मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate)) किल्ल्याची ऊंची :  265
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : सोपी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अर्जुना नदी (खाडी) काठी नाटे गावाजवळ यशवंतगड नावाचा किल्ला आहे .मुसाकाजी हे बंदर या किल्ल्यापासून जवळच आहे .या बंदरात उतरणारा माल छोट्या होड्या मधून अर्जुना नदी पात्रातून राजापूर बंदरात जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्रावर आंबोळगड आणि खाडीवर यशवंतगड हे किल्ले बांधण्यात आले होते. ऱाजापूर बंदरातही इंग्रजांनी किल्ला वजा वखार बांधलेली होती .

खाजगी वाहानाने राजापूरची वखार , धुतपापेश्वर मंदिर , साटवलीचा किल्ला , यशवंतगड (नाटे) आंबोळगड आणि पूर्णगड पाहून रत्नागिरीला मुक्कामाला जाता येते.
17 Photos available for this fort
Yashwantgad(Nate)
पहाण्याची ठिकाणे :
नाटे गावातून आंबोळगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याला लागूनच यशवंतगड किल्ल्याची तटबंदी आणि भगवा झेंडा लावलेला बुरुज दिसतो. किल्ल्याजवळ पोहोचल्यावर ४ फुट रुंद आणि ६ फुट खोल खंदक खणून किल्ला मुख्य जमिनीपासून वेगळा केलेला पाहायला मिळतो. शत्रू थेट किल्ल्याच्या तटाला भिडू नये यासाठी अशाप्रकारचे खंदक खोदले जातात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी डाव्या बाजूला पठाराच्या टोकापर्यंत जावे लागते. येथून खंदकात उतरुन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. पण किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी खंदकातून झेंडा लावलेल्या बुरुजाकडे जावे . सर्वप्रथम आपल्याला सिध्द पुरुषाचे मंदिर दिसते . पुढे गेल्यावर खंदकाच्या भिंतीवर कोरलेला हनुमान आणि त्याच्या बाजूला दिवा लावण्यासाठी बनवलेला कोनाडा पाहायला मिळतो. हनुमंताचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर खंदकात खोदलेली आयताकृती विहीर पाहायला मिळते . विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत . विहिरीचे पाणी खंदकात न उतरता किल्ल्यात आणण्यासाठी झेंडा लावलेल्या बुरुजावर दोन दगडी खांब लावलेले आहेत. या खांबांवर आडवा लाकडी खांब ठेउन त्यावर कप्पी लावून विहिरीतील पाणी वर ओढता येत असे . आजही आपल्याला बुरुजाच्या बाहेर आलेले खांब पाहायला मिळतात.

खंदकातील या सर्व गोष्टी पाहून आल्या मार्गाने परत प्रवेशव्दारापाशी यावे. याठिकाणी दोन बुरुजात लपवलेले प्रवेशद्वार आहे . या प्रवेशव्दाराची कमान ढासळलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत . पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बुरुज बांधलेला दिसतो. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अशा प्रकारचा किल्ल्यात असलेला सुटा बुरुज भूईकोट किल्ल्यात तसेच सिंधुदुर्ग सारख्या सागरी किल्ल्यात पाहायला मिळतो. या बुरुजाचा उपयोग किल्ल्यात सर्व ठिकाणी तसेच किल्ल्याच्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी होतो. यशवंतगड हा किल्ला दोन भागात विभागलेला आहे. एक भाग पठारावर आणि दुसरा पडकोटाचा भाग खाडी पर्यंत पसरलेला आहे . आज किल्ल्यात झाडी माजल्याने आपल्याला आज या बुरुजावरून खाडी पर्यंतचा परिसर दिसत नाही . एकेकाळी या बुरुजावर अजून बांधकाम असण्याची शक्यता आहे .बुरुज पाहून खाली उतरुन समोरच्या तटबंदीवर चढून झेंडा लावलेल्या बुरुजावर जाता येते . झेंडा बुरुज पाहून खाली उतरल्यावर दोन कोठारे आणि एक विहिर आहे . हे सर्व पाहून परत सुट्या बुरुजापाशी येउन बुरुज उजव्या बाजूला ठेउन झाडीतून खाली उतरल्यावर पडकोटाचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा आजही शाबूत आहे. या दरवाजावर गणपती आणि कमळफुले कोरलेली आहेत. पडकोटात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला असल्येल्या तटबंदी पर्यंत जावे. ही तटबंदी पठारावर पसरलेली असून त्याच्या बाहेरच्या बाजूस खंदक आहे. तटबंदी जेथे संपते त्याठिकाणी बुरुज आहेत. बुरुजांपासून तटबंदी खाली उतरत थेट खाडी पर्यंत उतरलेली आहे . पडकोटात आमराई आणि दाट झाडी माजल्याने टोकांच्या बुरुजांपर्यंत जाता येत नाही . त्यामुळे आमराईतून खाडीपर्यंत उतरणाऱ्या पायऱ्याच्या मार्गाने खाली उतरावे . याठिकाणी एक विहीर आहे . विहिरीच्या बाजूने खाडीवरील तटबंदीवर जावे . या ठिकाणी आल्यावर आपल्याला किल्ला या जागी का बांधला त्याचे प्रयोजन कळते. तटबंदीवरुन टोकाच्या बुरुजावर असलेल्या पत्की यांच्या घरापर्यंत यावे . या ठिकाणी आता कोणी राहात नाही. परंतु हा किल्ला पक्ती यांच्या खाजगी मालकीचा आहे . घराच्या समोर एक विहीर आहे.

हे सर्व अवशेष पाहून परत आल्या मार्गाने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते .
पोहोचण्याच्या वाटा :
रत्नागिरीहून पावस - आडीवरे - नाटे यामार्गे अथवा राजापूर- नाटे यामार्गे गडावर जाता येते. रत्नागिरीहून आणि राजापूर या दोन्ही ठिकाणहून नाटेला जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. नाटे गावात उतरुन चालत १५ मिनिटात किंवा रिक्षाने गडा पर्यंत जाता येते. आंबोळगडला जाणार्‍या एसटीने गेल्यास थेट किल्ल्यासमोर उतरता येते.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही, आंबोळगड गावातील ऋषी पर्यटनात राहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. नाटे येथे जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गावातून गडावर चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळा सोडुन वर्षभर गडावर जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: Y
 यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))  यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))