मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सदाशिवगड (Sadashivgad) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सदाशिवगड, कराड
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
कराड शहरा जवळ असलेला सदाशिवगड हा किल्ला कराडहून विटाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या सुर्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. किल्ला साडे चौदा एकर परीसरावर पसरलेला आहे. किल्ल्याचा घेर बराच मोठा आहे. या किल्ल्यावरुन बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. पण संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यावर कोणतेही बांधकाम केलेले दिसून येत नाही. त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी केला जात असावा. सदाशिवगडावरील मंदिरात या परिसरातील भाविकांची कायम गर्दी असते. गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. मावळा प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे गडाची निगा राखत आहेत.
9 Photos available for this fort
Sadashivgad
Sadashivgad
Sadashivgad
इतिहास :
इसवीसन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कराड परीसर जिंकून घेतला. कराडहून विटा - विजापूरकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या सुर्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सदाशिवगड किल्ला बांधला. शिवकाळात आणि त्यानंतरही हा किल्ला टेहळ्णीचा किल्ला होता. १७१७-१८ च्या किल्ल्यांच्या यादीत हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आढळतो.
पहाण्याची ठिकाणे :
सदशिव गडाखाली घेर्‍या मध्ये जिथे जिथे वस्ती आहे ते भाग हजार माची, बाबर माची, राजमाची आणि वनवास माची (गडमाची) या नावांनी ओळखले जातात. या प्रत्येक वस्तीतून गडावर येण्यासाठी पायवाटा आहेत. यातील हजार माची पासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍यांपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट पायर्‍यांपर्यंत जाता येते.
पायर्‍यांच्या मार्गाने गड माथ्यावर पोहचल्यावर डाव्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली एक विहीर आहे, तिला चिंच विहिर या नावाने ओळखतात. या विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या विहिरीला बारमाही पाणी असते. विहीर पाहून गडावरील मंदिराच्या दिशेने निघाल्यावर एक कोरडा तलाव दिसतो. या तलावा जवळ नक्षत्र उद्यान बनवलेल आहे. तलावाच्या पुढे महादेवाचे (सदाशिवाचे) मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक मोठी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते. विहिरीच्या बाजूला कड्या लगत हनुमानाचे मंदिर आहे.

महादेवाचे दर्शन घेउन विहीरीच्या पुढे थोडे अंतर चालत गेल्यावर एक उद्यान आहे. हे उद्यान उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत किल्ल्याच्या झेंडा लावलेल्या ईशान्य टोकाकडे चालत जावे. उद्यानाच्या पुढे एक कोरडा पडलेला मोठा तलाव आहे. तो पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या ईशान्य टोकाच्या अलिकडे डाव्या बाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कड्याला लागून ३ टाकी आहेत. या ठिकाणी टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. या व्यतिरिक्त गडावर इतर अवशेष नाहीत.संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई किंवा पुणे मार्गे कराडला पोहोचावे. कराडपासून ४ किमी अंतरावर ओगलेवाडी नावाचे गाव आहे. ओगलेवाडी गावातील हजारमाची पासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍यां पर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट पायर्‍यांपर्यंत जाता येते.
हजार्माचीतून किल्ल्यावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.
राहाण्याची सोय :
गडावरील मंदिरात २५ जणांची रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर असणार्‍या विहिरीत पिण्याचे पाणी मिळते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
हजारमाचीतून किल्ल्यावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...