मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पिंपळा (Pimpla) किल्ल्याची ऊंची :  3707
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: चणकापूर डोंगररांग
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
पिंपळा उर्फ़ कंडाळा / कंडाणा किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे. टेहळणीसाठी असलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेली दोन नेढी. यातील एक नेढे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेढे आहे. या किल्ल्याचे नाव पिंपळा असले तरी पिंपळा गावापासून हा किल्ला दूर आहे. मळगाव बुद्रुक हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावत या किल्ल्याला कंडाळा / कंडाणा किल्ला या नावाने ओळखले जाते.
20 Photos available for this fort
Pimpla
पहाण्याची ठिकाणे :
पिंपळा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक पिंपळा गावतून, दुसरा मळगाव गावातून आणि तिसरा वाटोडे गावतून आहे. यातील मळगावातून जाणारी वाट सोपी, कमी वेळ लागणारी आणि बर्‍यापैकी मळलेली आहे. मळगाव बुद्रुक मधून मुख्य रस्ता सोडून एक वाट गावातील छोट्या धरणाकडे जाते. गावातून धरणाच्या भिंतीपर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. खाजगी वहानाने थेट धरणाच्या भिंतीपर्यंत जाता येते. धरणाला लागून रस्ता आहे त्याच्या पलिकडे एक डोंगर सोंड खाली उतरलेली आहे. धरणाची भिंत रस्त्याला मिळते त्या ठिकाणी डाव्या बाजूला एक ठळक पायवाट या डोंगर सोंडेवर जाते. या वाटेने अर्धा तास चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. येथून समोर पिंपळा किल्ल्याचे दर्शन होते. पिंपळा किल्ल्यावर कातळ टोपी आहे. ती पूर्व-पश्चिम व त्याला काटकोनात दक्षिणोत्तर पसरलेली आहे. नेढ दक्षिणोत्तर कातळ टोपी मध्ये आहे. मळेगावातून किल्ला चढतांना आपल्याला केवळ पूर्व-पश्चिम पसरलेली कातळ टोपीच दिसते. त्यामुळे किल्ल्यावर चढेपर्यंत नेढ दिसत नाही.

पठारावरून किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर आपण १५ मिनिटात किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून १५ मिनिटे पूर्व-पश्चिम पसरलेली कातळ टोपीपर्यंत खडा चढ चढून गेल्यावर कातळ टोपीच्या थोडे खाली पायवाट उजवीकडे वळते. या पायवाटेने डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत थोडे अंतर चालल्यावर पूर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर पसरलेली कातळ टोपी ज्या ठिकाणी एकत्र येते तो भाग दिसतो. त्याच्या बाजूलाच दक्षिणोत्तर कातळ टोपीच्या मध्ये नेढ आहे. त्या दिशेने जाणार्‍या पायवाटेने खडा चढ चढून गेल्यावर आपण नेढ्यापाशी पोहोचतो. पायथ्यापासून नेढ्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे दिड तास लागतो. नेढ्याच्या खाली उजव्या बाजूला ३ कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजूला दुसरी निसर्ग निर्मित गुहा आहे. तीचेही मागच्या बाजूचे दगड झिजून ढासळून नेढ्यात रुपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रीया चालू झालेली आहे. ही गुहा आणि टाकी पाहून मुख्य नेढ्यात प्रवेश करावा . इथे भन्नाट वारा वाहात असतो.

नेढ पाहून डावीकडे थोडे अंतर चालल्यावर पूर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर पसरलेली कातळ टोपी ज्या ठिकाणी एकत्र येते तो भाग दिसतो. या खाचेतून गडमाथावर जाणारा मार्ग आहे. दगडांमधील खाचांचा आधार घेत आपण ५ मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. या ठिकाणी कातळात खोदलेली ३ कोरडी टाकी आहेत. गड माथ्यावरुन साल्हेर किल्ला दिसतो. आल्या वाटेने गडमाथ्यावरुन खाली उतरुन पुन्हा नेढ गाठावे. नेढ्यातून पलिकडे जाऊन डाव्या बाजूची पायवाट पकडावी. या वाटेने कातळ टोपीला पूर्ण वळसा घालून पुन्हा नेढ्या पर्यंत येता येते. बर्‍याच ठिकाणी वाट ढासळलेली आहे. काही ठिकाणी वाकून तर बसून वाट पार करावी लागते . या वाटेवर एके ठिकाणी कातळावर प्लॅस्टर करुन त्यावर देवीचे चित्र रंगवलेले आहे त्याच्या मागच्या बाजूला कातळावर एक शिलालेख कोरलेला आहे. य़ा ठिकाणी पिंपळा गावातून येणारी वाट मिळते. गडफ़ेरी करण्यासाठी अर्धा तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई पुण्याहून नाशिक गाठावे. नाशिकहून दोन मार्गाने पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मळगावात जाता येते.
१) नाशिक - वणी दिंडोरी रस्त्याने नंदुरी - कनाशी - चिंचपाडा मार्गे मळगाव गाठावे. (अंतर २३८ किलोमीटर)
२) नाशिक सटाणा रस्त्याने देवळा मार्गे कळवण गाठावे कळवणहून एसटी किंवा जीपने मळगाव गाठता येते. (अंतर २५० किलोमीटर)

पिंपळा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन गावातून मार्ग आहेत.
१) पिंपळा गाव :- पिंपळा गावापासून पिंपळा किल्ला दूर अहे. गावतून तो दिसत नाही. या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर चढून मोठे पठार पार करुन आपण पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास साडे तीन तास लागतात.

२) वाटोडे गाव :- सटाणा वाटोडे एसटी आहे. वाटोडे गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास ३ तास लागतात.

३) मळगाव :- मळगावातून जाणारी वाट सोपी, कमी वेळ लागणारी आणि बर्‍यापैकी मळलेली आहे. मळगाव बुद्रुक मधून मुख्य रस्ता सोडून एक वाट गावातील छोट्या धरणाकडे जाते. गावातून धरणाच्या भिंतीपर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. खाजगी वहानाने थेट धरणाच्या भिंतीपर्यंत जाता येते. धरणाला लागून रस्ता आहे त्याच्या पलिकडे एक डोंगर सोंड खाली उतरलेली आहे. धरणाची भिंत रस्त्याला मिळते त्या ठिकाणी डाव्या बाजूला एक ठळक पायवाट या डोंगर सोंडेवर जाते. या वाटेने दिड ते २ तासात पिंपळा किल्ल्यावर जाता येते.

राहाण्याची सोय :
गडावरील गुहेत १० जणांची राहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर आणि गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मळगाव मार्गे दिड तास , पिंपळा मार्गे ३ तास, वाटोडे मार्गे २ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जून ते मार्च
डोंगररांग: Chankapur
 भिलाई (Bhilai Fort)  पिंपळा (Pimpla)  प्रेमगिरी (Premgiri)