मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

प्रचितगड (Prachitgad) किल्ल्याची ऊंची :  3205
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सांगली श्रेणी : कठीण
रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारा प्रचितगड किल्ला कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता . काही वर्षापूर्वी पर्यंत प्रचितगडला जाण्यासाठी घाटावरुन पाथरपुंज, भैरवगड , चांदोली मार्गे वाटा होत्या . तर कोकणातून रेडेघाट आणि शृंगारपूर मार्गे वाटा होत्या. पण आता या वाटा चांदोली आणि कोयनानगर अभयारण्याच्या कोअर / बफर झोन मध्ये गेलेल्या असल्यामुळे प्रचितगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट उरली आहे, ती आहे शृगांरपूर या कोकणातल्या गावातून. संभाजी महाराजांच या गावात काही महिने वास्तव्य होतं . त्या वास्तव्यात त्यानी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता.

सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे . किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट , अडचणीच्या जागी लावलेल्या डगमगणार्‍या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात.
32 Photos available for this fort
Prachitgad
इतिहास :
आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड,पालगड हे किल्ले होते. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला. त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले. पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला.

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांमधील लेखक , कवी जागा झाला. त्यांनी "बुधभूषणम" हा संस्कृत ग्रंथ लिहिला. "नायिकाभेद", "नखशिक", "सातसतक" हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या दरवाजाखाली लावलेल्या शिडीवरुन चढल्यावर आपण उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारा समोर उभे राहातो . प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक बुरूज आहे. किल्ला चढतांना हा बुरुज आपल्याला खालूनही दिसतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या बाजूने वर चढून टाक्याला वळसा घातल्यावर आपण प्रकेशव्दाराच्या पुढे असलेल्या डोंगराच्या नाकाडावर पोहोचतो. किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर आणि बाजुचा डोंगर यामधे खिंड तयार झालेली आहे. या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवेशद्वारावर येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी येथे बुरुजाची योजना केलेली आहे.

उत्तर टोकाकडील हा बुरूज पाहून परत टाक्या जवळ येउन किल्ल्याच्या दक्षिणेला जाताना एक वाट वर चढत जाताना दिसते. या वाटेने जाण्या अगोदर डाव्या बाजुला असलेल्या कारवीच्या झाडीत शिरावे. थोडे अंतर चालुन गेल्यावर एक पाण्याचे टाक पाहायला मिळते. याठिकाणी दरीच्या बाजुला तटबंदीचे अवशेषही पाहायला मिळतात.

टाक पाहून परत पायवाटेवर येउन छोटासा चढ चढुन दक्षिणेस चालत गेल्यावर आपण पत्र्‍याच्या शेड मध्ये बांधलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी येतो. देवळाच्या परिसरात ५ तोफा ठेवलेल्या आहेत. देवळात तीन मूर्ती आहेत. मधली मुर्ती भैरी भवानीची असून बाजूच्या दोन्ही मूर्ती भैरोबाच्या आहेत. प्रचितगडावरील भवानी पंचक्रोशीतील लोकांची कुलदेवता असल्यामुळे गडावर अधुनमधुन लोकांचा वावर असतो. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कारवीच्या झाडीत लपलेले घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथऱ्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेल खांब टाक पाहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक २ खांबावर तोललेल असून टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत . याठिकाणी एकूण पाण्याची ५ टाक असुन त्यापैकी ३ टाक पायऱ्यांच्या उजव्या बाजूला व २ टाक डाव्या बाजूला आहेत. टाक पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या बाजूला ) तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पाहायला मिळातात. या भागात गडमाथा बऱ्यापैकी रुंद असुन गडावरील एकमेव मोठे उंबराचे झाड येथे आहे. त्या उंबराच्या सावलीत थोडा वेळ विसावा घेउन समोर दिसणाऱ्या उंचवट्यावरील वाड्याच्या दिशेने जावे. वाड्याचे छप्पर पडलेले आहे. भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेतं . वाडा उजवी कडे ठेवत वाड्याला वळसा घालून मागे जाताना तटबंदी आणि फांजीचे अवशेष पाहायला मिळतात. वाड्या मागील उतार उतरुन समोर दिसणाऱ्या उंचवट्यावर चढून गेल्यावर आपण किल्ल्याचा दक्षिण टोकावर पोहोचतो. येथे पश्चिमेला (शृंगारपूरच्या दिशेला) कातळात खोदलेला एक खड्डा आहे . त्यात टेहळ्यांना बसण्यासाठी दोन स्टुला सारखे दोन उंचवटेही कोरलेले आहेत. टेहळ्या उन , गडावरचा भन्नाट वारा यापासून संरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारचा खड्डा खोदला असावा.

