मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

परांडा (Paranda) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : उस्मानाबाद श्रेणी : सोपी
मराठवाड्याच्या भूमीत काही भरभक्कम किल्ले आजही उभे आहेत. त्यापैकी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात असलेला परांडा किल्ला हा एक अप्रतीम भुईकोट आहे. हा प्राचीन किल्ला आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे. यावर असणार्‍या विवीध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. परांडा या तालुक्याच्या गावात हा किल्ला असल्यामुळे फारसे श्रम न करता हा सुंदर किल्ला पाहाता येतो.
62 Photos available for this fort
Paranda
पहाण्याची ठिकाणे :
परांडा बस स्थानाका समोरील घरांच्या गर्दीतून वाट काढत आपण परंडा किल्ल्यापाशी पोहोचतो. या किल्ल्याला सर्व बाजूंनी बांधीव खंदक आहे. या खंदकावर सध्या तयार केलेल्या पक्क्या पूलावरून आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. पूर्वीच्याकाळी खंदकावर पूल होता .वेळप्रसंगी तो काढून ठेवता येईल अशी सोय केलेली होती. भूईकोट किल्ला असल्याने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदीत बुरुजांची माळ ओवलेली आहे. गडाचे पहिले उत्तराभिमुख प्रवेशव्दार खूप भव्य आहे. प्रवेशव्दाराच्यावर सज्जे असून त्यात जंग्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. किल्ल्यात फ़िरतांनाही तटबंदीत अनेक ठिकाणी देवळंचे दगड वापरलेले पाहायल मिळतात, किल्ल्याच्य प्रवशेव्दाराला नविन लाकडी दारे बसवलेली आहेत. पहिल्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर अंधारा कमानदार बोळ लागतो तो पार करुन उजवीकडे वळल्यावर दुसरे दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार लागते. यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तटबुरुज वेढलेल्या जागेत येतो. बुरुजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसविलेल्या दिसतात. पहिल्या व दुसर्‍या दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. वर चढून गेल्यावर दरवाजाच्या वरच्या बाजूस डाव्या बाजूला तटबंदीत वीरगळाचे अवशेष दिसतात. ते पाहून खाली उतरून पुढे उजवीकडच्या बाजूला किल्ल्याचा तिसरा पूर्वाभिमुख दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठा बुरुज आडवा येतो. याला डावीकडे वळसा घालून किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये जाता येते. डावी कडे वळल्यावर तटबंदीच्या आडोशाला पहारेकर्‍यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात. येथे डाव्या बाजूच्या भिंतेंतीवर देवळातली कोरीव शिल्प पाहायला मिळतात. देवड्र्‍यांच्या समोरच्या तटबंदीच्या बेचक्यातून वाट पुढे जाते ती थेट महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते. या वाटेने जातांना आपल्या दोन्ही बाजूला ४० फुटांची तटबंदी लागते. बुरुजापासून वाट उजवीकडे वळते तिथे किल्ल्याचा चौथा भव्य महाकाय असा उत्तराभिमुख दरवाजा आहे.

चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० ते ५० फुट असावी आणि बाजूला असणार्‍या बुरुजांची उंची तर जवळजवळ ६० फुट भरेल. दरवाजावर एक फ़ारसी शिलालेख आहे. दरवाज्याच्या समोर एक ५० फुट खोल अशी विहीर आहे. कमानीच्या समोरच एक महाकाय बुरुज आहे. त्यावर जवळजवळ २० फुट लांबीची तोफ आहे. येथे जाण्यासाठी दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे लागते. चौथ्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उअजवीकडे पाचवा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. त्यातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी मशिद आहे. खरे पाहाता ही मशीद म्हणजे पूर्वीचे माणकेश्वर मंदिर होते. आतमध्ये असणारे ३६ दगडी खांब, रचना या सर्व गोष्टी ते मंदिर असल्याची साक्ष देतात. या मशिदीच्या समोर वजू करण्यासाठी तलाव आहे. मशिदीवर जाण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था केलेली आहे. वर चढून गेल्यावर आजूबाजूचा परिसर दिसतो. मशीदीत येण्यासाठी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे छोटे दरवाजे आहेत. ४ छोटे मिनार मशीदीवर आहेत. मशीद पाहून समोर दिसणार्‍या पायर्‍यांनी वर चढायला सुरुवात केली की आपण चौथ्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजावर पोहोचतो. येथे एक पंचधातूची अप्रतिम तोफ़ आहे. या २० फुटी लांबीच्या तोफ़ेच नाव ‘मलिक ए मैदान’ असे आहे. तोफ़ेवर अरबी भाषेतील पाच लेख आहेत. त्यातील एक लेख तोफ़ेच्या तोंडावर कोरलेला आहे. तोफ़ेच्या मागच्या बाजूला पाकळ्यां सारका आकार दिलेला आहे. तोफ़ेवर दोन छोट्या सिंहाच्या मुर्ती आहेत. तोफ़ असलेल्या बुरुजाच्या बाजूला चौथ्या दरवाजाच्या वर असलेला नगारखाना आहे.

