विसापूर

गतवैभवाची साक्ष

दुर्गदर्शन • इतिहास • ट्रेकिंग

विसापूर – गतवैभवाची साक्ष

23 / 9 / 2003

दि. २० सप्टेंबर रोजी कल्याणहून १३२७ डाऊन पॅसेंजर गाडी रात्री १ वाजता निघाली. आम्ही एकूण २१ जण होतो — पैकी ७ मुली आणि १४ मुले. साधारण रात्री ३:३० वाजता आम्ही मालवली स्थानकात उतरलो. थंडी जाणवत होती.

गड चढण्यास आम्ही सकाळी साधारण ७ वाजता सुरुवात करणार होतो. तोपर्यंत काय करायचं? हा प्रश्न येताच आम्ही बाजूने जाणाऱ्या मुंबई–पुणे महामार्गावर बांधलेल्या पुलावर जाण्याचं ठरवलं. तिथेच सर्वांनी बॅगा टाकून विश्रांती घेतली.

हवेत प्रचंड गारवा होता. हळूहळू एकेक जण अंग टाकू लागला आणि वर असणारे निरभ्र निळे आकाश, त्याला सजवणाऱ्या तारका आणि चंद्रकोर पाहत पाहत सर्वजण निद्राधीन झाले.

सकाळी उजाडताच सर्वांनी पुन्हा रेल्वे स्थानकाकडे प्रस्थान केलं आणि सोबत आणलेले समोसे खाऊन चहा घेतला. सकाळी ७ वाजता पुण्याहून आलेले दोघेजण भेटले आणि सर्वांनी तिथून बस्ता उचलल्या.

पुलावरून गावात उतरण्यासाठी लोखंडी शिडी आहे. ती उतरून आम्ही डावीकडे वळून साधारण १५–२० मिनिटे रस्त्याने चालत गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथून वर चढण्यास सुरुवात झाली.

सर्वत्र जणू हिरव्या गालिच्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. ठिकठिकाणी पिवळ्याधमधम फुलांचे ताटवे फुलले होते. हे सौंदर्य कोणत्याही प्रोफेशनल लँडस्केपरलाही जमणार नाही — इथे तर केवळ निसर्गाची किमया होती.

वर चढताना गडमाथा ढगांमध्ये लपलेला दिसत होता. नुकताच पाऊस आल्यामुळे अनेक ठिकाणी धबधबे संथ वाहत होते. संपूर्ण वाटेत गवत, रानटी झाडे दाटलेली होती. काही ठिकाणी पायवाटही दिसत नव्हती.

आम्ही अर्धे जण पुढे होतो, तर उरलेले मागून येत होते. साधारण दीड तासाने आम्ही एका पाणवठ्याजवळ पोहोचलो. बाटल्यांत पाणी भरून थोडा फ्रेश होऊन पुढे निघालो.

पावसाच्या ऊन–सावलीचा खेळ सुरू होता. हिरवळ चमकत होती. वाट अंदाजानेच शोधत आम्ही पुढे जात होतो. तेवढ्यात मागून आवाज आला — “आम्ही वाट चुकलो आहोत!”

वरच्या बाजूचे काही जण विरुद्ध दिशेने चढले होते. आम्ही त्यांना थांबवून योग्य वाट दाखवली आणि पुन्हा चढाई सुरू केली. वाटेच्या दोन्ही बाजूंनी ८–८ फूट उंच झुडपे वाढलेली होती.

अखेर तटबंदी नजरेस आली. ढासळलेले दगड, खोल दऱ्या, आणि त्यातून वर चढत आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो.

संपूर्ण गडावर पसरलेल्या हिरवाईने मन आणि डोळे दोन्ही सुखावले. प्रत्येक जण जणू स्वर्ग दोन बोटे उरल्याचा अनुभव घेत होता.

या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही चांगल्या स्थितीत असलेली लांबलचक तटबंदी, मजबूत बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि प्रचंड पठार.

लोहगड, तुंग, तिकोना, आणि समोर पसरलेली सह्याद्रीची रांग पाहताना क्षणभर वाटलं — किती वैभवशाली असावा हा किल्ला जेव्हा इथे राजे-महाराजे राहत असतील!

विसापूर आजही ऊन, पाऊस, वारा यांचा सामना करत अभिमानाने उभा आहे. इतिहास घडवणाऱ्यांचा साक्षीदार म्हणून.

विसापूर — आजही गतवैभवाची साक्ष देणारा किल्ला.

— शुभदा जगताप
क्षितिज ग्रुप सदस्या