किल्ल्याच्या दक्षिण टोका वरुन बाजूचा वानर टोक डोंगर आणि त्यावरचे छोटे सुळके सुंदर दिसतात. हे पाहून आल्या वाटेने परत प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.

गड पाहायला एक तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
शृंगारपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावाला जाण्यासाठी तीन पर्‍याय उपलब्ध आहेत. खाजगी वाहन असल्यास मुंबई गोवा महामार्गा वरील चिपळूण गाठावे. चिपळूणच्या पुढे आणि संगमेश्वरच्या अलिकडे २ किमीवर कसबा संगमेश्वर आहे. (मुंबई पासून अंतर २९५ किमी) येथे महामार्ग सोडुन आत जाणाऱ्या रस्त्याने १६ किमीवर शृंगारपूर गाव आहे.

एसटी बसने जाणार असल्यास मुंबई पुण्याहुन संगमेश्वर गाठावे. संगमेश्वर एसटी स्थानकातून शृंगारपूरला जाण्यासाठी बसेस आहेत. बसचे वेळापत्रक खाली दिलेल आहे.

कोकण रेल्वेने संगमेश्वर पर्यंत येउन एसटीने शृंगारपूरला जाता येते.

शृंगारपूर गावातून उत्तर दक्षिण पसरलेला प्रचितगड दिसतो. गावातील शाळेपर्यंत बसने जाता येते. पुढे गावातून वाहाणार्‍या ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याने गावातली वस्ती संपेपर्यंत चालत गेल्यावर पायवाट लागते. या पायवाटेने अर्धा तास दाट जंगलातून चालल्या नंतर ओढा आडवा येतो. ओढा ओलांडून पलिकडे गेल्यावर गावाच्या आणि किल्ल्याच्या मधे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. डोंगराची दाट झाडीतली खडी चढण चढुन पठारावर पोहोचायला १ तास लागतो. पठारा वरुन १० मिनिटे चालल्यावर पुन्हा खडा चढ लागतो. साधारणपणे पाउण तासात आपण सुकलेल्या धबधब्या जवळ येतो. इथे एका गिर्‍यारोहकाची स्मृती शिळा बसवलेली आहे. पुढच्या टप्प्यात ठिकठिकाणी ८ शिड्या बसवलेल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या शिड्यांवरुन चढताना छोटे छोटे दगड निसटुन खाली येतात त्यामुळे सांभाळून चढावे लागते. शिड्यांचा टप्पा पार केल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचलेलो असतो. येथून गडाच्या दक्षिण टोका खालुन उत्तर टोकाकडील दरवाजा खालील शिडी पर्यंत आडवी चढत जाणारी वाट पार करायला १ तास लागतो. या वाटेवर खूप घसारा (स्क्री) असल्याने खूप जपून चढाव आणि उतराव लागते.
हि घसार्‍याची वाट संपल्यावर आपण उत्तराभिमुख दरवाजा खालील शिडी पाशी पोहोचतो. या मोठ्या शिडीच्या पायऱ्या आणि कठडा तुटलेला आहे त्यामुळे जपून शिडी चढावी लागते. शिडी चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

शृंगारपूर गावातून प्रचितगडावर जाण्यासाठी ४ तास लागतात. गड फिरण्यासाठी १ ते दिड तास आणि गड उतरायला ४ तास लागतात. अशाप्रकारे शृंगारपूर गावातून निघून गड पाहून परत यायला साधारणपणे ९ ते १० तास लागतात. गडावर जाणारी वाट जंगलातून आहे. तसेच या वाटेवर गावकऱ्यांचा वावर फारच कमी आहे. त्यामुळे गावातून वाटाड्या नेण आवश्यक आहे . तसेच प्रचितगडावर झालेल्या अपघातांमुळे गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीत एक नोंद वही ठेवलेली आहे. त्यात नोंद करुन जाणे आवश्यक आहे.

