मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सोनगड (Songad) किल्ल्याची ऊंची :  2610
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सोनगड आणि पर्वतगड
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भाटघर धरणाजवळ सोनेवाडी हे लहानसे गाव सिन्नर अकोले मार्गावर आहे . या गावाच्या मागे सोनगड आणि पर्वतगड हे दोन किल्ले आहेत. एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहून होतात.
8 Photos available for this fort
Songad
Songad
Songad
पहाण्याची ठिकाणे :
सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.

खिंडीच्या मधोमध एक छोटीशी टेकडी आहे या टेकडीच्या डावी कडून जाणारी वाट सोनगड किल्ल्यावर जाते तर टेकडीच्या उजव्या बाजूकडून जाणारी वाट पर्वतगडावर जाते.

टेकडीच्या डावीकडील पायवाटेने आपण सोनगडाच्या पश्चिमेच्या डोंगरधारेच्या पायथ्याशी पोहोचतो . सोनगडची कातळटोपी पूर्व पश्चिम पसरलेली आहे . आपण खिंडीत सोनगडच्या पश्चिम टोकाखाली उभे असतो . याठिकाणी सोनगडच्या उतारावर जंगल आहे. या जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने तिरके चढत किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे जाण्यासाठी साधारण १५ मिनिटे लागतात. याठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ( येथून किल्ल्याची डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी पासून दोन किलोमीटर पुढे गेल्यास एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून येणारी पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन कातळात कोरलेल्या पायऱ्यापाशी येते ) पायऱ्या चढून गेल्यावर आपण कातळ टोपीच्या पायथ्याशी पोहोचतो . समोरच कातळ टप्प्यावर कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या चढायला सुरुवात केली की डाव्या बाजूला निवडूंगाचा फड दिसतो. त्याखाली खांब टाके आहे . टाक पाहून परत वाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर पायऱ्यान्च्या बाजूलाचा दोन पावले कोरलेला समाधीचा दगड पाहायला मिळतो. पुढे चढत गेल्यावर डाव्या हाताला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात . त्या खालीला कातळाला पांढरा रंग मारलेला आहे . या ठिकाणी किल्ल्याचे प्रवेशव्दार असावे . उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथ्यावर रचीव दगडांची तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात . तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर पांढऱ्या रंगाने रंगवलेले खंडोबाचे मंदिर दिसते . मंदिरा बाहेर उघड्यावर कावस आहे . त्याच्या बाजूला एक दगडी भांडे पडलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक वेगळीच मूर्ती आहे . त्या मुर्ती समोर दोन छोटेनंदी ठेवलेले आहेत . मंदिरात खंडोबाची मुर्ती आहे .

मंदिराच्या मागच्य बाजूला प्रचंड मोठे कोरडे टाके आहे . या टाक्यापासून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावर पोहोचतो. येथून समोरच पर्वतगड पसरलेला दिसतो . त्याच्या मागे दुरवर आडचा किल्ला दिसतो. पूर्वेला भाटघर धरण दिसते . गडमाथा छोटा असल्याने पाहाण्यासाठी अर्धातास पुरतो. सोनेवाडी गावातून सोनगड किल्ल्यावर जाण्यास एक तास लागतो. सोनगड आणि पर्वतगड पाहून सोनेवाडीत परत येण्यास चार ते पाच तास लागतात .
पोहोचण्याच्या वाटा :
सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे . सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .

सोनेवाडीतून दोन मार्गाने सोनगडावर जाता येते .
१) खिंडीतला मार्ग :- सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये एक खिंड आहे . या खिंडीत जाण्यासाठी सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळ उतरावे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. टेकडी चढून गेल्यावर समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.

२) पूर्व डोंगरधारे वरुन :- सोनगड किल्ल्याची एक डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी गावाच्या पुढे अकोलेच्या दिशेने दोन किलोमीटर पु गेल्यावर रस्त्या लगत उजव्या बाजूला एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन किल्ल्यावर जाते .
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही . गावातील शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होते .
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गावात नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोनेवाडी गावातून एक तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुन ते फ़ेब्रुवारी
डोंगररांग: Songad Parvatgad
 पर्वतगड (Parvatgad)  सोनगड (Songad)