पंच तत्त्वांमध्ये निर्गुण असा मानवाला लाभलेला
निसर्गाचा उरलेला थेंब म्हणजे क्षितिज असे मी म्हणेन ॥ धृ ॥
निरंजनाच्या लेखणीत शब्दांचे नवे चमत्कार
अनुभवांचा ओघ क्षितिजाला देतो मंगलमय आधार ॥१॥
पंच वर्षे सरली तरीही क्षण केवळ हा भासतसे
नवे गवसणी घालून तारा क्षितिजाचा हा राजतसे ॥२॥
एक एक क्षण जागवला शिवछत्रपतींच्या स्मरणात
आज उफाळून आले ओठी हृदयात लाटांचे गीत ॥३॥
मुरार माळूसरे बाजी हृदयात तोफी ठासवला
संभाजीच्या बलिदानाने काळ भयाण हादरला ॥४॥
अवघडाच्या शिवशुंवर जीव शिवाचा पालवतो
जिजाऊ हिरकणीचा हा पांढरा सह्याद्रीला जागवतो ॥५॥
स्वराज्याच्या आठवणी आम्हाला कधी न विसर इतिहास
निर्धाराच्या छातीवर कोरला केवळ एक निश्वास ॥६॥
सदैव श्रेयवादाने गिरिभ्रमणे असा उपक्रम राबवला
मधुर मराठी गीतांमधून राग शिवाचा आळवला ॥७॥
शिवोत्सवाच्या उंच गुढीने भाव शिवाचा झळकतसे
विजयपताका शिखरांवर प्रतिकृतींची झलकतसे ॥८॥
सुधागडाच्या पावन चरणी सेवा अनुलक्ष्य घडत असे
पाल्यांच्या श्रीब्राह्मणाचा वरदहस्त जो लाभतसे ॥९॥
‘सर्व दुर्ग संवर्धन’ अनुल्लेख ब्रीदवाक्य जे मनी ठसे
मनसंवर्धन नवीन पिढ्यांचे सहज त्यातून होत असे ॥१०॥
उजळून टाकू क्षितिज आपुले सांस्कृतिक निज कर्तृत्वाने
विश्वभरात हे जाईल अवघे केवळ ‘श्री’ च्या इच्छेने ॥११॥
— निरंजन सराडे