Print Page | Close Window

सात

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=256
Printed Date: 22 Jan 2025 at 11:00pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: सात
Posted By: saurabhshetye
Subject: सात
Date Posted: 15 Aug 2014 at 6:08pm
वेडात मराठे वीर दौडले सात !
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर ख-या लाजतिल आता
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात !
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लाविता जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात !
 
वर भिवई चढली दात दाबती ओठ
छातीवर तुटली पटबंदाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर ओलवे काठ
म्यानातुन उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !
 
“जरी काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरी-शिबिरात
तव मानकरी हा घेउनि शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्‍ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वा-यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !

-      कुसुमाग्रज      नाशिक, 1936



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk