| मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
| विजयदुर्ग (Vijaydurg) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||||
| किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||
| जिल्हा : सिंधुदुर्ग | श्रेणी : सोपी | ||||
| वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूंनी समुद्राच पाणी आणि एका बाजूने जमिनेने वेढलेल्या "घेरीया" उर्फ़ "विजयदुर्ग" किल्ला उभा आहे. १२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७ व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावरुन केलेल्या निरिक्षणात "हेलियम वायूचा" शोध लागला. विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली एक एक आश्चर्य म्हणजेच "नैसर्गिक भिंत" आहे. मराठ्यांना या भिंतीची माहिती होती. किल्ल्याजवळ मोठी जहाज (युध्द नौका) आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असत. नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आणि विविध घटनांचा साक्षिदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे. | |||||
|
|||||
| इतिहास : | |||||
| कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ हा किल्ला बांधला. पुढे यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता. इ.स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. गडाला तिहेरी तटबंदी, गोमोख्ही दरवाजा इत्यादी बांधुन गड मजबूत केला. शिवाजी महाराजां नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता. मराठ्यांच्या आरमाराचा तळ या किल्ल्य़ा जवळ होता.इ.स. १७१७ मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे "ससेक्स" जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले. कान्होजींच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे दणाणले होते. इंग्रजांनी इ.स. १७१८ मध्ये प्रचंड आरमारानीशी विजयदुर्गावर हल्ला चढवला, पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारूगोळा आणि २०० सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले. इ.स.१७२० मधे इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला. त्यांच्या ताफ़्यात "फ़्राम" नावाची प्रचंड युध्दनौका होती. तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली. मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती "फ़्राम" लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युध्दनौका जाळुन बुडवली. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. या युध्दात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल आणि नष्ट झाल. विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला. पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणुक केली. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला. |
|||||
| पहाण्याची ठिकाणे : | |||||
| वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे "घेरीया" उर्फ़ "विजयदुर्ग" किल्ला उभा आहे. इसवीसनाच्या १२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७ व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. विजयदुर्ग गावाच्या दिशेला पूर्वीच्या काळी खंदक होता. समुद्राचे पाणी त्यात खेळवलेले होते. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या खंदकावर उचलता येणारा लाकडी पूल होता. प्रवेशद्वारा पासून शत्रूला दुर ठेवण्यासाठी खंदक खोदले जात. त्या खंदकावर काढता घालता येण्याजोगा पूल असे. प्रवेशद्वाराला बुरुजांचे संरक्षण दिलेले असे. आज मात्र भराव घातल्यामुळे थेट जमिनीवरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा पहिला दरवाजा "हनुमंत दरवाजा" आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देउळ आणि एक तोफ़ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर भक्कम जिभीचा दरवाजाला पाहायला मिळतो. संरक्षणासाठी प्रवेशव्दारा समोर भिंत बांधून तयार केलेल्या दरवाजाला जिभीचा दरवाजा म्हणतात. या दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. मुख्य प्रवेशव्दाराला संरक्षण देण्यासाठी परकोट किंवा उपकोटाची उभारणी केली जाते. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फ़ूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे. दुसर्या आणि तिसर्या तटबंदीच्या मधे असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत" महाव्दार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलिस चौकी समोर रचुन ठेवलेले तोफ़गोळे पाहायला मिळतात. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुने गडफ़ेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते. तेथुन पुढे उअजव्या बाजूला सदरेची भव्य इमारत दिसते. सदरे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. सदरेच्या समोर एक तुळशी वॄंदावन आणि पायर्यांची चौकोनी विहिर पाहायला मिळते. विहिरीच्या पुढे तटबंदीवर जाण्यासाठी छोटे प्रवेशव्दार आणि पायर्या पाहायला मिळतात. या पायर्यांनी वर चढून गेल्यावर बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात. त्यांना माडी म्हणतात. पुढे राणीवसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळते. तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. पुढे तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफ़ांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी पाहाण्या सारख्या आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या पायर्यांवरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळते. त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. तटबंदी वरुन खाली उतरल्यावर जखीणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली तोफ़ पाहायला मिळते. या मंदिरा जवळच "साहेबाचे ओटे " आहेत. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला. साहेबांच्या ओट्या समोर धान्यकोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला पाण्याचा मोठा आणि एक छोटा हौद आहे. पण या हौदात पाणी नसते, हे सर्व पाहून परत तटबंदीवर चढून गडफ़ेरी सुरु केल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. चोर दरवाजाच्या बाजूला तटबंदीत धान्य कोठार आहे, गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला "खुबलढा किंवा बारातोपा बुरुज" या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफ़गोळे ठेवलेले आहेत. खुबलढा बुरुजा पासून सर्जा बुरुजापर्यंत बाहेरच्या तटबंदीला समांतर तटबंदी व बुरुज व प्रवेशव्दार आहे. खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येउन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात. पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारुकोठार अस नाव लिहिलेल आहे. परंतू तटबंदीला लागुनच दारुकोठार असण्याची शक्यता कमी आहे. पुढे आपण पुन्हा गोमुखी दरवाजापाशी पोहोचतो. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला व्यवस्थितपणे पाहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. | |||||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||||
| रस्त्याने :- मुंबई - गोवा महामार्गावर मुंबई पासून ४७१ किमीवर तळेरे फ़ाटा आहे. येथून ५५ किमीवर विजयदुर्ग आहे. रेल्वेने :- कोकण रेल्वेवरील वैभववाडी हे जवळच स्थानक विजयदुर्ग पासून ६७ किमी अंतरावर आहे. | |||||
| राहाण्याची सोय : | |||||
| किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. गावात राहाण्याची सोय आहे. | |||||
| जेवणाची सोय : | |||||
| गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.. | |||||
| पाण्याची सोय : | |||||
| किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. | |||||