पेठ – एक अद्वितीय अनुभव

पहिला ट्रेक, पहिली जाणीव, पहिलं क्षितिज

ट्रेकिंग • निसर्ग • अनुभव

पेठ – एक अद्वितीय अनुभव

✍️ मानसी श्रीकांत कुलकर्णी

१ मे हा खरं तर महाराष्ट्र दिन. पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला एक वेगळा दिवस. नववीत शिकत असताना इतिहासातील घटना वाचायचे, आधी अभ्यासासाठी, नंतर त्यातूनच आपल्या भूमीचा आणि वारशाचा साज चढवणाऱ्या “जाणत्या राजा” श्री शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा हा दिवस.

पण १ मे २००३ हा दिवस मला महाराष्ट्र दिनाची सर्वार्थाने आठवण करून देणारा ठरला. कारण म्हणजे केलेला ट्रेक – जो खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता.

पेठ्याबाबत “मूर्ती लहान पण कीर्ती महान” ही उपमा अगदी सहज शोभून दिसते. पेठ हा तसा लहान किल्ला, पण त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत समृद्ध आहे.

एवढ्या लवकर उठायचं म्हणजे माझं तोंड थोडं वाकडंच होतं, पण ट्रेकला जायचं म्हटल्यावर झोप कुठली? अक्षरशः घड्याळात पाच वाजले.

आम्ही अकरा जण पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात गप्पागोष्टी करत स्टेशनला निघालो. डोंबिवली ते कर्जत हे अंतर रेल्वेने पार केलं. कर्जतला थोडी पोटपूजा करून बसने पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो.

सुरुवातीला त्या गडाकडे पाहून वाटलंच नाही की आपण एका दिवसात हा गड चढू शकू. सकाळी साडेनऊच्या सुमारास आम्ही चढाई सुरू केली. वाटेत पेठ गावात थोडी विश्रांती घेतली.

पुढचा रस्ता थोडा कठीण होता. चढताना घसरल्यामुळे गडावर पोहोचू शकणार नाही असं वाटलं, पण शेवटी सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि वाटेतल्या झाडांवरील करवंदांचा आस्वाद घेत मी देखील गडावर पोहोचले.

गडावर पोहोचल्यानंतर थोडं रिलॅक्स होऊन आम्ही टोकावर गेलो. तिथे वाहणारी थंड हवा मनाला सुखावणारी होती.

खाली उतरण्याची वेळ लक्षात घेऊन आम्ही गडावरील गुहेत बसून जेवण केलं. सगळ्यांनी एकमेकांच्या पदार्थांचा आस्वाद घेतला.

परतीच्या वाटेवर प्लास्टिकसारखा कचरा दिसेल तिथे उचलण्याचा निर्णय घेतला. मी बूटांमुळे फार कचरा उचलू शकले नाही, याची आजही खंत वाटते, पण याच अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं.

संध्याकाळी चहा पिऊन, गाणी म्हणत, गप्पा मारत आम्ही पुन्हा डोंबिवलीला परतलो.

एक ट्रेक झाल्यावर मला पुढच्या ट्रेकची ओढ लागली. तो दिवस कसा गेला ते कळलंच नाही. खूप मजा आली.

— मानसी श्रीकांत कुलकर्णी
इ. ११ वी, विज्ञान