाजून मंदिराकडे असा फ़लक लावलेला आहे. या फ़ाट्यावरुन येडेनिपाणी गाव ३ किलोमीटरवर आहे. गावाच्या पुढे मल्लिकार्जून डोंगराकडे जाणारा रस्ता आहे. येडे निपाणीपासून मल्लिकाजून डोंगर म्हणजेच विलासगड ४ किमी अंतरावर आहे. विलासगडच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट पायर्‍यांपर्यंत जाता येते. गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत.
राहाण्याची सोय :
गडावरील मंदिरात २५ जणांची रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ल्यावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Sangli
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  कोळदुर्ग (Koldurg)  मच्छिंद्रगड (Machindragad)
 प्रचितगड (Prachitgad)  रामदुर्ग (Ramdurg)  विलासगड (Vilasgad (Mallikarjun))