मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

धारूर (Dharur) किल्ल्याची ऊंची :  २४७२
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बीड श्रेणी : सोपी
बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्वाचे शहर आहे. सातवहानांच्या काळापासून एक संपन्न व्यापारी पेठ म्हणून हे शहर प्रसिध्द होते. राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली किल्ला मजबूत केला. धारूर किल्ला हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात असल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत नांदता होता.त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बर्यापैकी शाबूत आहेत.
धारूर किल्ल्या बरोबरच आबेजोगाईचे मंदिर, लेणी, धर्मापूरीचा किल्ला व प्राचीन केदारेश्वर मंदिर ही ऎतिहासिक ठिकाण स्वतःचे वहन असल्यास एका दिवसात पहाता येतात.


Dharur Fort
36 Photos available for this fort
Dharur
इतिहास :
प्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या धारूर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर वर्चस्व असणार्या राष्ट्रकुटांनी धारूरचा येथे किल्ला बांधला गेला. "महादुर्ग" नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे. त्यावेळी साधे दगड एकमेकांवर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली होती. राष्ट्रकुट राजा गोविंद (तिसरा) (इ.स.७९३-८१४) याच्या एका दानपत्रात धारऊर अशी नोंद आहे. त्यानंतर , चालुक्य (कल्याणी), देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती.

यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात धारूर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील धारूर, उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. बरीदशाहीच्या सीमा आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही या तीन शाह्याना लागून होत्या. बरीद शाही नष्ट करण्यासाठी या तीनही शाह्यांनी प्रयन्त केले. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात अनेक लढाया झाल्या.

बरीदशाहीच्या पाडावा नंतर या भागाच्या हक्का वरून आदिलशाही व निजामशाही यांच्यात अनेक लढाया झाल्या. त्यावेळी धारूरच्या किल्ल्याचे महत्व ओळखून आदिलशहाचा स्थापती/सरदार किश्वरखान लारी याने हिजरी ९७५ (इ.स. १५६७) जून्या "महादुर्गाच्या" जागी त्याचेच दगड वापरून नविन किल्ला बांधला तोच आजचा धारुरचा किल्ला होय. धारूर किल्ल्याच्या उभारणी मूळे किश्वरखानाची आदिलशाहाच्या दरबारात प्रतिष्ठा वाढली. त्याबरोबरच त्याचे अंतर्गत शत्रूही वाढले.धारूर किल्ल्याच्या उभारणीमूळे निजामशाहीला शह बसला होता. त्यामूळे पूर्ण निकराने त्याने धारूरवर हल्ला चढवला. त्यावेळी किल्ल्यात ५००० सैन्य होते. किश्वरखानाने आदिलशहाकडे कुमक मागवली. पण त्याच्या अंतर्गत शत्रूंनी किश्वरखानाला मदत वेळेत पोहोचणार नाही याची काळजी घेतली. त्यामूळे हिजरी ९७७ (इ.स. १५६९) मध्ये अहमदनगरच्या मूर्तूजा निजामशहाने किश्वरखानाची हत्या करून धारूरचा किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्याचे " फतेहबाद" असे नवे नामकरण केले. इ.स.१६०१ मध्ये मोगलांनी अहमदनगरवर ताबा मिळवला आणि निजामशाहीच्या अस्तास सुरुवात झाली. इ.स.१६३०-३१ मध्ये शहाजहानचा सेनापती आझमखानाने धारूर किल्ला ताब्यात घेतला. या विजयाचे प्रतिक म्हणून एक नाणे काढले. शहाजहान नंतर जहांदारशहा पर्यंत (हिजरी १०२८ ते ११३१) १०० वर्षे या किल्ल्यातील टाकसाळीतून नाणी पाडली जात होती.

पन्हाळ्याच्या युध्दाच्या वेळी शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात झालेल्या मतभेदा नंतर नेताजी पालकर मोगलांना जाऊन मिळाला. त्यानंतर नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात रहात होते. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून पलायन केल्यावर औरंगजेबाच्या आदेशानुसार जयसिंगाने नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात अटक केली.

