मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वाघेरा किल्ला (Waghera) किल्ल्याची ऊंची :  3444
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पेठ, नाशिक
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिकपासून वायव्य दिशेस साधारण ३५ किमी अंतरावर वाघेरा हे गाव लागते. हे गाव सत्ती घाटाच्या तोंडावर आहे. या सत्ती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी वाघेरा किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. पायथ्याच्या वाघेरा गावाच्या नावावरुन किल्ल्याचे नावही वाघेरा असे पडले. गावकरी सांगतात की या किल्ल्यावरुन कश्यप नदीचा उगम होतो आणि ही नदी नंतर गोदावरी नदीला जाउन मिळते.
17 Photos available for this fort
Waghera
Waghera
Waghera
पहाण्याची ठिकाणे :
वाघेरा गावाच्या पुढे वाघेरा धरण लागते. या धरणाच्या काठाने पुढे चालत गेलो की साधारण दहा मिनिटात आपण राजविहीरवाडी या गावी पोहोचतो. राजविहीरवाडी पर्यंत गाडीनेही जाता येते. गावा बाहेरहून एक मळलेली वाट गडावर जाते त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती नाही. साधारण पंधरा मिनिटात आपण एका पठारावर येतो. या पठारावर उजवीकडे एक शेंदूर लावलेली हनुमानाची मुर्ती आहे. येथून पुढची वाट देखील थोडा चढ, मग पठार अशा स्वरुपाची आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक छोटे पॅच आहेत. मारुतीच्या मुर्तीपासून साधारण तासाभरात आपण शेवटच्या पॅचपाशी पोहोचतो. याच्या अलीकडे उजव्या बाजुला एक छोटे टाके आहे. टाके पाहून परत पॅचपाशी यायचे. पॅच सोपा असला तरी थोडा निसरडा आहे, त्यामुळे जरा जपून चढावे लागते. शेवटचा पॅच चढून गेल्यावर समोरच आपल्याला माथ्यावरचा झेंडा दिसतो. या झेंड्याच्या अलीकडे असलेल्या एका खळग्याला गावकऱ्यांनी
शेंदूर लावून देव केले आहे. झेंड्याच्या बाजुला शंकराची पिंड आणि शेंदूर लावलेली विष्णूची मुर्ती आहे़. विष्णूच्या डावीकडे आणखी एक शिर नसलेली मुर्ती असून त्याला देखील शेंदूर लावलेला आहे. झेंड्याची जागा ही गडावरील सर्वात उंच स्थान आहे. येथून डाव्या बाजुला खाली पडक्या वाड्याच्या जोती दिसतात. डावीकडची वाट उतरुन त्या जोतींपाशी जायचे. वाट बरीच निसरडी असल्याने अगदी सांभाळून उतरावी. वाड्याच्या बाजुला पाण्याची अनेक टाकी आहेत. वाड्या वरुन पुढे गेले की एक वाट खाली उतरते. येथे सुस्थितीत असलेल्या कातळ पायऱ्या आहेत. ही गावातून येणारी मुख्य वाट. पण आज ही वाट मळलेली नाही, त्यामुळे वाटाड्या शिवाय या वाटेने जाउ नये. ही वाट गडाच्या अग्नेय दिशेस आहे. पायऱ्या पाहून आपण परत वर वाड्यापाशी यायचे. आणि मगाशी उतरलो तो रस्ता चढून गडमाथ्यावर न जाता वाड्यापासून उजवीकडे वळायचे. पुढील दहा मिनिटात आपण शेवटच्या रॉक पॅच पाशी येतो आणि येथून आलो त्या वाटेने गड उतरतो.
पोहोचण्याच्या वाटा :
नाशिक हरसूल मार्गावर नाशिकपासून साधरण ३५ किमी वर वाघेरा फाटा आहे. फाट्यापासून वाघेरा गाव साधारण ७०० मीटर वर आहे. नाशिक वरुन हरसूल ला जाणाऱ्या एसटीने आपण वाघेरा फाट्या पर्यंत येउ शकतो. किंवा खाजगी वाहनाने आपण थेट राजविहीरवाडी पर्यंत जाउ शकतो.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पाउण तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जून ते मार्च
डोंगररांग: Peth, Nasik
 देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  खैराई किल्ला (Khairai)  रामशेज (Ramshej)  सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))
 वाघेरा किल्ला (Waghera)