मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कोरीगड (कोराईगड) (Korigad) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.पावसाळ्यानंतरचा काळ या भागात ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे.
8 Photos available for this fort
Korigad
Korigad
Korigad
इतिहास :
या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात. इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग,तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला. ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला. मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला.
पहाण्याची ठिकाणे :
पेठशहापूरच्या वाटेने वर येतांना पायवाट संपल्यावर पायर्‍या लागतात. पायर्‍या चढतांना उजव्या बाजूला दोन खांबांवर तोललेली एक गुहा आहे. या गुहेच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तेथे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पुढे पायर्‍या चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा आहे. या गुहेच्या समोर खालच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. गुहा आणि टाक पाहून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याचा गणेश दरवाजापाशी येतो. या पश्चिमाभिमुख गोमुखी दरवाजाच्या संरक्षणासाठी चार बुरुजांची योजना केलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते याठिकाणी असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उध्वस्त झालेला आहे.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर भलेमोठे पठार दिसते. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या गडाला साधारणत… दीड किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. गणेश दरवाजाने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात ४ ओतीव तोफ़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या मागे दोन तलाव आहेत. तलावांजवळ वाड्यांचे अवशेष आढळतात. फ़ांजी वरुन उत्तर टोका कडील बुरुजाच्या दिशेने चालत जावे. उत्तर टोका वरील या बुरुजावर झेंडा लावलेला आहे. या बुरुजावरुन दूरवरचा प्रदेश दिसतो. तसेच पेठ शिवापूर गावातून येणारी वाट दिसते.

उत्तर बुरुजा वरुन पुन्हा महादेव मंदिरापाशी येउन दक्षिणेकडे पुढे गेल्यावर हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या मागे कातळात कोरलेला छोता तलाव आहे. या तलावाच्या बाजूने तटबंदी लगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एका चौथर्‍यावर उभारलेली लक्ष्मी तोफ़ पाहायला मिळते. या तोफ़ेच्या पुढे गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणत… चार फूट आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. त्याच्या बाजूला एक महिषासूर मर्दीनीची मुर्ती कोरलेला दगड आहे. कोराई देवी मंदिराच्या पुढे खालच्या बाजूला दोन बुरुजांच्या मध्ये गडाचा दुसरा दरवाजा आहे. आंबवणे गावातून येणारी वाट या दरवाजातून येते. हे प्रवेशव्दार पाहून गणेश दरवाजाकडे चालत निघाल्यावर वाटेत एक तोफ़ आहे . जागोजागी उध्वस्त वाड्यांचे अवशेष आहेत. गणेश दरवाजापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड पाहाण्यासाठी एक तास लागतो. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, असा सर्व परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
सद्य…स्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.
१ पेठशहापूर मार्गे:-
कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आयएनएस शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा (ऍम्बी व्हॆली) सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, (आयएनएस शिवाजीच्या) पुढे १६ कि.मी वरील पेठशहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायर्‍यांपाशी घेऊन जाते. पायर्‍यांच्या सहाय्याने पाऊण तासात गडावर पोहोचता येते.

पेठशहापूर गाव बाहेर मुख्य रस्त्यावर वहानतळ उभारलेला आहे. या वहानतळच्या पुढे २ मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने १० मिनिटे चढल्यावर आपण सपाटीवर येतो. येथून किल्ल्याला वळसा घालून जंगलातील पायवाटेने १० मिनिटात पायर्‍यांपाशी पोहोचता येते. पायर्‍यांच्या सहाय्याने २० मिनिटात गडावर पोहोचता येते.

दोन्ही मार्गांनी गडावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.


२ आंबवणे गाव मार्गे:-
आंबवणे गाव हे पेठशहापूर गावाच्या अलिकडे आहे. कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून एका तासात गडावर जाता येते.

राहाण्याची सोय :
पेठशहापूर गावातील हनुमान मंदिरात आणि आंबवणे गावातील महादेव मंदिरात राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. पेठशहापूर गावातील हॉटेलात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
गडावरील तळ्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणार्‍या वाटेवर एक टाके आहे. त्यातील पसणी पिण्या योग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पेठशहापूर मार्गे पाऊण तास लागतो. आंबवणे गाव मार्गे एक तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
डोंगररांग: Lonavala
 कोरीगड (कोराईगड) (Korigad)  लोहगड (Lohgad)  मोरगिरी (Morgiri)  मृगगड (Mrugagad)
 राजमाची (Rajmachi)  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  तैलबैला (Tailbaila)
 तिकोना (Tikona)  तुंग (Tung)  उंबरखिंड (Umberkhind)  विसापूर (Visapur)