उदगीर येथे इ.स. ३ फेब्रुवारी १७६० रोजी मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली. या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी केले. या लढाईत निजामाला मदत करण्यासाठी सुलतानजी निंबाळकर, मोमीनखान, लक्ष्म्णराव खंडागळे इत्यादी सरदार १५ हजारांची फौज घेऊन निजामाला मदत करण्यासाठी औरंगाबादहून निघाले. पण सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी राणोजी गायकवाडला त्यांच्य मागावर पाठवले.त्यामूळे त्यांनी धारूरच्या किल्ल्याचा आश्रय घेतला व ते तेथेच अडकून पडले. मराठ्यांनी लढाईत निजामाच्या सपशेल पराभव केला. निजामाने औसा मार्गे धारूरला पळ काढला. ११ मार्च १७९५ ला झालेल्या खर्ड्याच्या लढाईनंतर धारूर किल्ला काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता . त्यानंतर हा किल्ला निजामाने पुन्हा जिंकून घेतला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत धारूर किल्ला निजामाच्या ताब्यात होता.
पहाण्याची ठिकाणे :
धारूर गावातून गाडीने आपण थेट किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे आपण त्याला भूईकोट म्हणत असलो तरी, किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. त्यामूळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे. तर उरलेल्या चौथ्या बाजूने म्हणजेच, गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४.२ मीटर रूंद व ४.५ मीटार खोल खंदक खोदलेला आहे. ह्या खंदकाची व्याप्ती किल्ल्याच्या दोनही बाजूंना असलेल्या दर्यांपर्यंत आहे. खंदकात पाणी साठून रहण्यासाठी दरीच्या बाजूने खालपासून भिंत बाधून काढलेली आहे. या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला "सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी" म्हणतात. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात जाता येते.

धारूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूच्या खंदकात उतरून अष्टकोनी बुरुजाजवळ जावे. या बुरुजाला हाथी बुरुज म्हणतात. या बुरुजावर दोन शरभाची शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे. हत्तीच्या डाव्या बाजूच्या शरभाच्या पुढील पायात २ हत्ती दाखवलेले आहेत. तर शरभाच्या मागे ढाल तलवार घेतलेला योध्दा कोरलेला आहे. या शरभाच्या वरच्या बाजूला व बुरुजा वरील झरोक्या (जंगीच्या) खाली तीन लिपींमध्ये कोरलेला शिलालेख आहे. त्यातील पहीली ओळ अरबी, दुसरी ओळ फारसी व तिसरी ओळ देवनागरी लिपीत कोरलेली आहे.

हत्ती बुरूज पाहून किल्ल्यात प्रवेश करतांना दोन संरक्षक बुरूज लागतात. त्यातील डाव्या बाजूच्या बुरुजाला "फतेह बुरूज" म्हणतात. या बुरुजावर १० इंच रूंद व १२ फूट लांब आकाराचा ३ ओळीचा फारसी शिलालेख जमिनी पासून १० फूट उंचीवर बसवलेला आहे. या दोन बुरुजांमधून ४ मीटर रूंदीची वाट एक वळसा घेऊन पहील्या प्रवेशव्दारापाशी पोहोचते. पहीले प्रवेशव्दार पूर्वाभिमुख असून ३.५ मीटर रूंद व ८ मीटर उंच आहे.या दरवाजातून आत गेल्यावर दोनही बाजूंना पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. समोरच्या बाजूस ३ बूरूज आहेत. त्यापैकी उजव्या बाजूच्या बुरुजाला "टाकसाळ बुरुज" म्हणतात. या ठिकाणी नाणी पाडण्याची टाकसाळ होती. पहिल्या प्रवेशव्दाराच्या काटकोनात दुसरे उत्तराभिमूख प्रवेशव्दर आहे.३.८ मीटर रूंद व १० मीटर उंच असलेल्या या प्रवेशव्दारावर फूलांची नक्षी आहे. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजुस घोड्यांच्या पागा पहायला मिळतात पुढे भव्य शाही बुरुज दिसतो. या बुरुजावर जण्यासाठी रुंद जीने आहेत. बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी ८ झरोके आहेत. बुरुजाला ११ चर्या आहेत. बुरुजातून खाली उतरण्यासाठी एक छोटा जीना आहे. या जिन्याच्या शेवटी एक कोली आहे. या खोलीला दोन झरोके आहेत. एका झरोक्यातून किल्ल्याच्या परीसरावर नजर ठेवता येते तर दुसर्या झरोक्यातून गोडी दिंडी या किल्ल्यातील मुख्य तलावावर नजर ठेवता येते.