तोफ़ पाहून तटबंदीवर उतरून फ़ांजीवरुन चालायला सुरुवात करावी. तोफ़ेच्या बुरुजापासून तिसर्‍या बुरुजावर मोठी तोफ़ आहे. तिसर्‍या आणि चौथ्या बुरुजाच्या मध्ये आतील आणि बाहेरील तटबंदीच्या मध्ये शंकराचे देऊळ आहे. ( ते पाहाण्यासाठी तिसर्‍या प्रवेशव्दारा पुढील देवड्यांजवळून मार्ग आहे.) पुढे चालत गेल्यावर ८ व्या बुरुजावर एक मोठी तोफ़ आहे. पुढे दहाव्या बुरुजावर एक कमान असलेली छोटी इमारत आहे. तो हवामहाल असावा. बाराव्या बुरुजवर एक मोठी बांगडी तोफ़ आहे. तोफ़ेच तोंड मगरीच्या आकाराचे आहे. या तोफ़ेला दोन्ही बाजूला कड्या आहेत. तोफ़ पाहून फ़ांजीवरून खाली उतरणार्‍या पायवाटेने आपण गणपती मंदिरापाशी येतो. मंदिरात गरुडावर बसलेल्या विष्णूची मुर्ती आहे. त्याच्या पायाशी लक्ष्मी बसलेली आहे. मंदिराच्या बाहेर काही वीरगळ आहेत. मंदिरासमोर एक समाधी असून त्याला लागून भैरवाची मुर्ती आणि वीरगळ आहे. मंदिराच्या खांबांच्या खुणा येथे पाहायला मिळतात. मंदिराला असलेल्या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला एक मोठी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विहिरीत अनेक कोनाडे आहेत. विहिरीच्या समोर एक लालवीटांनी बांधलेली इमारत आहे. त्या इमारतीच्या मागे हमामखाना आहे. हमामखान्यात अनेक सुंदर मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात एकमुखी लिंग, ४ फ़ुट उंचीची गणपतीची मुर्ती, पाच फ़ण्याच्या नागदेवतेची मुर्ती,पार्श्वनाथाची ३ फ़ुटी मुर्ती, गध्देगळ आणि वीरगळ पाहायला मिळतात.

हमामखाना पाहून बाहेर पडल्यावर समोरच दारूखान्याची इमारत आहे. त्यात बांगडी तोफ़ांचे काही तुकडे आणि पंचधातूची तोफ़ ठेवलेली आहे. त्याच्या मागे असणार्‍या खोलीत असंख्य तोफगोळे पडलेले दिसतात. दारुखाना पाहून मशिदीपाषी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला फिरण्यास दोन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
परांडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते उस्मानाबाद आणि सोलापूर यांच्या हद्‌दीवर येते.
रेल्वेने :- १) मुंबई - सोलापूर मार्गावरील कुर्डूवाडी हे जवळचे स्टेशन आहे. कुर्डूवाडीहून परांडा २२ किमीवर आहे. कुर्डुवाडी ते परांडा अशी बससेवा दर अर्ध्यातासाला आहे.
२) मुंबई - लातूर मार्गावरील बार्शी हे जवळचे स्टेशन आहे. बार्शी - परांडा २७ किमी अंतर आहे.
रस्त्याने :- सोलापूरहून बार्शी मार्गे परांडाला यायला बर्‍याच एसटी बसेस आहेत. पूण्याहून भूमला जाणारी गाडी परांड्याला जाते. परांडा गावातच किल्ला आहे.

राहाण्याची सोय :
परांडा गावात राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
परांडा गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पाणी नाही.
जिल्हा Usmanabad
 नळदुर्ग (Naldurg)  परांडा (Paranda)