लोहगड – एक साक्षात्कार

निसर्ग, आत्मशोध आणि सह्याद्रीचा संवाद

निसर्ग • ट्रेकिंग • अनुभव

लोहगड – एक साक्षात्कार

सकाळची पावसाची वेळ. एक नाममात्र वाट लोहगडाच्या वाटेवर आम्ही चालत होतो. एक छोटंसं गाव लागलं, नंतर वाट बदलत गेली. नवीन वळण, चढण लागली. धुकं हळूहळू दाटू लागलं.

झाडांच्या आणि पानांच्या मधून कोवळे किरण आम्हाला पाहण्यासाठी डोकावत होते. धुकं कसं सगळीकडे पसरलं होतं. हिरव्या गवतावर दव मोत्यासारखं भासत होतं. प्रत्येक थेंब चमकत होता.

दरीत पाहिलं तर वरून खाली कोसळणारे धबधबे मन अडवत होते. आकाशाने प्रेमाचा संदेश धरतीपर्यंत पोहोचवला होता आणि धरती तो स्वीकारत आनंदाने न्हाऊन निघाली होती.

काही जण म्हणतात की फक्त क्षितिजावरच आकाश आणि धरती भेटतात, पण आम्ही ते आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. आकाशाचं धरणीशी झालेलं सुंदर मिलन.

इतका विशाल निसर्ग पाहून प्रथम जाणवलं — मी काय आहे? मी काहीच नाही. माझं अस्तित्व इथे विरून जातं.

मी असो वा नसो, या निसर्गाला काहीच फरक पडत नाही. पण त्या क्षणी माझं एक नातं या निसर्गाशी जुळून गेलं.

पुढे जाताना धुकं ओसरलं, पावसाची सर सुरू झाली. आम्ही चिंब भिजलो. वाट शोधत चढत राहिलो.

कुठे होतो आम्ही? रानात, वनात, सह्याद्रीच्या कुशीत की खोल गर्भात? आम्ही चढत होतो — लोहगडावर.

निसर्गाचं हे सुंदर, लोभस, गोड रूप पाहण्यासाठी भाग्य लागतं. पण ते समजून घेण्यासाठी वेगळं मन लागतं.

एवढा प्रचंड निसर्ग पाहून मन नम्र होतं. अहंकार विरतो. आणि एका शांत सत्याची जाणीव होते.

हा लोहगड नव्हता…
तो निसर्गाचा साक्षात्कार होता.

— पल्लवी शहा