प्रचितगड किल्ल्याची भ्रमंती अशाप्रकारे करता येइल :-
मुंबई पुण्याहून रात्रीचा प्रवास करुन संगमेश्वर गाठावे. संगमेश्वरला सकाळी ७.४५ वाजता शृंगारपूरला जाणारी पहिली एसटीआहे. ती ९.०० वाजता पोहोचते. त्यामुळे किल्ला पाहून परत येण्यास संध्याकाळचे ७.०० / ८.०० वाजतात. त्यावेळी परतीची व्यवस्था नसल्याने गावातच मुक्काम करावा लागतो. गावातल्या काही घरात मुक्कामाची आणि जेवणाची सोय व्यवस्थित होते. त्या दिवशी गावात मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० ची बस पकडून कसबा संगमेश्वर गाठावे. येथे संभाजी स्मारक आणि प्राचीन कर्णेश्वर मंदिर आहे. ( मंदिराची माहिती आणि फोटो साईटवर दिलेले आहेत.) ते पाहून चिपळूण गाठावे. चिपळूण शहरातील गोवळकोट किल्ला पाहावा. चिपळूणहुन परतीची बस पकडावी.

खाजगी वाहन असल्यास पहिल्या दिवशी प्रचितगड, दुसऱ्या दिवशी महिमतगड आणि भवानीगड आणि तिसऱ्या दिवशी गोकळकोट किल्ला पाहाता येइल. यासाठी वेळेचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. (सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे)
राहाण्याची सोय :
गावातील काही घरात,शाळेत आणि मंदिरात राहायची सोय होते.
जेवणाची सोय :
गावातील काही घरात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :
गडावरील टाक्यात मार्च महिन्यापर्यंत पाणी असते.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते मार्च
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Sangameshwar   Shringarpur   7.45,10.45,12.45,15.45, 17.15 :- Night Hault bus reaching Shringarpur at 19.00   7.00,9.00,11.45,13.45,16.45   17 km

डोंगररांग: None
 आड (Aad)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)
 अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बांदा किल्ला (Banda Fort)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)
 बाणकोट (Bankot)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भवानगड (Bhavangad)
 भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूषणगड (Bhushangad)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 कुलाबा किल्ला (Colaba)  दांडा किल्ला (Danda Fort)  दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  घारापुरी (Gharapuri)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  गोवा किल्ला (Goa Fort)
 होन्नुर किल्ला (Honnur Fort)  इंद्रगड (Indragad)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जयगड (Jaigad)
 जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  जंजिरा (Janjira)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कलाडगड (Kaladgad)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खांदेरी (Khanderi)  खारेपाटण (Kharepatan fort)
 खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोर्लई (Korlai)  कोटकामते (Kotkamate)  माचणूर (Machnur)
 मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मंगळवेढा (Mangalwedha)  माणिकगड (Manikgad)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)
 नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))
 नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पालगड (Palgad)  परांडा (Paranda)
 पारडी किल्ला (Pardi Fort)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 पिंपळास कोट (Pimplas Kot)  प्रचितगड (Prachitgad)  पुरंदर (Purandar)  पूर्णगड (Purnagad)
 रायकोट (Raikot)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))
 राजकोट (Rajkot)  रामदुर्ग (Ramdurg)  रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)
 सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))
 सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुरगड (Surgad)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  टकमक गड (Takmak)
 तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  थाळनेर (Thalner)  तोरणा (Torna)  उंदेरी (Underi)
 वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वसई (Vasai)  विजयदुर्ग (Vijaydurg)
 वरळीचा किल्ला (Worli Fort)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))