| 
यवनांचा झाला, अवनीला भार 
 सुंदर मंदीरे भंगीली पार ॥ 
 वेद-शास्त्रे नष्टांनी भ्रष्टविली
सारी 
 गोमाता देखता हरहर मारी ॥ 
 ब्राह्मण मत्तांनी लत्तांनी हाणिला
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥अधमांसी नाशोनी देशोद्धाराला
 
 प्रभुवर भूवर शिववीर झाला
॥1॥ 
  
हिंदूंच्या देशाचे बघुनीया हाल  
 जगताची जननी ती जाहली लाल ॥ 
 यवनांना क्रोधाने वधण्यासी आई 
 शिवनेरी शिवबासी जननासी देई ॥ 
 सुरवरां किन्नरां आनंद झाला 
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥2॥ 
  
रामा कौसल्या की कृष्णा यशोदा  
 शिवराजा जिजाई साजे जन्मदा ॥ 
 श्रीरामे राक्षस-हननासी केले 
 यवनांना नाशीन तैसे मी बोले ॥ 
 सुकलांनी शशिसम तो वृद्धिंगत झाला
 
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥3॥ 
 जयजयजी रघुवीरा, गर्जना झाली 
 श्रीरामदासांची मूर्ती उदेली ॥ 
 शिवभूपे पायी दृढ भालाला केले 
 स्वामींनी मस्तकी हस्ता ठेवियले ॥ 
 देशा धर्मा तारी, उपदेश दीला 
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥4॥ 
  
मातला अफजुल्ला यवनांत भारी  
 तुळजापुरी भंगी भवानी सारी ॥ 
 करकर चावोनी अधरांला धावे 
 शिवरायाचेवरि, परि दु:खाला पावे ॥ 
 उदरा वीदारोनी नीचाला वधिला 
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥5॥ 
  
स्वातंत्र्यदेवीचा गोंधळ केला 
 यजमानस्वामी श्रीशिवराय आला ॥ 
 सांवळ्या रंगाचे शूर मावळे 
 प्रेमाने अभिमाने गोंधळी झाले ॥ 
 पारतंत्र्याचा मग बोकड चिरला  
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥6॥ 
 धर्माला तारियले अरिवर मारियले  
 स्वातंत्र्य संपादुनि देशा शोभविले
॥ 
 अवतार कृत्याला पूर्णत्वा नेले  
 छत्रपती शिव नृप मग निजधामी गेले ॥ 
 सविनायक कविनायक गाती कवनाला  
 प्रभुवर भूवर शिववीर आला ॥7॥ 
  
-     स्वा. सावरकर, त्र्यंबकेश्वर
-1903. 
 |