मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) किल्ल्याची ऊंची :  3100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कर्जत
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे. राजमाची आणि ढाक किल्ल्र्‍यांच्या आणि सिध्दगड, भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा उभारून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

या किल्ल्याला पायथ्याच्या ’पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळा असाही आढळतो. लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.
3 Photos available for this fort
Peth (Kothaligad)
इतिहास :
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.

दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.

गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.


पहाण्याची ठिकाणे :
पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायर्‍यांचे व प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. पुढे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत ४५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.

गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत.पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहे. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो.

गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते. याशिवाय गडावर प्रवेशव्दाराच्या उजवीकडे खाली उतरल्यावर तसे गावात मारुती मंदिरा जवळ तोफ पाहायला मिळते.

पोहोचण्याच्या वाटा :
१)कर्जतहून एस्‌टी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण ३० किमी आहे.
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌टी पकडून आंबिवली गावात यावे.
आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ‘ हे गाव आहे या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते.
राहाण्याची सोय :
भैरोबाच्या गुहेत २० - २५ जण व्यवस्थित राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपणच करावी. पेठ गावात ‘कोथळागड’ नावाचे हॉटेल आहे.
पाण्याची सोय :
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आंबिवली गावापासून २ तास लागतात, तर पेठ गावापासून १ तास लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: P
 पाबरगड (Pabargad)  पदरगड (Padargad)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))  पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))
 पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)
 पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)  पारगड (Pargad)  पारोळा (Parola)
 पाटेश्वर (Pateshwar)  पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)  पेडका (Pedka)
 पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिसोळ किल्ला (Pisol)
 प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  प्रबळगड (Prabalgad)  प्रचितगड (Prachitgad)  प्रतापगड (Pratapgad)
 पुरंदर (Purandar)  पूर्णगड (Purnagad)