शाही बुरुजावरून खाली उतरून डावीकडे गेल्यावर आपण "गोडी दिंडी" या किल्ल्यातील मुख्य तलावापाशी येतो. हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरून काढलेला आहे. या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्यापलिकडे खंदक आहे. तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत (४० मीटर लांब ७ मीटर रुंद व १२ मीटर उंच) दरीतून बांधून काढलेली आहे.या तलावा़च्या पश्चिम टोकाला "कोट तलाव बुरुज" हा आहे या बुरुजावरुन दरी वर लक्ष ठेवता येते. या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता हा तलाव जून्या महादुर्ग किल्ल्याच्या वेळी खोदला असावा, कारण राष्ट्रकुटांच्या काळात प्रस्तर खोदण्याची कला पूर्ण विकसित झाली होती. गोडी दिंडी या तलावाचा उपयोग किल्ल्याला दोन प्रकारे होत होता. संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण व इतर वेळी वर्षभर पाणी पुरवठा करणारा तलाव. गोडी दिंडीच्या किल्लाच्या आतील बाजूच्या तटबंदीत पहारेकर्यांसाठी ८ खोल्या बनवलेल्या पहायला मिळतात. या खोल्या पाहून प्रवेशव्दाराकडून येणार्या मुख्य रस्त्याला लागल्यावर उजव्या बाजूला एक दगडात बांधलेला मनोरा (उच्छवास) येथे पहाता येतो. पूर्वीच्या काळी किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी किल्ल्याबाहेरील तलावापासून जमिनीत चर खोदून मातीचे पाईप टाकले जात व पाण्याची समपातळी राखण्यासाठी मधेमधे दगडात बांधलेले मनोरे बांधलेले असत. त्यापैकी एक मनोरा (उच्छवास) येथे पहाता येतो.

या मनोर्याच्या मागे मशिद आहे. मशिदीच्या दरवाजाच्या कमानीवर एक ३ ओळीचा फारसी शिलालेख आहे. आत एक कबर व हौद आहे. मशिदीच्या मागे पाण्याचा तलाव आहे. मशिदीवरून पुढे चालत गेल्यावर एका झाडाखाली पीराच थडग आहे. त्याला सैयद सादत दर्गा म्हणतात. या दर्ग्याच्या मागे बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारच्या समोरच पाण्याची समपातळी राखण्यासाठी दगडात बांधलेले मनोरे (उच्छवास) दिसतात.

प्रवेशव्दारच्या आतील बाजूस वास्तूंचे अवशेष आहेत.पुढे गेल्यावर हमामखाना आहे. तिथेच एक तीन स्तर असलेला तरण तलाव आहे. त्यात उतरण्यासाठी एका बाजूने पायर्या आहेत.पायर्यांजवळ तलावाची खोली कमी आहे. हा भाग लहान मुलांसाठी असावा. त्यापुढे असलेल्या भागाची खोली आधीच्या भागापेक्षा थोडी जास्त आहे, हा भाग राजस्त्रीयांसाठी असावा. त्यापुढील भाग सर्वात खोल असून तो राजपुरुषांसाठी असावा. या तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे. किल्ल्या बाहेरील तलावातून खापरी पाईपांच्या व्दारे आणलेले पाणी या तरण तलावात सोडले जात असे. या तलावापासून तटबंदीच्या दिशेने वर चढून गेल्यावर हवामहाल आहे. या हवामहालाच्या खालच्या बाजूला सोलापूर/खारी दिंडी आहे. या दिंडीत एक चोरदरवाजा आहे. तरण तलावाच्या पुढे अजून एक तलाव आहे.या तलावांच्या परीसरात पूर्वीच्या काळी फूलबागा होत्या, त्यांच्यासाठी आखलेले चौकोन पहायला मिळतात.

