Print Page | Close Window

वाघनखं

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=39
Printed Date: 12 Jan 2025 at 5:39am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: वाघनखं
Posted By: amitsamant
Subject: वाघनखं
Date Posted: 16 Jun 2012 at 8:38pm

      

Waghnakha

स्वराज्यावर चालून आलेला अफजलखाना सारखा मातब्बर व बलाढ्य शत्रू , छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारल्यामुळे "वाघनखं" हे हत्यार इतिहासात अमर झाले, तसेच जनसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरले.

      त्यापूर्वी १७ व्या शतकात वाघनखाला शस्त्र म्हणून अधिकृत मान्यता नव्हती. त्याकाळी ते डाकू व दरोडेखोरांचे हत्यार म्हणून ओळखले जात असे.

वाघनखं हे प्रामुख्याने भारतात विकसित झालेले, सहज वाहून नेण्याजोगे व स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारे शस्त्र आहे. वाघनखासारखी वेगळी व शत्रूला चकीत करणारी हत्यारे बनविताना त्या-त्या प्राण्यांच्या पंजाचा, वार करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जात असे. वाघनखांप्रमाणेच अस्वली कट्यार, सिंहाचा पंजा अशी हत्यारे मध्ययुगात अस्तित्वात होती, पण त्यांना वाघनखांप्रमाणे प्रसिध्दीचे वलय लाभले नाही.

WaghnakhaWaghnakhaWaghnakha

      वाघनखं हे लोखंडापासून बनविलेले शस्त्र असून धातूच्या पट्टीवर चार धारदार, टोकदार, अर्धवर्तुळाकार (आतल्या बाजूस वळलेली) धातूची नखे असतात. ही नखं ज्या धातूच्या पट्टीवर बसवलेली असतात, त्या पट्टीच्या दोन टोकांना अंगठीसारख्या कड्या असतात. या कड्या पहिल्या बोटात व करंगळीत अडकवून मूठ बंद केल्यास वाघनखं हातात बेमालूमपणे लपून जात.

      वाघनखांची रचना ही खास कातडी फाडून स्नायूंना टरकावण्यासाठी केलेली आहे. वाघनखाने शत्रूला पूर्णपणे मारणे शक्य नसले तरी त्याला जखमी करून नामोहरम करता येत असे. वाघनखं शत्रूच्या पोटात खुपसल्यावर बाहेर काढणे कठीण असे. वाघनखं शरीरात खुपसल्यावर अत्यंतिक वेदनेमुळे शत्रू दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि याचमुळे वाघनखं जास्त खोलवर जाऊन नुकसान करतात. महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनखं खुपसल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने अफजलखानाने महाराजांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाघनखं त्याच्या पोटात जास्त खोलवर घुसून पोट फाटले व आतडी बाहेर आली.

      वाघनखांचा उपयोग शत्रूवर हल्ला करणे याव्यतिरिक्त डोंगरकपार्‍या, किल्ल्याच्या भिंती तसेच झाडावर चढणे उतरणे यासाठी होत असे.

Sihacha Panga

सिंहाचा पंजा: या शस्त्रात सिंहाच्या नखांसारखीच धातूची नखे असलेली पट्टी असते. पंजाच्या मागच्या बाजूस असलेली धातूची पट्टी मनगटावर घट्ट बसते व नखे असलेली पट्टी बोटांच्या खालच्या बाजूस येते. या रचनेमुळे शस्त्रावर घट्ट पकड बसते, तसेच वार करणारा नखांचा भाग बोटांखाली लपल्यामुळे शस्त्र सहजासहजी शत्रुला दिसत नाही. या शस्त्राचा उपयोग ठोसा देणे, वार करणे, ओरबाडणे यासाठी होतो.

Sihacha Panja aani Aswali Katyar

अस्वली कट्यार: याला अस्वलाचा पंजाही म्हणतात. याची पकड कट्यारीसारखीच असते, पण पुढच्या बाजूस पात्या ऐवजी अस्वलाच्या नखांसारखी धातूची नखे असतात. या शस्त्राचा वापर वार करणे व फाडून ओढणे यासाठी करतात.

Waghnakha




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk