मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वसंतगड (Vasantgad) किल्ल्याची ऊंची :  2950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
कराड - चिपळूण रस्त्यावर अनेक किल्ले आहेत. त्यापैकी वसंतगड हा किल्ला त्याच्या पायथ्याशी, तळबीड गावात असलेल्या सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या समाधीमुळे प्रसिध्द आहे.
इतिहास :
या किल्ल्याची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ठेवले ‘किली द फतेह’ म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. नंतर १७०६ मध्ये मराठ्यांनी परत हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :
तळबीड किंवा वसंतगड गावातून गडावर जाणारा रस्ता एकाच ठिकाणी येऊन मिळतो. गडावर शिरतांना एक भग्न अवस्थेतील प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराच्या तटबंदित गणेशाची सुबक मुर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या पायर्‍य़ा चढून गेल्यावर समोरच उजवीकडची वाट धरावी, समोरच मोठे मंदिर आहे. या मंदीराचे वैशिष्टे असे की हे मंदिर शुर्पणकेचा पूत्र चंद्रसेन याचे आहे. मंदिराच्या अलिकडेच दोन भग्न मंदिरे देखील आढळतात. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. गडाच्या चारही अंगास भक्कम असे बुरुज आहेत. दक्षिणेकडील बुरुजात एक सुस्थितीत असणारा दरवाजा आहे. दरवाज्यावरचे नक्षीकाम आजही शाबूत आहे. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. तसेच किल्ल्याची तटबंदी बर्‍य़ाच मोठ्या प्रमाणात शाबूत आहे. किल्ल्याच्या पठारावर एका ठिकाणी दगडाचे मोठे जाते आढळते. किल्ल्याचा एकूण घेरा मोठा असल्याने फिरण्यास एक ते दीड तास लागतो. वसंतगडावरुन कोयनेच्या पात्राचे विलोभणीय दर्शन होते.
पोहोचण्याच्या वाटा :
वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड - सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे. एसटी स्थानकावरुन तळबीडला जाण्यास दर अर्ध्या तासाला एसटी आहे. गावातच हंबीररावांचे स्मारक आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्याची चढण सुरु होते. वाट मळलेली आहे. पुढे वाट गडाला उजव्या हाताला ठेवत एका झाडाजवळ येते. तेथून सहजपणे गडमाथा गाठता येतो. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात.
याशिवाय कराड - चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे.
राहाण्याची सोय :
चंद्रसेनच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, कराडमध्ये आहे.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) तळबीड मार्गे १ तास लागतो. २) वसंतगड गावामार्गे १ तास लागतो.
सूचना :
समर्थ रामदासांच्या ८ घळींपैकी चंद्रगिरी घळ वसंतगडापासून दिड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. वसंतगडावरील पश्चिमेच्या प्रवेशव्दारातून बाहेर पडून खिंडीत उतरावे.तिथून चरेगाव बेचदेर गावातून चंद्रगिरी घळ गाठावी. परत येतांना वसंतगडा पर्यंत न येता चरेगावात उतरावे. तिथून कराडला येण्यासाठी वडाप व बसची चांगली सोय आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विसापूर (Visapur)
 विशाळगड (Vishalgad)