Print Page | Close Window

१) लेण्यांचा इतिहा

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Caves in Sahyadri
Forum Description: TreKshitiZ Writing team would be uploading the information of Caves in Sahyadri in this section.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=227
Printed Date: 19 Jan 2025 at 11:40pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: १) लेण्यांचा इतिहा
Posted By: amitsamant
Subject: १) लेण्यांचा इतिहा
Date Posted: 12 Apr 2014 at 10:58am
Caves in Maharashtra (Baudha Leni)
इसवी सन पूर्व ३ र्‍या शतकात मौर्य सम्राट अशोक याने डोंगर कोरुन लेणी (शैल्यगृह) बनविण्यास प्रारंभ केला. लेणी म्हणजे डोंगरातील खडक खोदून तयार केलेली गुहा/गुंफा. बौध्द धर्माच्या सुरुवातीच्या काळात बौध्द भिक्षू धर्मप्रसारासाठी देशभर संचार करीत असत. पावसाळ्यात त्यांचा संचार बंद असे त्यांना वर्षाकाळी रहाण्यासाठी गुहांची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या गुंफा साध्याच होत्या. पुढील काळात त्यात शिल्पे कोरण्यात आली. इसवी सनाच्या आठव्या शतकात ही स्थापत्य कला परमोच्च बिंदूला पोहोचली होती, याच काळात अद्वितीय, अलौकिक कैलास लेणे (वेरुळ) ‘‘आधी कळस मग पाया’’, या पध्दतीने खोदण्यात आले. या स्थापत्य कलेची सांगता इसवीसनाच्या १३व्या शतकात झाली.

भारतात एकूण सुमारे १२०० लेणी आहेत. त्यापैकी ९०० पेक्षा जास्त बौध्द, २०० पेक्षा अधिक ब्राम्हणी(हिंदू) व सुमारे १०० जैन लेणी आहेत. यापैकी सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात आहेत. याची मुख्य कारणे तीन आहेत. पहीले नैसर्गिक कारण म्हणजे ‘‘सह्याद्री’’, अशा प्रकारच्या स्थापत्य कलेसाठी आवश्यक असणारा कठीण व एकसंध दगड सह्याद्रीत विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरे कारण म्हणजे राजकीय स्थैर्य. सम्राट अशोकानंतर उत्तरेतील त्याच्या साम्राज्यात फुट पडून छोटी छोटी राज्ये तयार झाली. त्याच वेळी महाराष्ट्रात सातवाहनांची सत्ता प्रस्थापित झाली. इ. स. पूर्व ३ रे शतक ते इ.सनाच्या २ र्‍या शतकापर्यंत अंदाजे ४०० वर्षे सातवाहनांनी राज्य केले. या राजकीय स्थैर्याच्या काळात महाराष्ट्रातील सुरुवातीची लेणी खोदली गेली. ती आन्ध्र नदीचे खोरे व नाशिक परिसरात आहेत. त्यानंतर आलेल्या वाकटाकांची राजधानी विदर्भात असल्यामुळे त्या काळात राजधानी नजीक लेणी खोदली गेली.

सहाव्या शतकात चालुक्यांनी बदामी येथे राज्य स्थापन केले. बदामीची लेणी याच काळात खोदली गेली. ब्राम्हणी लेणी खोदण्याची प्रथा इ. सनाच्या ६ व्या शतकाच्या शेवटी चालुक्यांनी सुरु केली. चालुक्या नंतर आलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात वेरुळचे कैलास लेणे खोदण्यात आले. तसेच जैन लेणी खोदण्याची प्रथाही याच काळात सुरु झाली. चालुक्य, राष्ट्रकुट, यादव यांची राज्ये मैदानी होती. चालुक्य राजवटीच्या उत्तरार्धात त्यांनी मंदिरे बांधण्यास सुरुवात केली. मंदिर कोठेही बांधता येत असे व त्यासाठी लेण्यांच्या तुलनेत कमी वेळ व पैसा लागत असे. या कारणांमुळे १० व्या शतकानंतर लेणी खोदण्याची प्रथा मागे पडली.

महाराष्ट्रात सर्वाधिक लेणी असण्याचे ३ रे कारण आर्थिक आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातून जाणारे संपन्न व्यापारीमार्ग. महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरील कल्याण, शुर्पारक(सोपारा), चौल, पालशेत इत्यादी बंदरात उतरणारा माल व्यापारी मार्गाने नाशिक, पैठण, उज्जैन या शहरां मधील बाजारपेठांमध्ये जात असे. पश्चिम किनार्‍यावरील बंदरामार्फत परदेशाशी होणार्‍या या व्यापारामुळे व्यापार्‍यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व राजाश्रयामुळे ही लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे, व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात ही लेणी मुख्यत्वे करुन आढळतात.

लेणी प्रामुख्याने दोन प्रकारची असतात १) ऐहिक लेणी आणि २) धार्मिक लेणी
१) ऐहिक लेण म्हणजे पूर्वजांच्या प्रतिकांचे मंदिर. भारतात ऐहिक लेणी फारच थोडी आहेत. महाराष्ट्रातील एकमेव ऐहिक लेण म्हणजे नाणेघाटातील सातवाहनांचे देवकुल.
२) धार्मिक लेणी तीन प्रकारची असतात. बौध्द, जैन व ब्राम्हणी(हिंदू) लेणी. हि लेणी धर्मप्रसारासाठी, धार्मिक विधी व शिक्षण यासाठी कोरण्यात आली होती.

Udayagiri and Khandagiri Caves (Leni) Udayagiri and Khandagiri Caves (Leni)



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk