मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) किल्ल्याची ऊंची :  1551
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले एक मिश्रभाषिक गाव म्हणजे सोलापूर. याच सोलापुरात एक अप्रतिम कलाकुसरीने नटलेला भुईकोट आहे. सोलापूरचा भुईकोट बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी (शके / इ.स.) १४६३ च्या सुमारास हा किल्ला बांधला.
36 Photos available for this fort
Solapur Fort
पहाण्याची ठिकाणे :
सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्यात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराने आपण प्रवेश करतो, ती किल्ल्याची तटबंदी तोडून केलेली व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे. किल्ल्यात मुख्य दरवाजाने प्रवेश करताना जुनी मोठी जाड साखळी आणि वीरगळ आपले स्वागत करतात. किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे. चौथ्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आणि तलाव आहे. त्याच खंदकावर बांधलेल्या आधुनिक पुलावरून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी पूल पार केल्यावर डाव्या बाजूला झाडाझुडपांत लपलेली नागबावडी आहे.

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या अजूनही शाबूत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाज्यावर तीन झरोक्यांची रचना केलेली आहे. दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे. नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्या समोर घोड्याच्या पागा दिसतात. पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाज्यांमध्ये युध्द मैदानासारखी मोठी जागा आहे. शत्रू आत आल्यास त्याला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या वरील दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाज्याच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह, राजा सुलतान मोहम्मद, त्यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो. दरवाजा वरील खिडक्यांमधे शरभ आणि मृग शिल्प बसवलेले आहे. दुसऱ्या दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर अस्पष्ट असा देवनागरी लिपिमधील शिलालेख नजरेस पडतो. या दरवाज्याच्या आतील बाजूसही पहारेकऱ्यांच्या खोल्या दिसतात.

किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराशी लागूनच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे. बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला (जोशी घराणे) तत्कालीन शासनाने १५ रु. वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात. मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प (एक दुसरे असेच शिल्प हुतात्मा बागेत घसरगुंडीच्या बाजूला आहे) आणि व्दारपालाचे शिल्प ठेवलेले आहे. याच प्रवेशद्वाराच्या वर फारसी लिपीतील (हिजरी ९८६; इ.स.१५७८-७९) शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीद खान याने मशीद, बाजारपेठ, बाग, हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे.
तिसऱ्या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोलीमध्ये एक वीरगळ आहे. वीरगळीच्या बाजूस शिलालेख आहे. त्यात किल्ल्यातील विहिरीचा निर्मितीचा उल्लेख केलेला आहे. या दरवाजाच्या वरच्या बाजूस वीटांनी बांधलेली वास्तू आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे.


१८१९ साली उत्खननानंतर या मंदिराचे काही खांब वापरून शहराच्या बाळीवेस परिसरामध्ये नवीन मल्लिकार्जुन मंदिर बांधण्यात आले. किल्ल्यातले मंदिर श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बांधल्याचा उल्लेख कवि राघवांक यांनी केलेला आहे. या मंदिराला देवगिरीचे यादव, कदंबराजे, व इतर सावकार यांचेकडून वतने, इनामे मिळाल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व मोठे व्दारपाल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात ठेवण्यात आलेले आहेत आणि देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तुसंग्रहालयात आहे.
मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते. येथील कोरीव खांब, नक्षीयुक्त सजावटीने नटलेले आहेत. वास्तुमध्ये आत समोरून थंड हवा येण्यासाठी एक फट ठेवलेली पहावयास मिळते. वास्तूच्या आणि मंदिराच्या तिरक्या दिशेला किल्ल्यातील चौकोनी आकाराचा उंच बुरुज उठून दिसतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असून तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. शेजारीच चौकोनी दोनही बाजूस पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. परंतु झाडी वाढल्याने ती लवकर निदर्शनास येत नाही.
चौकोनी बुरुजाच्या दिशेने उजवीकडे बुरुजावरून चालत गेल्यास बुरुजावरच एक मोडी लिपीतील शिलालेख दिसतो. इ. स. १६८० चा काळ दर्शविणारा हा शिलालेख इकडील तटबंदी कच्ची होती, ती पक्की बांधून काढल्याचे सांगतो. इथूनच पुढे दर्गोपाटील बुरुज आहे. महाकालेश्वर बुरुजाप्रमाणे इथे दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले, तेव्हा हा बुरुज बांधून पूर्ण झाला. इथेही गुढी पाडव्याला उत्सव साजरा होतो. बुरुजावारच पद्मावती देवीचे मंदिर आहे.

दर्गोपाटील बुरुजाच्या (पद्मावती) पुढेच बाळंतीण विहीर दिसते. ही विहीर लांबट आयाताकर असून त्याच्या कडेला एक हवेशीर सज्जा आहे, आणि तिथूनच खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. बाळंतीण विहिरीकडे जाताना बुरुजाच्या वरील बाजूस एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. यामध्ये सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे.
बुरुजावरून सरळ चालत गेल्यावर एक हवेशीर बाल्कनी असलेला चौक लागतो. याच बाल्कनीच्या एका स्तंभावर देवनागरी लिपीतील शके १४६६ (इ. स . १५४४) च्या काळातील शिलालेख आहे. हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने लागले असा स्पष्ट उल्लेख यात आढळतो.


इथूनच पुढे निशाण बुरुज (हनुमान बुरुज) हा टेहेळणीच्या दृष्टीने महत्वाचा किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज आहे. इथून सिद्धेश्वर मंदिराचा परिसर नजरेत सामावता येतो. बुरुजावर चढताना अनेक खंडीत शिल्पे पहावयास मिळतात.


या बुरुजावरून सरळ चालत आता जिथून प्रवेशद्वार आहे, तिथे पोहोचता येते. बुरुजावरून खाली उतरल्यावर ब्रिटीशकालीन वास्तू आहेत. तसेच शिखराचे भग्न अवशेष, स्तंभ मांडून ठेवलेले आहेत. आता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत. सध्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून डावीकडे आखाड्याच्या दिशेने आत गेल्यावर तटबंदीवर विविध प्रकारची शिल्पे पहावयास मिळतात. त्यात वीरगळ, विद्याधर पट, शिल्पपट आहेत असेच सरळ तटबंदीच्या कडेने चालत गेल्यास किल्ल्यातील एकमेव अशा अष्टकोनी बुरुजापाशी आपण येतो.
परत त्याच रस्त्याने मागे येऊन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते.किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने ९ ते ५ अशी प्रवेशाची वेळ आहे. बाग मात्र ७ वाजेपर्यंत चालू असते. सोलापूर, नळादुर्ग, परांडा, माचणूर , करमाळा, मंगळवेढा हे भुईकोट दोन तीन दिवसात पाहाता येतात.

पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर शहर रस्ता आणि रेल्वे मार्गाने इतर भागाशी जोडलेले आहे. सोलापूर रेल्वे आणि बस स्थानकातून रिक्षाने किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय :
सोलापूर शहरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात सध्या पाणी नसल्याने पाणी सोबत ठेवावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोलापूर शहरात जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Solapur
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  करमाळा (Karmala Fort)  माचणूर (Machnur)
 मंगळवेढा (Mangalwedha)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)