![Caves in Maharashtra ,Vihar, Baudha Leni Caves in Maharashtra ,Vihar, Baudha Leni](uploads/5/DSCN0057.jpeg)
विहार म्हणजे बौध्द भिक्षूंचे निवासस्थान होय. पाली भाषेत ‘‘विहार’’ हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. बुध्दाने आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिक्षू वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्त्व्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. प्रचिन काळी सावकार जनता, व्यापारी, सरदार, राजघराणी इत्यादिंच्या देणगीतून असे विहार नगरात तसेच मनुष्य वस्तीपासून दूरवर बांधलेले असत. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या विशिष्ट रचनेमुळे विहार बांधून न काढता डोंगरात कोरुन काढण्यात आले. ह्या विहारां मध्ये राहण्याची, भोजनाची, शिक्षणाची सोय करण्यात येत असे. प्रत्येक विहार हे शिक्षणाचे व धर्मप्रसाराचे केंद्र होते.
![Caves in Maharashtra ,Vihar, Baudha Leni Caves in Maharashtra ,Vihar, Baudha Leni](uploads/5/March_Back.jpeg) बौध्द धर्माच्या सुरुवातीच्या काळात; हिनयान पंथाच्या काळात विहार हे भिक्षूंच्या केवळ वर्षकाळातील वास्तव्यासाठी बांधण्यात आले होते. त्यामुळे त्यांची रचना साधीसोपी करण्यात आली होती. या हिनयान पंथीय विहारांमध्ये चैत्य स्तूपाच्या बाजूला विहारांची रचना केलेली असे. यात आयताकार ओसरी किंवा मार्गिका ठेवलेली असे. या मार्गिकेच्या एका बाजूस ओळीने दालने खोदलेली असत. दालनात मुख्य दरवाजाच्या बाजूला प्रकाश व हवा येण्यासाठी जाळीदार खिडक्या किंवा झराके असत. आत मध्यभागी आयताकार मोकळी जागा ठेवून तीन बाजूंना खोल्या असत. या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी दगडी बाक, खुंटीसाठी भिंतीत खाच व दरवाजासाठी चौकटीत खाचा कोरलेल्या असत. याशिवाय विहारात पाण्यासाठी कुंडे खोदलेली असत. विहारातील भिंती, स्तंभ यावर कोरीवकाम किंवा शिल्प कोरलेली नसत. बौध्द धर्माचा प्रसार झाल्यावर महायान काळात भिक्षू फक्त वर्षाकाळात विहारात न राहता, कायम राहू लागले. विहारांचे रुपांतर शिक्षणकेंद्रात झाले; भिक्षूंची संख्या वाढली. त्याचा परिणाम विहारांच्या रचनेवरही झाला. विहार आकाराने प्रशस्त व अनेक मजली बांधण्यात आले. पाण्यासाठी कुंडे, उद्याने, स्नानगृहे, स्वयंपाकघर, भोजनकक्ष, सामान साठावण्याच्या कोठ्या यांची रचना विहारात करण्यात आली. हिनयान काळातील स्तुपांची जागा बुध्द मुर्तींनी घेतली. विहारांच्या भिंती, खांब, दरवरजाच्या चौकटी, बौध्द धर्मातील दैवते, जातक कथा, पानाफुलांची वेलबुट्टी कोरुन सजविण्यात आल्या. काही ठिकाणी भित्तीचित्रे रंगविण्यात आली. प्रार्थनापट कोरण्यात आले. ![Caves in Maharashtra ,Vihar, Baudha Leni Caves in Maharashtra ,Vihar, Baudha Leni](uploads/5/Picture_038.jpeg)
|