![Ancient & Medieval weapons , Shield (ढाल) Ancient & Medieval weapons , Shield (ढाल)](uploads/5/04_April_copy.jpeg)
ढाल - तलवार ही नावे जरी जोडीने
घेतली जात असली तरी, ढालीचा उपयोग तलवारीचा शोध लागण्यापूर्वीपासून होत होता. ‘‘ढाल
म्हणजे संरक्षण’’!
प्राचीनकाळी भाला व बाण या
सारख्या शस्त्रांपासुन संरक्षण मिळविण्यासाठी ढालीचा वापर केला गेला. या ढाली उंचीला
४ फुटापर्यंत असत. अशा ढाली आजही जगभराच्या गुंफा चित्रात पहाता येतात.
प्राचीनकाळी
ढाली लाकूड व चामडे यापासून बनविल्या जात युध्दात तलवारीचा वापर वाढल्यावर ढालीचा आकार
बदलत गेला. तलवारीचा वार झेलण्यासाठी ढाल गोलाकार, बर्हिवक्र बनविण्यात येत असे. ढाल
तुटू नये म्हणून ढालीचे काठ उंच केले जात किंवा त्यावर पोलादी पट्टी गोलाकार बसविली
जात असे.ढालीचा आकार गोल किंवा पंचकोनी असे. गोल आकाराच्या ढाली जास्त प्रचलीत होत्या.
ढालीचा व्यास ८ इंचापासून २४ इंचापर्यंत असे ढाल बर्हिवक्र किंवा सपाट असत. कासवाचे
कवच, चामडे, धातू यापासून ढाली बनवल्या जात. चामड्याच्या ढाली पाण्याने भिजून बाद होऊ
नये, आकार बिघडू नये, तसेच ढाल चिवट व कठीण रहावी. यासाठी ढालीवर राळ, सरस, चिंचोक्यांची
भुकटी, तव्याची काजळी यांचा लेप देवून तो घोटला जात असे. त्यामुळे ढाल काळसर व चमकदार
दिसे.
ढालीवर शुभचिन्हे, पानेफुले, वेलबुट्टी यांची नक्षी
तसेच वाघ, सिंह, सूर्य, चंद्र, तारे, शिकार अशी चित्र काढली जात.
![Ancient & Medieval weapons , Shield (ढाल) Ancient & Medieval weapons , Shield (ढाल)](uploads/5/IMG_5036.jpeg) ![Ancient & Medieval weapons , Shield (ढाल) Ancient & Medieval weapons , Shield (ढाल)](uploads/5/IMG_5052.jpeg)
याशिवाय
धातूच्या ढालीही वापरल्या जात. लोखंड, तांबे, पितळ यापासून ढाली बनविल्या जात. त्यांच्यावर
नक्षीकाम केले जात असे. या ढाली वापरण्यास जड असतात. बकलर, जुनाह, कलकन, पाहरी, सिपार,
तुरा व माडू हे ढालींचे प्रकार आहेत.ढालीच्या मागील बाजूस ढाल पकडण्यासाठी चामड्याचे
२ किंवा ३ बंद लावलेले असतात. ३ बंद असलेली ढाल घोडदळातील सैनिक वापरत. या ३ बंदांमध्ये
कोपरापर्यंत हात घालून ढाल अडकविण्यात येत असे. यामुळे हात घोड्याच्या लगाम पकडण्यास
मोकळा रहात असे. २ बंद असलेली ढाल मुख्यत्वे करुन पायदळातील सैनिक वापरत दोनही बंद
मुठीत एकत्र पकडून ढाल हातात धरली जात असे. ढालीचा जास्तीत जास्त वापर करुन युध्द खेळणार्यास
‘‘ढालाईत’’ म्हणत. आजच्या काळातही दंगलीच्यावेळी पोलीस लोखंडी जाळीच्या अथवा प्लास्टीकच्या
ढाली वापरतात.
|