किल्ल्याच्या पश्चिम टोकाला दरीच्या बाजूला असलेले पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार व देवड्या आहेत. येथून तटबंदीच्या कडेकडेने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराकडे येतांना एक दोन मजली उध्वस्त वास्तू दिसते. तीला "रंगमहाल" या नावाने ओळखले जाते. या वास्तू समोर हौद, कारंजे व शाही हमामाचे अवशेष पहायला मिळतात. पुढे थोड्याच अंतरावर जमिनीत तेल- तुपाचे टाक आहे. येथून मुख्य प्रवेशव्दाराकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

याशिवाय धारूर-केज रस्त्यावर केज पासून १५ किमीवर व धारूरच्या अलिकडे २ किमीवर मैजवाडी नावाचे गाव आहेत. या गावात ३ पूरातन कबरी व एक मंदिर आहे. यातील सर्वात मोठ्या कबरीच्या दरवाजावर फारसी शिलालेख कोरलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबई, पुण्याहून धारूरला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. किल्ला धारुर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलिस स्टेशनच्या मागे आहे. तेथ पर्यंत चालत जाता येते किंवा वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई. पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - केज -धारुर किंवा लातूर -आंबेजोगाई -धारूर या मार्गे ८५ किमी वरील धारूर गाठावे.
३) मुंबई. पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धारूर ३४ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.
राहाण्याची सोय :
धारूर गावात काही लॉज आहेत. पण त्यापेक्षा आंबेजोगाई आणि परळी वैजनाथ येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय :
धारूर गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ला पहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात.
सूचना :
१) धारूर - आंबेजोगाई रस्त्यावर धारूर पासून १२ किमीवर आडस नावचे गाव आहे. या गावात एक पडकी गढी पहायला मिळते.
२) धारूर पासून २५ किमीवर असलेल्या आंबेजोगाई येथे प्राचीन हिंदू लेणी (हत्तीखाना) व योगेश्वरी मंदिर पहायला मिळते.
३) आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी गावात किल्ला व प्राचीन केदारेश्वर मंदिर पहायला मिळते.
४) आंबेजोगाई पासून २५ किमी अंतरावर परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक जोर्तिलिंग आहे.
५) धर्मापूरी किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.

Adaskaranchi Garhi
डोंगररांग: None
 आड (Aad)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)
 अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बांदा किल्ला (Banda Fort)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)
 बाणकोट (Bankot)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भवानगड (Bhavangad)
 भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूषणगड (Bhushangad)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 कुलाबा किल्ला (Colaba)  दांडा किल्ला (Danda Fort)  दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  घारापुरी (Gharapuri)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  गोवा किल्ला (Goa Fort)
 होन्नुर किल्ला (Honnur Fort)  इंद्रगड (Indragad)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जयगड (Jaigad)
 जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  जंजिरा (Janjira)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कलाडगड (Kaladgad)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खांदेरी (Khanderi)  खारेपाटण (Kharepatan fort)
 खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोर्लई (Korlai)  कोटकामते (Kotkamate)  माचणूर (Machnur)
 मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मंगळवेढा (Mangalwedha)  माणिकगड (Manikgad)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)
 नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))
 नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पालगड (Palgad)  परांडा (Paranda)
 पारडी किल्ला (Pardi Fort)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 पिंपळास कोट (Pimplas Kot)  प्रचितगड (Prachitgad)  पुरंदर (Purandar)  पूर्णगड (Purnagad)
 रायकोट (Raikot)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))
 राजकोट (Rajkot)  रामदुर्ग (Ramdurg)  रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)
 सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))
 सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुरगड (Surgad)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  टकमक गड (Takmak)
 तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  थाळनेर (Thalner)  तोरणा (Torna)  उंदेरी (Underi)
 वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वसई (Vasai)  विजयदुर्ग (Vijaydurg)
 वरळीचा किल्ला (Worli Fort)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))