| मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
| धारावी किल्ला (Dharavi Fort) | किल्ल्याची ऊंची :  190 | ||
| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
| जिल्हा : ठाणे | श्रेणी : सोपी | ||
| वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला, भाइंदर जवळ आहे. अनेकजण धारावी किल्ला व धारावी झोपडपट्टीत असलेला "काळा किल्ला" ह्यात गफलत करतात. चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत ह्या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती. इ.स. १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले. धारावी किल्ला वसईच्या किल्ल्यासमोर आहे. एका बाजूला वसईची खाडी, दुसर्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्रा व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. | |||
|
|||
| इतिहास : | |||
| १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला. वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे आवश्यक होते. ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला. पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला. चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता. शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला. इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला. |
|||
| पहाण्याची ठिकाणे : | |||
| जन्मापासून अनेक रोमहर्षक लढाया पाहिलेल्या या किल्ल्यावर आता गाव वसलेले असल्यामुळे फार थोडे अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या उरलेल्या काही खुणा पहाण्यासाठी भाईंदर - उत्तन बसने ‘‘धारावी देवी मार्ग‘‘ ह्या फाट्यावर उतरावे. इथून जवळच पोर्तुगिजांनी बांधलेले ‘‘बेलन माऊली चर्च‘‘ आहे. ते पाहून पुढे गेल्यावर आपण जिर्णोध्दार केलेल्या धारावी देवीच्या मंदिरापाशी पोहचतो. देवीचे दर्ह्स्न घेऊन मंदिराच्या पुढे १० मिनीटे चालल्यावर उजव्या हाताला दर्गा व डाव्या हाताला तासलेला स्तंभासारखा आकार असलेला (खडक) डोंगर दिसतो. ६० लाख वर्षापूर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली तेंव्हा विशिष्ट प्रक्रियेमुळे असे स्तंभांसारखे दगड निर्माण झाले. यांना "कॉलमनर जॉइंट्स" असे म्हटले जाते. पोर्तुगिजांनी १५३६ ते १६०० पर्यंत हा डोंगर फ़ोडून दगडाचे अखंड चिरे काढले व त्याच चिर्यांनी वसईचा किल्ला, चर्च इत्यादी वास्तु बांधल्या होत्या. हा डोंगर पाहून पूढे गेल्यावर, जिथे डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी चढ चालू होतो तेथेच उजवीकडे (समुद्राच्या बाजूला) एक सिमेंटने बांधलेला रस्ता खाली उतरतो. या रस्त्याने खाली उतरल्यावर उजव्या बाजुला एका घराचे अवशेष दिसतात. त्यापुढे चालत गेल्यावर पायर्या लागतात . त्याउतरून गेल्यावर घडीव दगडात बांधलेला मोठा चौकोनी बुरुज पाहाय्ला मिळतो. या बुरुजावर पोर्तुगिज कालिन कार्यालयाचे किंवा बॅरॅक्सचे अवशेष आहेत. बुरुजाला समुद्राच्या बाजूला तोफ़ा ठेवण्यासाठी चार मोठे झरोके केलेले आहेत ह बुरुज पाहून पायर्या चढून वर आल्यावर उजव्या बाजूला काही पायर्या देसतात. त्यांनी वर चढून गेल्यावर थोडी सपाटी आणि त्यावर बांधकाम केलेले पाहायला मिळते. येथून पुन्हा रस्त्याच्या दिशेने येतांना डोंगराच्या बाजूला काही बांधकामाचे अवशेष झाडीत लपलेले पाहायला मिळतात. डांबरी रस्त्यावरुन चालत १० मिनिटात आपण हा बुरुज पाहून गडमाथ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला बागेपाशी घेऊन जातो.. या बागेत बुरुजाच्या भिंतीचे अवशेष पाहायला मिळतात. बागेत वसईच्या किल्ल्याकडे पाहाणारा चिमाजी आप्पा यांचा अश्वारुढ पुतळा आहे. किल्ल्याच्या माथ्यावरुन पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईचा किल्ला व मध्ये असलेली वसईची खाडी दिसते. तर दुसर्या बाजूला उत्तनचा किनारा दिसतो. या ठिकाणावरुन किल्ल्याचे भौगोलिक स्थान व वसईच्या मोहिमेतील महत्व लक्षात येते. | |||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर उतरुन उत्तनला जाणार्या बस क्र १ व ४ ने धारावी गडावर जाता येते. ह्यातील १ क्रमांकाची बस गडाच्या माथ्यावर बागेजवळ आणून सोडते. तिथून किल्ल्याचे अवशेष पहात डोंगर उतरत येता येते. परत जातांना चर्च पाहून धारावी फाट्यावरुन ह्याच बसेसनी भाइंदर गाठावे. धारावी माथा ते धारावी फाटा २.५ कि.मी अंतर आहे. भाईंदर स्थानकावरुन बस दर १० मिनीटाला आहे. | |||
| राहाण्याची सोय : | |||
| किल्ल्यात राहण्याची सोय नाही. | |||
| जेवणाची सोय : | |||
| गडावर जेवणाची सोय नाही. | |||
| पाण्याची सोय : | |||
| गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. | |||